‘टायटॅनिक’च्या मोहाचे बळी, अपघातामागील सत्य समोर येणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2023 08:56 AM2023-06-24T08:56:26+5:302023-06-24T08:57:03+5:30

या घटनेत जी पाणबुडी दुर्घटनाग्रस्त झाली, तिचे नावही ‘टायटन’. यातील फरक इतकाच की ‘टायटन’मध्ये केवळ पाच जण होते. हे पाचही जण अब्जाधीश आणि आपापल्या क्षेत्रात शिखरावर पोहोचलेली व्यक्तिमत्त्वे होती.

Victims of 'Titanic' temptation, the truth behind the accident must come out | ‘टायटॅनिक’च्या मोहाचे बळी, अपघातामागील सत्य समोर येणे आवश्यक

‘टायटॅनिक’च्या मोहाचे बळी, अपघातामागील सत्य समोर येणे आवश्यक

googlenewsNext

महासागरातील अपघातात एक महाकाय जहाज दुर्घटनाग्रस्त होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडावेत आणि या जहाजाचे बुडालेले अवशेष पाहण्यासाठी समुद्रतळाशी सफरी निघाव्यात, या घटनेवर अनेक चित्रपट निर्माण व्हावेत आणि चित्रपटरूपातून साकारलेली कथा एक दंतकथाच बनून जावी! सारेच अनाकलनीय. टायटॅनिक. एप्रिल १९१२ मध्ये टायटॅनिक नावाचे महाकाय जहाज अपघातग्रस्त होऊन बुडाले. त्यात हजारोंचा मृत्यू झाला. पुढे १९८५मध्ये जहाजाचे अवशेष सापडले. याच घटनेची पुनरुक्ती ठरावी, अशी घटना टायटॅनिक ज्या ठिकाणी बुडाली, त्याच ठिकाणी घडली. या घटनेत जी पाणबुडी दुर्घटनाग्रस्त झाली, तिचे नावही ‘टायटन’. यातील फरक इतकाच की ‘टायटन’मध्ये केवळ पाच जण होते. हे पाचही जण अब्जाधीश आणि आपापल्या क्षेत्रात शिखरावर पोहोचलेली व्यक्तिमत्त्वे होती.

ब्रिटिश अब्जाधीश हमीश हार्डिंग, ब्रिटनचे शाहजादा दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान, फ्रान्सचे पॉल हेन्री नार्गोलेट आणि ज्या पाणबुडीतून हे सर्व प्रवास करीत होते, त्या ‘ओशनगेट एक्स्पेडिशन्स’ कंपनीचे कार्यकारी अधिकारी स्टॉक्टन रश यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. ‘टायटन’बाबत जे घडले, त्यातून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ‘ओशनगेट एक्स्पेडिशन्स’ ही कंपनी अशा धाडसी मोहिमा आखते. समुद्रामध्ये खोलवर पर्यटकांना घेऊन जाणे आणि दर वेळी मोहिमांदरम्यान येणाऱ्या अनुभवांतून, आलेल्या त्रुटींमधून सुधारून पुन्हा नव्याने मोहिमा आखणारी ही कंपनी आहे. या धाडसी टायटॅनिक मोहिमेसाठी प्रतिव्यक्ती तब्बल अडीच लाख डॉलर यासाठी आकारले जातात.

या कंपनीने आतापर्यंत चौदा मोहिमा आणि पॅसिफिक, अटलांटिक महासागर, तसेच मेक्सिकोच्या आखातात दोनशेहून अधिक डाइव्हज् पूर्ण केल्या आहेत. मात्र, असे असले, तरी दुर्घटनेनंतर तज्ज्ञांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यावरून या मोहिमांमध्ये आणि पाणबुडीच्या रचनेमध्ये सारेच काही आलबेल होते, असे दिसत नाही. ही दुर्घटना ‘इम्प्लोजन’ म्हणजेच पाण्याचा मोठा दाब पाणबुडीवर येऊन एखाद्या ठिकाणी जरी तिला तडा गेला, तरी या प्रचंड अशा दाबाखाली तिचा सर्वनाशच होतो, अशाप्रकारे झाली आहे. ‘एक्स्प्लोजन’ म्हणजे  स्फोट होणे; पण ‘इम्प्लोजन’ हे वेगळ्या प्रकारचे असते. यामुळेच या पाणबुडी निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुर्दैवाने, ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉक्टन रश हेदेखील पाणबुडीतच होते आणि त्यांचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.  १९९७ मध्ये अजरामर असा ‘टायटॅनिक’ चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला आणि जे स्वत: ३३ वेळा टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रात खोलवर गेले आहेत  त्या जेम्स कॅमेरून यांनी पाणबुडीच्या रचनेवर जाहीरपणे शंका उपस्थित केली आहे. ज्या वेळी प्रतिव्यक्ती अडीच लाख डॉलर इतकी रक्कम घेऊन एखादी व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवते, अशा वेळी तरी खूप काळजी घेणे गरजेचे असते, असे ते म्हणतात. ‘टायटॅनिक’ जहाजासारखीच ही दुर्घटना घडावी, हे मनाला न पटण्यासारखे आहे. पाणबुडीच्या रचनेमध्ये त्रुटी असल्याचे पाणबुडी क्षेत्रातील अनेकांनी सांगितले होते. तसे पत्रही अनेकांनी कंपनीला लिहिले होते.

या रचनेमध्ये आणखी बरीच सुधारणा आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते. ‘मी स्वत: अशा पद्धतीची पाणबुडी तयार करून खोलवर गेलो आहे. त्यामुळे अभियांत्रिकीच्या दृष्टीने काय समस्या असू शकतात, याची मला चांगली कल्पना आहे,’ असे कॅमेरून म्हणाले. कॅमेरून यांनी ज्या शंका उपस्थित केल्या आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे मिळतील तेव्हा मिळतील; पण या दुर्घटनेत ज्या पाच व्यक्तींचा मृत्यू झाला, त्या कधीही परत येणार नाहीत. टायटॅनिक जहाज ज्या ठिकाणी बुडाले, त्याच्या जवळच या पाणबुडीचे काही अवशेष सापडले. या पाचही जणांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. ‘टायटॅनिक’ हा सर्वांसाठीच एक कुतूहलाचा विषय.

याच घटनेचे कुतूहल म्हणून अवशेष बघण्याच्या मोहिमा सुरू झाल्या. कॅमेरून यांच्या प्रख्यात ‘टायटॅनिक’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त याचवर्षी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांनी थिएटरमध्ये उचलून धरला आहे. टायटॅनिकच्या मूळ दुर्घटनेला या वर्षी १११ वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षांनंतरही ‘टायटॅनिक’बाबतचे कुतूहल कायम आहे. दुर्दैवाने या नावाशी साधर्म्य असलेली किंबहुना हेतूपूर्वक तसे नाव ठेललेली ‘टायटन’ पाणबुडीही याच ‘टायटॅनिक’जवळ दुर्घटनाग्रस्त झाली. आता या अपघातामागील सत्य समोर येणे आवश्यक आहे.

Web Title: Victims of 'Titanic' temptation, the truth behind the accident must come out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.