एकांकिका स्पर्धा, अभिवाचन महोत्सवाद्वारे तरुणांच्या कलाविष्काराचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:36 AM2017-09-23T01:36:09+5:302017-09-23T01:36:11+5:30
कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.
- मिलिंद कुलकर्णी
कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात ग्रामीण महाराष्ट्रात प्रतिभावान कलावंतांची खाण आहे. संधी मिळेल, त्यावेळी हे कलावंत आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितात आणि क्षमता सिध्द करून दाखवितात. खान्देशातील कलावंतांनी आपल्या कामगिरीने असाच सुखद धक्का दिला आहे.
पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धे’साठी परिचित आहे. या संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातील सहा केंद्रांवर या स्पर्धा आयोजित करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. या केंद्रांवर पहिल्या आलेल्या तीन एकांकिकांना पुण्यात होणा-या अंतिम फेरीत सहभागाची संधी दिली जाते. जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासाठी केंद्र देण्यात आले आहे. मू.जे.महाविद्यालयाने सलग दुसºया वर्षी उत्तम आयोजन केले. एकूण १५ एकांकिका सादर झाल्या. एकांकिकांच्या विषयांची विविधता, तरुण कलावंतांचा अभिनय थक्क करणारा होता. स्त्री अत्याचार, मातृभाषेचे महत्त्व, वंशाच्या दिव्याचा आग्रह, प्रेमभंग, सामाजिक विषमता या विषयांसोबतच पुरुषप्रधान संस्कृती, फाळणी, विवाह पध्दती, वृध्दत्व, शहीद जवानावरून राजकारण, कलावंतांची होरपळ अशा वेगळ्या विषयांना हात घालण्यात आला. आपली तरुणाई किती व्यापक आणि व्यासंगीपणे जीवनाचा वेध घेत आहे, याचे हे सुचिन्ह म्हणावे लागेल. रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे हे बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी होते.
असाच आणखी एक साहित्यिक उपक्रम ‘परिवर्तन’ या प्रतिष्ठित संस्थेने ‘अभिवाचन महोत्सवा’च्या रूपाने घेतला. यंदाचे हे तिसरे वर्ष होते. रवींद्रनाथ टागोर, जयवंत दळवी, भालचंद्र नेमाडेंपासून तर प्रल्हाद जाधव, श्रीकांत देशमुख, कविता महाजन यांच्यापर्यंतच्या तब्बल १२ साहित्यिकांच्या कलाकृतींचे अभिवाचन या सप्ताहात करण्यात आले. रंगभूमीवरील कलावंतांसोबतच प्रथमच अभिवाचन करणाºया वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना देण्यात आलेली संधी हे या उपक्रमातील वेगळेपण होते. वाचन संस्कृती समृध्द करूया हे ब्रीदवाक्य या महोत्सवाने सार्थ ठरविले.
कवी गणेश चौधरी आणि साहित्यिक दिवाकर चौधरी यांच्या डांभुर्णी या गावातील योगेश पाटील या हरहुन्नरी दिग्दर्शकाने स्थानिक कलावंतांना सोबत घेऊन तयार केलेल्या ‘कंदील’ या लघुपटाला सात आर.सी. फिल्म फेस्टिव्हलमध्ये तृतीय बक्षीस मिळाले. १२०० लघुपटांच्या प्रवेशिकांमधून ‘कंदील’ची निवड झाली, यावरून या लघुपटाच्या उत्तम कलागुण आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांची कल्पना यावी. विशेष म्हणजे या लघुपटात काम केलेल्या एकाही कलावंताने यापूर्वी अभिनय केलेला नव्हता. त्यांची पूर्ण तयारी आणि प्रशिक्षण योगेश पाटील याने करवून घेतले. असाच एक गुणी कलावंत, दिग्दर्शक जळगावकर राहुल चौधरी याने मुंबईत केलेल्या संघर्षाचे चीज झाले. ‘बंदुक्या’ हा त्याने दिग्दर्शित केलेला पहिला व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित होताच जळगावकरांना आभाळ ठेंगणे वाटू लागले. परिवर्तनने त्याचा नागरी सत्कारदेखील केला. या घटना म्हणजे खान्देशातील कला प्रांताला ऊर्जितावस्था आणणाºया आहेत.