विदर्भाची मागणी राजद्रोह कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:20 AM2018-05-09T00:20:31+5:302018-05-09T00:36:47+5:30
महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे.
महाराष्ट्र दिवसाच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भ राज्याचा मुद्दा परत ऐरणीवर आला आहे. परंतु यावेळी चर्चेची दिशाच वेगळीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. राज्य तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर राजद्रोहाची कारवाई व्हावी, अशी भूमिका शिवसेनेतर्फे घेण्यात आली आहे. तर विदर्भवाद्यांनीदेखील याला जोरदार प्रत्युत्तर देत झारखंड, उत्तरांखड व छत्तीसगडची निर्मिती हा राजद्रोह होता का असा सवाल केला आहे. तसे पाहिले तर विदर्भाचा मुद्दा हा ज्वलंत आहे. त्यामुळे मात्र राजकीय इच्छाशक्तीपेक्षा समाजाचे पाठबळ अशा आंदोलनांमध्ये जास्त आवश्यक असते. विदर्भवाद्यांकडून आंदोलने तर करण्यात येत आहेत, मात्र अद्यापही त्याला हवे तसे जनसमर्थन प्राप्त होऊ शकलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. यंदा विदर्भवाद्यांसोबतच महाराष्ट्रवादी किंवा शिवसेनेकडूनदेखील आक्रमक भूमिका घेण्यात आली. अगोदर विदर्भवादी नेते अॅड.श्रीहरी अणे यांच्या कार्यक्रमात झालेला गोंधळ आणि त्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी वापरलेली थेट राजद्रोहाचीच भाषा यामुळे विदर्भावरून राजकारण तापले आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एखादी गोष्ट राजद्रोह आहे की नाही, हे ठरविण्याची एक यंत्रणा असते. मात्र कुणी आपल्या भूमिकेच्या विरोधात मागणी करत आहे, म्हणून त्याला थेट राजद्रोही ठरविण्याची मानसिकता गेल्या काही काळात वाढीस लागली आहे. देशात वेळोवेळी यासंदर्भातील वक्तव्ये वाचाळवीर नेत्यांनी केली आहेत. शिवसेनेच्या नेत्यांनीदेखील नेमकी तीच री ओढली आहे. त्यामुळे शिवसेनेचा हा पवित्रा जनसामान्यांनादेखील फारसा रुचलेला नाही. ‘सोशल मीडिया’वर येणाºया प्रतिक्रियांमधूनदेखील हे जाणवून येत आहे. मुळात लोकशाही पद्धतीत कुणालाही मागणी करण्याचा अधिकार आहे. संविधानानेच ते स्वातंत्र्य दिलेले आहे. वेगळे विदर्भ राज्य ही काही एका व्यक्तीची मागणी नाही, तर विविध समूहांची भावना आहे. त्यामुळे या भावनेचा सन्मान अपेक्षित आहे. ज्याप्रमाणे विदर्भवादी वेगळ्या राज्याच्या निर्मितीची आवश्यकता का आहे हे सांगत आहे, त्याच धर्तीवर वेगळे राज्य का सोईचे नाही या प्रश्नाची ठोस उत्तरे महाराष्ट्रवाद्यांकडून येताना दिसून येत नाहीत. केवळ आक्रमक भाषा वापरली आणि टीकाटिप्पणी केली की जनतेच्या शंकांचे समाधान होत नसते. लोकशाहीत प्रत्येकाचा आदर करून आपली भूमिका मांडणे अपेक्षित असते. राजद्रोहाची भाषा वापरणाºयांनी ही बाब समजून घेतली पाहिजे.