व्यंगचित्रांना जागतिक आयाम देणारा कलावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 06:01 AM2019-12-30T06:01:36+5:302019-12-30T06:03:29+5:30
सबनिसांची रेषेवर हुकमत होती, त्यांच्या रेषांची वेगळी शैली होती. व्यंगचित्रकलेला सबनीस यांच्या कार्यामुळे वेगळे आयाम प्राप्त झाले.
- चारुहास पंडित, व्यंगचित्रकार
जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये विकास सबनीस यांनी कलेचे धडे गिरविले होते. मात्र, तिथल्या अभ्यासक्रमात व्यंगचित्र हा विषय नव्हता, आजही नाही, परंतु अशा स्थितीतही पूर्णवेळ राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी आपली कारकीर्द घडविली, हे त्यांच्या आकस्मिक जाण्याने पुन्हा अधोरेखित झाले. त्यांची रेषेवर हुकमत होती, त्यांच्या रेषांची वेगळी शैली होती. व्यंगचित्रकलेला सबनीस यांच्या कार्यामुळे वेगळे आयाम प्राप्त झाले.
व्यंगचित्रकलेला खूप जुनी परंपरा आहे. हळूहळू व्यंगचित्रकला हिंदुस्थानात लोकप्रिय होऊ लागली. त्यातून ‘शंकर्स विकली’चे शंकर पिल्ले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण आणि विकास सबनीस असे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार तयार झाले. या व्यंगचित्रकारांवर डेव्हिड लो या मूळच्या न्यूझिलंडच्या व नंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या व्यंगचित्रकाराचा प्रभाव होता. सबनीस यांची व्यंगचित्रे, ‘मार्मिक’ साप्ताहिकातील व्यंगचित्रे पाहता-पाहता आमची व्यंगचित्रकारांची पिढी तयार झाली. त्यावेळी करमणुकीची साधने अतिशय मर्यादित होती. रेडिओ आणि फक्त टीव्हीच. त्यातही टीव्हीवरही एकच चॅनेल. त्यामुळे वाचनाची आवड टिकून होती. दैनिकांच्या पुरवण्या, वेगवेगळी विचारांची मेजवानी देणारी साप्ताहिके, मासिके वाचकांमध्ये कला साहित्याची आवड निर्माण करीत. त्यानंतर मोबाइल, त्यात व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम असे अॅप प्रकार आले आणि तरुण पिढी भरकटल्यासारखी झाली. कला साहित्याकडे पाहायला वेळ नाही, असे झाले. त्यामुळे आलेल्या जाहिरातींना प्राधान्य देण्याच्या नादात पहिल्या पानावरचे पॉकेट कार्टून आतल्या पानात केव्हा उडून गेले कळलेच नाही. मात्र, या ‘पॉकेट कार्टून’च्या जगात सबनीस यांचा हातखंडा होता. सबनीस यांची भेट व्हायची, तेव्हा कायम आपुलकीने विचारपूस करायचे. एखाद्याचे कार्टुन आवडेल तर त्याची मनमोकळी दाद द्यायचे. आवर्जून कौतुक करायचे. सर्व व्यंगचित्रकारांना एखादे चित्र सुधारण्यासाठी काय करायला हवे हेसुद्धा वेळोवेळी सांगायचे. एकप्रकारे ते मार्गदर्शकच होते.
व्यंगचित्रकलेसाठी लागणारे चांगले आदर्श, साधना, पूर्णवेळ व्यंगचित्रकार होण्यासाठी नोकरी न करता, झोकून देण्याच्या तयारीचा अभाव, यामुळे ज्यांनी या क्षेत्रात झोकून दिले, तेच दर्जेदार काम करताना, व्यंगचित्रे काढताना दिसू लागले. त्यातील सबनीस यांचे या क्षेत्रातील योगदान अमूल्य आहे. नव्या व्यंगचित्रकारांना योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याचे लक्षात आल्यामुळे विकास सबनीस व संजय मिस्त्री यांनी व्यंगचित्रकला कार्यशाळा चालू केल्या. दादरला शिवाजी पार्क येथील सावरकर स्मारक येथे हे वर्ग चालतात. त्याला आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. व्यावसायिक, पूर्णवेळ व्यंगचित्रकारांचे मार्गदर्शन, त्यांच्या अनुभवाचा लाभ मिळाल्यामुळे तरुणपिढी या क्षेत्राकडे गांभीर्याने पाहू लागली आहे, ही समाधानाची बाब आहे.
व्यंगचित्रांची सखोल जाण नसल्यामुळे उथळ व्यंगचित्रे निर्माण होतात. मराठी व्यंगचित्रकलेची एक मोठी उणीव म्हणजे, त्यात वैश्विकता नाही, अशी कायम ओरड होताना दिसते. मात्र, सबनीस यांनी त्यातही वेगळेपण जपून आपल्या कलाकृतींना जागतिक आयाम दिला.