निर्नायकीचे बळी

By admin | Published: August 31, 2015 10:45 PM2015-08-31T22:45:09+5:302015-08-31T22:45:09+5:30

डॉ.दाभोळकर यांच्या हत्त्येला दोन वर्षे पुरी होत असतानाच कर्नाटकातील धारवाड येथे विवेकवादाचा विचार मांडणारे प्राध्यापक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक डॉ. मल्लेशाप्पा

The victim of perfume | निर्नायकीचे बळी

निर्नायकीचे बळी

Next

डॉ.दाभोळकर यांच्या हत्त्येला दोन वर्षे पुरी होत असतानाच कर्नाटकातील धारवाड येथे विवेकवादाचा विचार मांडणारे प्राध्यापक व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक डॉ. मल्लेशाप्पा मडीवाळप्पा (एम.एम.) कलबुर्गी यांची हत्त्या झाली आहे. दाभोळकर यांच्या हत्त्येनंतर गोविंद पानसरे यांना ठार मारण्यात आले. या दोन्ही खुनांचा तपास कणभरही पुढे सरकलेला नाही. अशा परिस्थितीत कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा होईल, या कर्नाटकातील काँगे्रस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या ग्वाहीवर कोणी फारसा विश्वास ठेवणार नाही. असेच आश्वासन दाभोळकर यांच्या हत्त्येनंतर त्यावेळचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. पण काहीही झाले नाही. पानसरे यांच्या खुनाच्या वेळी भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आले होते. नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणेच ग्वाही दिली. मात्र झाले काहीच नाही. अशा परिस्थितीत आता आपल्याला मोकळे रान आहे, असे या प्रकरणांमागे हात असलेल्या अतिरेकी विचारांच्या संघटनांना वाटू लागले असल्यास नवल ते काय? वस्तुत: पोलिसांना खरोखरच तपास करायचा असेल ंिकवा तसा निर्धारपूर्वक तपास करण्याची मुभा त्यांना असेल, तर किती तडफेने गुन्हे उघडकीस आणले जातात, ते सध्या गाजत असलेल्या शीना बोरा खून खटल्याने दाखवून दिले आहे. खुद्द मुंबईचे पोलीस आयुक्तच आरोपीची चौकशी करण्यास पुढे सरसावले आहेत. दरदिवशी ते पत्रकारांना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांच्या झगमगाटात तपासाच्या प्रगतीची माहिती देत आहेत. पण मुंबईत काही महिन्यांपूर्वी विषारी दारू पिऊन १०० च्या वर माणसांचा बळी गेला होता, तेव्हा ही तत्परता याच आयुक्तांनी दाखवली नव्हती. हा मुद्दा अशासाठी विचारात घ्यायचा की, पोलीस दलातील गुन्ह्याच्या तपासाचे अगक्रम कसे ठरतात किंवा ठरवले जातात आणि या अग्रक्रमाचा राज्यकर्त्यांनी जाहीररीत्या जनतेला दिलेल्या ग्वाहीशी काही संबंध कसा नसतो, ते समजून घेण्यासाठी. अशा परिस्थितीत कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ग्वाहीला फारसा काही अर्थ नाही. खरा प्रश्न आहे, तो देशात वाढत गेलेल्या आणि आता हाताबाहेर जात असलेल्या अतिरेकी असहिष्णुतेचा. या असहिष्णुतेमुळे समाजव्यवस्थेची वीणच उसवली जाऊ लागली आहे. आज अगदी क्षुल्लक कारणावरून दोन व्यक्ती हमरीतुमरीवर येऊन हातघाईपर्यंत पोचतात आणि हाणामारीही होते व कधी खूनही पाडले जातात. अलीकडच्या काळात एकतर्फी प्रेमभंगापासून ते ‘रोड रेज’पर्यंतच्या प्रकरणात सर्रास हल्ले वा खून होऊ लागले आहेत. असे घडण्याचे मुख्य कारण म्हणजे कायदा आपल्याला कसाही वाकविता येऊ शकतो, हा समाजात रूजत गेलेला समज. आता हा समज इतका पक्का झाला आहे की, खून करूनही आपण सत्ता वा संपत्तीच्या आधारे सुटू शकतो, असे सर्वसाधरणत: मानले जाऊ लागले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे एखाद्या नागरिकाच्या हाती सत्ता वा संपत्ती यापैकी एक ‘उपद्रवमूल्य’ असल्याविना सरकारी यंत्रणा त्याचे कामच करीत नाही, अशी राज्यकारभारची पडलेली रीत. साहजिकच ज्यांच्या हाती राजकीय वा आर्थिक सत्ता आहे किंवा या दोन सत्ता वर्तुळात अथवा त्याच्या परिघावर जे गट, संघटना, व्यक्ती आहेत, त्यांना असे ठामपणे वाटू लागले आहे की, काहीही केले, तरी आपल्याला ‘अभय’ आहे. तसे घडूनही येताना दिसते. परिणामी सर्वसामान्यांचा कायदा व सुव्यवस्था यंत्रणेवर असलेला विश्वास उडू लागला आहे. आपल्याला जर सरकारी यंत्रणेकडून काहीही काम करून घ्यायचे असेल किंवा न्याय मिळवायचा असेल, तर नियमानुसार कायद्याचा चौकटीत राहून चालणार नाही, हे जनमनात रूजले आहे. त्यातूनच ही अतिरेकी असहिष्णुता वाढत गेली आहे. असे होण्याचे दुसरे एक महत्वाचे कारण म्हणजे गेल्या दोन अडीच दशकात देशातील राजकारणात शिगेला पोचलेली जीवघेणी अटीतटी. काहीही करून सत्ता मिळवण्याच्या खटाटोपात समाजातील ताणतणाव वाढवणे, विद्वेष निर्माण करणे, प्रत्यक्षात येऊ न शकणारी आमिषे दाखवणे वा आश्वासने देणे ही निवडणूक जिंकून सत्ता हस्तगत करण्याची चाकोरी रूळत गेली आहे. ‘निवडून येण्याची क्षमता’ हा एकमेव निकष लावून उमेदवार निवडले जाऊ लागले आहेत. अशा ‘क्षमते’चे दोन मुख्य आधारस्तंभ हे पैसा व मनगटशक्ती बनले आहेत. या दोन्ही आधारस्तंभांचा मुक्त वापर निवडणुकीच्या काळात केला जात असतो. मग ती स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असो वा संसदेची. आता हे दोन आधारस्तंभ जे कोणी उभे करू शकतात, तेच राजकारणी बनले आहेत. परिणामी संसदेपर्यंत सर्व स्तरातील लोकप्रतिनिधीत अशा मनगटशहांची संख्या सगळ्या पक्षात वाढत गेली आहे. ही जी अराजकी निर्नायकी निर्माण झाली आहे, त्यात मतभेद, चर्चा, विसंवाद इत्यादीला जागाच उरलेली नाही. मतभेद व्यक्त करणारा हा सरळ शत्रूच मानला जाऊ लागल्याने मग त्याचा नायनाट करणे ओघानेच येते. त्यामुळेच दाभोळकर, पानसरे व आता कलबुर्गी यांचा बळी घेतला गेला आहे. ही निर्नायकी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत, तोपर्यंत असे बळी पडतच राहणार आहेत.

Web Title: The victim of perfume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.