Vidhan sabha 2019 : आमदार बनो, मंदी भगाओ

By संदीप प्रधान | Published: October 3, 2019 05:22 AM2019-10-03T05:22:54+5:302019-10-03T05:23:21+5:30

सदू आणि दादू चालूनचालून दमले. शेवटी, करवादून दादू सदूला बोलला की, अजून किती पक्षांची कार्यालयं फिरवणार आहेस? पायाचे तुकडे पडल्येत.

Vidhan sabha 2019: be a MLA & Shove off the recession | Vidhan sabha 2019 : आमदार बनो, मंदी भगाओ

Vidhan sabha 2019 : आमदार बनो, मंदी भगाओ

Next

- संदीप प्रधान

सदू आणि दादू चालूनचालून दमले. शेवटी, करवादून दादू सदूला बोलला की, अजून किती पक्षांची कार्यालयं फिरवणार आहेस? पायाचे तुकडे पडल्येत. सदू म्हणाला की, दादू प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे... युती तुटली असती आणि आघाडी विस्कटली असती, तर पायात गोळे येईस्तोवर पायपीट करावी लागली नसती. तरी बरं की, वंचित आघाडी फुटली, मनसे रिंगणात उतरली आणि राष्ट्रवादीला ढाळ लागली. दादू, सध्या देशात आर्थिक मंदी किती आहे, ते तू बघतोयस. पण, आपण तसं जाहीरपणे बोलू शकत नाही. बरोबर ना?

सदूनी तिरपा कटाक्ष टाकला. थकलेल्या दादूनं मान हलवली. आता जर आपली मंदी घालवायची असेल, तर मला आमदार होण्याखेरीज पर्याय नाही. सदूने दोन्ही हात हवेत हलवत निर्धार बोलून दाखवला. पण, आमदार झाल्याने मंदी कशी जाईल, दादूने चिडका स्वर कायम राखत प्रश्न केला. आता कसा मुद्द्यावर आलास, असे म्हणत सदूने दादूच्या खांद्यावर हात टाकला. २०१४ मध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा आमदारांचे पगार, भत्ते मिळून दरमहा त्यांना मिळत होते ८० हजार रुपये. त्यानंतर, राज्यात सत्तेवर आलेल्या कमळासारख्या कोमल हृदयाच्या सरकारनं सध्या आमदारांचा पगार नेऊन ठेवलाय दोन लाख ३२ हजारांच्या घरात. म्हणजे, दरवर्षी २४ टक्के पगारवाढ बरं का महाराजा. सदूनं दादूला खांद्याला धरून गदागदा हलवलं.

२००० साली चार हजार रुपये मूळ वेतन घेणाऱ्या आमदाराचं आताच मूळ वेतन आहे, फक्त एक लाख ८२ हजार २०० रुपये. सदू आनंदून सांगत होता आणि दादू डोळे विस्फारून पाहत होता. याखेरीज, आमदाराच्या पीएला २५ हजार पगार मिळतो, ३० हजार किमीचा रेल्वेचा तसेच बोटीचा, एसटीचा प्रवास फुकट, ३२ वेळा विमानानं राज्यात आणि आठ वेळा देशभरात फिरता येतं. प्रत्येक सदस्याला प्रत्येक टर्मला मोटार खरेदी करण्याकरिता १० लाखांचं कर्ज मिळतं आणि व्याज सरकार भरतं. शिवाय, दोन कोटींचा विकास निधी मिळतो. खासगी इस्पितळात उपचार घेतले, तरी ९० टक्के रक्कम परत मिळते. एका वर्षाकरिता १० लाखांचा आरोग्य विमा आहे. सदूला ही यादी सांगताना धाप लागली. दादू तोंडाच्या चंबूचा ‘आ’ वासून ऐकत होता.

आता समजा मी आमदार झालो आणि पाच वर्षांनंतर माजी झालो, तरी काही बिघडत नाही. मला ५० हजारांचे निवृत्तीवेतन मिळेल. समजा, मी दोन टर्म निवडून आल्यावर माजी झालो तर मी सेवा बजावलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षाकरिता दोन हजार रुपये याप्रमाणे दरमहा वेतन मिळेल. शिवाय, विद्यमान आमदारासारखे प्रवास, वैद्यकीय लाभ आहेतच. शिवाय, आमदार निवासात राहायला खोली मिळते. असं बरंच काही मिळतं, आमदार झाल्यावर. उगाच नाही बंडखोरी करून लोक एकमेकांच्या उरावर बसत. सदूच्या माहितीमुळे दादू मोबाइल चार्ज व्हावा, तसा चार्ज झाला. चल एबी फॉर्म मिळतोय का बघू. मी आमदार झालो की, आपली मंदी अशी चुटकीसरशी पळून जाईल, असे सदू बोलताच दोघे झरझर चालू लागले...

Web Title: Vidhan sabha 2019: be a MLA & Shove off the recession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.