पाकिस्तानातल्या स्री पत्रकार ‘ऑनर किलिंग’च्या बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:15 AM2020-09-11T00:15:22+5:302020-09-11T00:15:28+5:30
नोव्हेंबर महिन्यात लाहोर येथे ‘एन्टी क्राइम’ नावाच्या वर्तमानपत्राचा मालक दिलावर अलीने त्याची आधीची पत्नी आणि पत्रकार आरुज इक्बाल (२७) ची हत्या केली होती.
शाहीना शाहीन ही २५ वर्षांची तरुण पत्रकार. पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातली. तिचं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. बलुचिस्तानच्या तुरबाट शहरात गेल्या शनिवारी शाहीनाची हत्या तिच्या नवऱ्याने केली. घराण्याच्या तथाकथित ‘प्रतिष्ठेच्या’ नावाखाली ही हत्या (आॅनर किलिंग) करण्यात आल्याची शक्यता आहे. बलुचिस्तान व पाकिस्तानच्या इतर भागात आॅनर किलिंगची अमानवीय प्रथा अजूनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहेपाकिस्तान टीव्हीच्या सकाळच्या बलोची भाषेतील ‘बोलन’ नावाच्या कार्यक्रमाची शाहीन अँकर होती. ‘झगहर’ नावांच्या नियतकालिकाची ती संपादिका होती. महिलांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घ्यायची. प्रसिद्ध चित्रकारदेखील होती.
पाच महिन्यांपूर्वीच नवाबजादा मेहराब गुचकीशी शाहीनचा निकाह झाला होता. नवºयापेक्षा शाहीना बलुचिस्तानात अधिक प्रसिद्ध होती. पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेत आपल्यापेक्षा पत्नीचं अधिक प्रसिद्ध असणं बºयाचदा ‘गुन्हा’ ठरतो. या कारणावरून शाहीनाची हत्या करण्यात आल्याचा वहीम आहे. आपल्याच घरी तीन गोळ्या घालून नवºयाने शाहीनाची हत्या केली व त्यानंतर तो स्वत:च्या वाहनातून शाहीनाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये शाहीनाला ठेवलं आणि तो पळून गेला. तिथे शाहीनाचा मृत्यू झाला. या घटनेने पाकिस्तानच्या पत्रकारांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. पाकिस्तान फेडरल युनियन आॅफ जर्नालिस्टस या संघटनेने शाहीनच्या हत्येची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नोव्हेंबर महिन्यात लाहोर येथे ‘एन्टी क्राइम’ नावाच्या वर्तमानपत्राचा मालक दिलावर अलीने त्याची आधीची पत्नी आणि पत्रकार आरुज इक्बाल (२७) ची हत्या केली होती. आरुजनी काम करता कामा नये, असा दिलावरचा हट्ट होता; पण आरुज पत्रकारितेचा व्यवसाय सोडण्यास तयार नव्हती. ती स्वत: नवीन नियतकालिक सुरू करण्याच्या प्रयत्नात होती. हे सहन न झाल्यामुळे दिलावरने तिची हत्या केली.
आधीच पाकिस्तानात काम करणाºया महिलांची संख्या अत्यल्प आहे. ‘फ्रीडम नेटवर्क’ नावाच्या संघटनेचा २०१८ सालचा अहवाल सांगतो, की पाकिस्तानातील माध्यमांमध्ये काम करणºया महिलांचं प्रमाण पाच टक्क्यांहून कमी आहे. अशी अवस्था असताना आता पाकिस्तानातील स्री माध्यमकर्मींना आता या सरंजामी मानसिकतेची शिकार व्हावी लागणं अत्यंत दुर्दैवी आहे.
पाकिस्तानच्या मानवी हक्क आयोगाच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानात दरवर्षी अंदाजे एक हजार जणांची ‘आॅनर किलिंग’च्या नावाने हत्या केली जाते. साहजिकच त्यात महिलांची संख्या अधिक असते. २०१६ मध्ये समाजमाध्यमातील स्टार कंदील बलोचची हत्या तिच्या भावाने इतरांच्या मदतीने केली होती. कंदीलच्या भावाला जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने दिली आहे.
बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा आणि ग्रामीण सिंधमध्ये ही क्रूर प्रथा आजही अस्तित्वात आहे. आपल्याकडेदेखील हरयाणा व उत्तर प्रदेशच्या काही भागात आॅनर किलिंगच्या घटना घडत असतात. महाराष्ट्रातही ही प्रकरणे दुर्दैवाने नवी राहिलेली नाहीत.
आॅनर किलिंगला सरंजामी व्यवस्थेत ‘प्रतिष्ठा’ मिळते, हे दुर्दैव आहे. एखाद्या मुलीने स्वत:च्या इच्छेप्रमाणे लग्न करायचा निर्णय घेतला तर तिला किंवा तिच्या जोडीदाराला किंवा दोघांना मारून टाकण्याची क्रूर प्रथा २१ व्या शतकातदेखील अस्तित्वात आहे, ही चिंतेची बाब आहे.
त्याच्याकडे घराण्याची ‘प्रतिष्ठा’ म्हणून पाहिले जाते आणि त्यामुळे बहुतेक खटल्यात आरोपी सुटतात कारण साक्षी द्यायला कोणी पुढे येत नाही.
बलुचिस्तान हा पाकिस्तानातला सर्वात मोठा आणि सर्वात कमी लोकसंख्या असलेला प्रांत. खनिजे, तेल यांनी समृद्ध. त्याचा फायदा स्थानिक बलोच लोकांना मिळत नाही. बलुचिस्तान श्रीमंत आहे पण बलोची गरीब. शिक्षणाचं प्रमाणदेखील येथे कमी आहे. बहुचर्चित ग्वादर बंदर याच प्रांतात आहे.
सरंजामी मानसिकतेने वेढलेल्या पाकिस्तानातील महिला संघटनांसमोर आॅनर किलिंगचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच भयावह रूप घेताना दिसतो आहे. आधीच विविध समस्यांनी वेढलेल्या आपल्या शेजारी देशासाठी हे वर्तमान अणखीच भयंकर म्हणायचे!