‘श्रीमंतां’चा विजय असो!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 12:15 AM2018-08-14T00:15:01+5:302018-08-14T00:15:23+5:30

दादरच्या भवनातील दरबार आज खचाखच भरलेला...मंत्रिगण, सरदार, मनसबदार, वतनदार, पोद्दार वगैरे सगळे झाडून हजर... उद्धोमहाराजांच्या आगमनाची साऱ्यांना प्रतीक्षा...दारावर हालचाल झाली तसे सगळेजण सावध झाले. बाहेर कसला तरी गलका सुरू होता.

the victory of 'rich'! | ‘श्रीमंतां’चा विजय असो!

‘श्रीमंतां’चा विजय असो!

Next

- नंदकिशोर पाटील

दादरच्या भवनातील दरबार आज खचाखच भरलेला...मंत्रिगण, सरदार, मनसबदार, वतनदार, पोद्दार वगैरे सगळे झाडून हजर... उद्धोमहाराजांच्या आगमनाची साऱ्यांना प्रतीक्षा...दारावर हालचाल झाली तसे सगळेजण सावध झाले. बाहेर कसला तरी गलका सुरू होता. ‘आम्हाला आत घ्या’ असा आग्रह धरलेले दहा-वीस नाणार ग्रामस्थ दरबारात घुसण्याचा प्रयत्न करत होते. पण चोपदारांनी त्यांना दारावरचं थोपवून ठेवलं होतं. पण ग्रामस्थ काहीकेल्या ऐकायला तयार नव्हते. शेवटी पोलिसांना पाचारण करावे लागले. नाणारवासीय गेले म्हणून सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. आता कोणत्याही क्षणी महाराजांचे आगमन होणार होते...सर्वजण सावध झाले. महाराजांची मॅरेथॉन मुलाखत घेतलेले संपादक कम खासदार महाशय आज भलतेच खुशीत होते. बहुधा महाराजांनी बक्षिशी दिली असावी. वस्तुत: या मुलाखतीचा सरकारवर काडीचा परिणाम झालेला नव्हता. तरीही, ‘अवघ्या मराठी मुलखात केवढी खळबळ माजलीय’, असं ते छातीठोकपणे सांगत असल्याने सर्वांची तेवढीच करमणूक झाली. चोपदारानं हाळी दिली. ‘बाआदब...बामुलाहिजा होशियारऽऽऽ माननीय उद्धोमहाराज पधार रहे है!’ तुतारीच्या रणभेरीत महाराजांचे दरबारात आगमन झाले. ‘श्रीमंतांचा विजय असो! विजय असो!!’ सर्वांनी वाकून कुर्निसात घातला. महाराज सिंहासनावर विराजमान झाले. सेक्रेटरीनं बैठकीचा अजेंडा वाचायला सुरुवात केली. तेवढ्यात महाराज गरजले, ‘थांबा!’ दरबारात शांतता पसरली. ‘काय झालं महाराज, आमचं काही चुकलं का?’ एका सरदारानं मोठ्या अदबीनं विचारलं. महाराजांनी चांगलंच खडसावलं, ‘श्रीमंतांचा विजय असो म्हणजे काय? कसले श्रीमंत? कोण श्रीमंत? श्रीमंत ही उपाधी फक्त आणि फक्त छत्रपतींनाच शोभून दिसते. आपण तर साधे पाईक आहोत!’
महाराजांच्या या खुलाशानं सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. मग समोरच्या रांगेत बसलेल्या एका उद्योगी मंत्र्यानं हातातील वर्तमानपत्र महाराजांपुढे धरलं.
महाराज: ‘हे काय?’
मंत्री: आपल्या श्रीमंतीचा पुरावा महाराज!
महाराज: आमच्या जायदादीचा तपशील चक्क पेपरात छापून आलाय? कुणी केली ही गद्दारी? कोण आहे तो सूर्याजी पिसाळ?
मंत्री: ‘एडीआर’ महाराज!
महाराज: कोण हा हरामखोर एडीआर? तात्काळ दरबारात हजर करा!
मंत्री: महाराज, एडीआर ही व्यक्ती नसून संस्था आहे!
महाराज: आजवर ईडी, सीबीआय ही नावं आम्ही ऐकून होतो. ही एडीआर काय भानगड आहे? तरी आम्हांस शंका होतीच. केंद्रात बसलेले लोक आमच्या मुळावर उठले आहेत. एक ना एक दिवस असा पाठीत खंजीर खुपसणारच!
मंत्री: महाराज आपला काही तरी गैरसमज झालेला दिसतोय. एडीआर ही सरकारी नव्हे, खासगी संस्था आहे!
महाराज: तरीही त्यांची ही शामत? आमच्या संपत्तीची माहिती त्यांना मिळालीच कशी?
मंत्री: क्षमा असावी महाराज. एडीआर म्हणजे ‘असोशिएशन आॅफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स’! या संस्थेनं आपला पक्ष देशातील सर्वांत श्रीमंत प्रादेशिक पक्ष असल्याचा अहवाल दिलाय!!
महाराज: हत्ऽऽतीच्याऽऽ..असंय व्हय..
आमची उगीच घाबरगुंडी उडाली!!

Web Title: the victory of 'rich'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.