दृष्टिकोन - सनातन्यांच्या मनातील मनु अजूनही जिवंत आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 04:01 AM2019-12-25T04:01:47+5:302019-12-25T04:04:15+5:30
मनुस्मृती दहनाची कल्पना बाबासाहेबांनी मोठ्या कल्पकतेने राबविली होती
बी.व्ही. जोंधळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्र जातींचा उपमर्द करून त्यांचे आत्मबल नष्ट करणारी व स्त्रियांना हीन दर्जा देणारी मनुस्मृती जाळण्याचे क्रांतिकारी पाऊल महाडमध्ये २५ डिसेंबर १९२७ रोजी उचलून समतेच्या चळवळीत एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. त्या ऐतिहासिक घटनेस आता ९३ वर्षे झाली. आर्थिक विषमता, व्यावसायिक उच्चनीचता, सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतीतील असमानता व स्त्री-पुरुष विषमतेस धार्मिक व आध्यात्मिक आधार देणाऱ्या मनुस्मृतीचे दहन म्हणजे बाबासाहेबांची ती कृती प्रतीकात्मक स्वरूपाची होती.
बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे १९२७ साली कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे जे पहिले अधिवेशन महाड येथे झाले होते, त्या अधिवेशनात मनुस्मृती दहनाचा ठराव गंगाधर नीलकंठ तथा बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी मांडला होता. ठरावास पा.ना. राजभोज व एक सामाजिक कार्यकर्ते थोरात यांनी अनुमोदन दिले होते. या ठरावानुसार बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन सहस्रबुद्धे व अस्पृश्य साधूंच्या हस्ते करविले होते.
मनुस्मृती दहनाची कल्पना बाबासाहेबांनी मोठ्या कल्पकतेने राबविली होती, ती अशी की, मनुस्मृती दहनासाठी दहनभूमी तयार करण्यात आली होती. ही दहनभूमी तयार करण्यासाठी सहा कारागीर दोन दिवस राबत होते. सहा इंच खोल व सुमारे दीड फूट चौरस खड्डा खणून तो चंदनाच्या लाकडांनी भरून काढला होता. चार फूट उंचीचे चार खांब उभे केले होते. ‘मनुस्मृती दहनभूमी’, ‘अस्पृश्यता नष्ट करा’, ‘भिक्षुकशाही गाडून टाका’ वगैरे पताका चारी बाजूंनी लावल्या होत्या. २५ डिसेंबर १९२७ ला सकाळी ७ ते ७.३० च्या दरम्यान दहनविधी पार पडला. मनुस्मृतीच्या दहनानंतर तत्कालीन सनातनी वृत्तीच्या पत्रांनी व टीकाकारांनी बाबासाहेबविरोधी आगपाखड केली; पण गुलामगिरीच्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान मनुस्मृती या ग्रंथात आहे हे ओळखूनच बाबासाहेबांनी मनुस्मृती दहनाचे पाऊल उचलले होते, हे उघड आहे. यासंदर्भात ‘मनुस्मृती का जाळली?’ या शीर्षकाखाली ‘बहिष्कृत भारत’च्या ३ फेब्रुवारी १९२८ च्या अंकात संपादकीय स्फुट लिहिताना बाबासाहेबांनी म्हटले, ‘आम्ही जे मनुस्मृतीचे वाचन केले त्यावरून आमची खात्री झाली आहे की, त्या ग्रंथात शूद्र जातींची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तींचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढविणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून, असमतेची धुळवड मात्र घातली आहे. स्वयंनिर्णयाचे तत्त्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्यवर्गासही मान्य नाही, हे दर्शविण्यासाठीच महाड येथे त्याची होळी करण्यात आली आहे.’
बाबासाहेबांच्या मनुस्मृती दहनाच्या कृतीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना काहींनी म्हटले होते, ‘मनुस्मृती एक जुने बाड आहे, ते आता जाळण्यात काय अर्थ आहे?’ यावर बाबासाहेबांनी म्हटले होते, ‘मनुस्मृती जुने बाड आहे, असे आमच्या मित्रांप्रमाणे आम्हालाही म्हणता आले असते तर फार बरे झाले असते व आम्हासही मोठा आनंद झाला असता; परंतु दुर्दैवाने आम्हास तसे म्हणता येत नाही. कारण की, मनुस्मृतीने अस्पृश्यांना व स्त्रीवर्गास अमानुष विषम वागणूक देऊन त्यांच्या हातापायांत मनामनाच्या गुलामगिरीच्या बेड्या ठोकल्या आहेत.’ मनुस्मृती जुने चोपडे असल्यामुळे ते कशासाठी जाळायचे, असा प्रश्न ज्या सनातनी मनोवृत्तीने बाबासाहेबांना विचारला होता, ती मनोवृत्ती जाती-धर्मनिरपेक्ष-लोकशाही जीवनपद्धतीचा स्वीकार करणाºया आपल्या समाजातून नष्ट झाली आहे काय? फुले-आंबेडकरी चळवळीचा परिणाम म्हणून दलित समाज शिकू लागला. स्वाभिमानाने जगू लागला. स्त्रिया शिकू लागल्या. राजकारण-समाजकारणात वावरू लागल्या. नोकरी करू लागल्या. स्त्री-पुरुष समतेच्या घोषणा होऊ लागल्या. हे जरी खरे असले तरी मनुवाद प्रमाण मानून आजही सर्वत्र दलित स्त्रियांवर अत्याचार होतच असतात. मुलींच्या कौमार्य चाचणीची दुष्ट प्रथा पाळली जाते. महिला, दलित, विधवांना मंदिर प्रवेश नाकारला जातो. दलितांनी पायरीने वागावे आणि महिलांनी पायातील वहाण म्हणून राहावे, ही बुरसटलेली मनुवादी प्रवृत्ती बदलायला तयार नाही. स्त्रीजन्म पाप मानून मुली गर्भातच मारून टाकण्यात येतात. आंतरजातीय विवाह करणारांचे आॅनरकिलिंग होतात. मनुचे पुतळे उभारण्यात येतात. मनुस्मृतीच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन भारतीय संविधानाच्या प्रती जाळण्यात येतात. तात्पर्य, भारतीय समाजातून मनुवाद संपलेला नसून, तो जिवंतच आहे. मनुवादाविरुद्ध म्हणूनच प्रबोधनात्मक संघर्ष सर्व पातळ्यांवरून करण्याची गरजही तेवढीच मोठी आहे.
(लेखक दलित चळवळीचे अभ्यासक आहेत )