विकृत पुरुषी मानसिकतेचे बळी!
By रवी टाले | Published: February 7, 2020 03:48 PM2020-02-07T15:48:04+5:302020-02-07T15:52:06+5:30
बहुतांश घटनांमागे नकार पचवू न शकण्याची विकृत पुरुषी मानसिकता असते.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकापाठोपाठ एक घडलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे उभा महाराष्ट्र हादरला. विदर्भातील हिंगणघाट शहरात एका विकृताने प्राध्यापिकेस पेट्रोल टाकून जाळले. तशाच प्रकारची घटना मराठवाड्यातील सिल्लोड तालुक्यातही घडली. तत्पूर्वी मराठवाड्यातीलच जालना जिल्ह्यात विदर्भातील प्रेमी युगुलास मारहाण करण्यात आली, युवतीची छेड काढण्यात आली आणि त्या प्रकाराचे चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले. या घटनांची तीवता जास्त असल्याने आणि त्या लागोपाठ घडल्याने त्यांचे संतप्त पडसाद उमटले एवढेच! अन्यथा महिला व मुलींच्या छेडखानीच्या घटना नित्य घडतच असतात आणि त्यांची कुठे वाच्यताही होत नसते!
अशा प्रकारच्या घटनांचा बारकाईने अभ्यास केल्यास असे लक्षात येते, की त्यापैकी बहुतांश घटनांमागे नकार पचवू न शकण्याची विकृत पुरुषी मानसिकता असते. आपल्याला हव्या असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी नकार ऐकावा लागला, की प्रत्येकच व्यक्तीला दु:ख होते, मग ती पुरुष असो अथवा स्त्री! अगदी लहान मुलांचाही त्यासाठी अपवाद करता येत नाही. धड बोलताही येत नसलेल्या मुलास एखाद्या गोष्टीसाठी नाही म्हटले, की ते आकांडतांडव करू लागते, हा अनुभव सगळ्यांनाच आलेला असतो.
ठाम नकार ऐकायला मिळाला, की मनात संताप, अपमान, धक्का, निराशा, दु:ख अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ माजतो. त्या कल्लोळाला आवर घालून स्वत:च्या मनाची समजूत काढण्यात बहुतांश व्यक्ती यशस्वी होतात; मात्र काही विकृत मानसिकतेचे पुरुष नकारामुळे त्यांचा घोर अपमान झाल्याची समजूत करून घेऊन त्याचा बदला घेण्याच्या भावनेने पेटून उठतात.मग त्यामधूनच हिंगणघाट, सिल्लोडसारख्या घटना घडतात. त्यातून विकृतांना भले सूड घेतल्याचे क्षणिक समाधान मिळत असेल; पण त्यांचा बळी ठरलेल्या पीडितांना मात्र हकनाक जीव गमवावा लागतो अथवा आयुष्यभर विद्रुपता अथवा अपंगत्व वागवत, त्या व्रणांसह घुसमटत राहावे लागते. त्यांची स्वप्ने, भावविश्व सगळे काही क्षणात होत्याचे नव्हते होऊन गेलेले असते.
जीवनात प्रत्येकच व्यक्तीला पावलोपावली नकार ऐकावा लागत असतो आणि त्यामुळे निराशेची भावनाही मनात घर करीत असते. मग काही मोजकेच पुरुष पराकोटीच्या हिंसाचाराचा मार्ग का निवडतात? महिलांनाही जीवनाच्या एखाद्या टप्प्यावर एखादा पुरुष आवडतो आणि बरेचदा त्यांनाही नकार मिळतो. मग अशा एखाद्या महिलेने एखाद्या पुरुषाला जाळल्याचे का कानावर येत नाही? त्यामागचे कारण हे आहे, की महिलांमध्ये पुरुषांवर वर्चस्व गाजविण्याची भावना बिंबविण्यात आलेली नसते आणि त्यामुळे नकार मिळाला तरी त्याला नियती समजून पुढे जाण्याची त्यांची मानसिकता असते.
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, एखाद्या खंबीर महिलेकडून नकार ऐकावा लागल्यास, स्वत:ची ओळखच हरपण्याची भीती काही पुरुषांच्या मनात घर करते आणि मग ते टोकाच्या हिंसाचारास प्रवृत्त होतात. असे पुरुष त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या मनावर बिंबविण्यात आलेले त्यांचे कथित पुरुषत्व, वर्चस्व, सिद्ध करण्यासाठी म्हणून हिंसाचाराचा सहारा घेतात खरे; परंतु खरे म्हटल्यास त्यांच्या मनात खंबीर वृत्तीच्या महिलांविषयीची एक सुप्त भीती घर करून असते. अशा एखाद्या महिलेकडून नकार मिळाल्यास स्वत:ची ओळखच पुसल्या जाण्याची भीती त्या पुरुषांना वाटत असते आणि मग त्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी म्हणून ते हिंसाचाराचा मार्ग पत्करतात, असा मानसोपचार तज्ज्ञांचा अभ्यास सांगतो.
दुर्दैवाची बाब म्हणजे पुरुषांमध्ये वर्चस्ववादी मानसिकता रुजविण्यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग असतो. मग ती आई असेल, बहिण असेल, आजी असेल अथवा आणखी एखादी जवळची स्त्री असेल! लहानपणापासूनच मुलांच्या मनावर तो पुरुष असल्याचे बिंबविण्याचे काम या जवळच्या स्त्रिया करीत असतात. मुलगा असून मुलीसारखा काय रडतो, मुलगा असून मुलींकडून काय मार खातो, अशा लहानपणापासून ऐकलेल्या वाक्यांमधून पुरुषी वर्चस्वाची भावना आपोआप बिंबत जाते. मग मोठा झाल्यावर तो प्रत्येकच महिलेवर वर्चस्व गाजवू बघतो. मग आयुष्याच्या कोणत्या तरी टप्प्यावर त्याला एखाद्या महिलेकडून नकार मिळतो तेव्हा तो पिसाटतो आणि त्याच्या तथाकथित पौरुषत्वाला आव्हान देणारी महिलाच संपविण्याचा निर्धार करून तो प्रत्यक्षातही आणतो.
हिंगणघाट, सिल्लोडसारख्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गरज आहे ती मुलांमध्ये लहानपणापासूनच स्त्री-पुरुष समानता बिंबविण्याची! स्त्री आणि पुरुष यांच्यात कुणी ज्येष्ठ नाही अन् कुणी कनिष्ठ नाही, स्त्रीवर वर्चस्व गाजविणे हा पुरुषांचा हक्क नाही, एखाद्या पुरुषाकडून मिळालेला नकार जसा पचविता तसाच स्त्रीकडून मिळालेला नकारही पचवायला हवा, या बाबी लहानपणापासूनच मुलांमध्ये बिंबविण्यात आल्यास खूप मोठा फरक पडू शकतो. त्यासाठी कुटुंबातील महिलांनी स्वत: तर काळजी घेतलीच पाहिजे, पण कुटुंबातील पुरुष मुलांमध्ये पुरुषी वर्चस्ववाद भिनवताना आढळले तर त्यांनाही थांबविले पाहिजे. महिलांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे आणि पुरुषांना नकार देण्याचा अधिकार आहे, ही गोष्ट लहानपणीच मुलांच्या मनात ठसल्यास, पुढे जाऊन महिलांचा नकार पचविण्याची ताकद त्याच्यात नक्कीच निर्माण होईल!
- रवी टाले
ravi.tale@lokmat.com