ग्रामविकासाचा ‘विखे’ पॅटर्न

By Admin | Published: January 5, 2017 02:08 AM2017-01-05T02:08:27+5:302017-01-05T02:08:27+5:30

सत्तेत असो वा नसो. बाळासाहेब विखे यांच्याभोवती सतत माणसांची गर्दी होती. विरोधकांसोबत त्यांचा स्वकियांनाही दरारा होता. मुख्यमंत्री होण्याची सर्व क्षमता या नेत्यात होती.

'Vikhe' pattern of rural development | ग्रामविकासाचा ‘विखे’ पॅटर्न

ग्रामविकासाचा ‘विखे’ पॅटर्न

googlenewsNext

सत्तेत असो वा नसो. बाळासाहेब विखे यांच्याभोवती सतत माणसांची गर्दी होती. विरोधकांसोबत त्यांचा स्वकियांनाही दरारा होता. मुख्यमंत्री होण्याची सर्व क्षमता या नेत्यात होती. पण, कॉंग्रेसच्या दरबारी राजकारणात त्यांना संधी मिळाली नाही. विखेही त्यासाठी झुकले नाहीत.
माजी केंद्रीय मंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे नुकतेच निधन झाले. सत्तेत असो वा नसो काही माणसांभोवती सतत गर्दी असते, दरारा असतो, ते भाग्य व वलय बाळासाहेब विखे यांना लाभले होते. ते पस्तीस वर्षांहून अधिक काळ खासदार होते. आमदारकीची निवडणूक त्यांनी कधीही लढवली नाही. जिल्हा परिषद उपाध्यक्ष ते खासदार असा त्यांचा प्रवास होता. त्यांच्या खासदारकीचा असा की लोक त्यांना खासदार नसतानाही ‘खासदार साहेब’ म्हणूनच संबोधत.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचे अचूक नाडीनिदान करणारा नेता हीच खरी त्यांची ठळक ओळख सांगता येईल. प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना काढणारे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांचे बाळासाहेब हे वारसदार. पण, बाळासाहेबांनी सहकारासोबतच राजकारणात व शिक्षण क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली. लोणी येथे पहिले खासगी तंत्रनिकेतन उभारुन ग्रामीण महाराष्ट्रात खासगी शिक्षणाचा पाया त्यांनी घातला. या ‘प्रवरा मॉडेल’ मुळे खेड्यापाड्यातील मुलांनाही वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकीची दारे खुली झाली. पुढे हा पॅटर्न राज्यभर गेला. इतरांनी त्याचे अनुकरण केले. राज्यातील या शैक्षणिक क्रांतीचे श्रेय बाळासाहेबांना द्यावे लागेल. ते स्वत: पदवीधर नव्हते. पण, ग्रामीण महाराष्ट्राला आधुनिक शिक्षण मिळावे ही तळमळ होती.
संसदेसोबतच त्यांनी आपले गाव कधी सोडले नाही. ‘स्मार्ट ग्राम’ संकल्पनेचा जन्म अलीकडे झाला. पण तत्पूर्वीच ग्रामीण भागाला उर्जितावस्था आणण्यासाठी विखे पाटलांनी ती पावले उचलली होती. पाणी परिषद व नदी जोड प्रकल्पाची मांडणी करुन त्यांनी पाण्याच्या उपलब्धतेसाठी सरकारला काही पर्याय सुचविले. ग्रामीण विकास व आदिवासींबाबत संशोधनासाठी प्रवरा परिसरात खास काही संस्थांची निर्मिती केली. शेतकऱ्यांपर्यंत ज्ञान पोहोचावे यासाठी कम्युनिटी रेडिओ काढला. संत तुकारामांवरचे नाणे काढले. साहित्यिकांसाठी पुरस्कार सुरु केले. अभ्यासवर्ग काढले. सर्व क्षेत्रात त्यांनी चौफेर मुशाफिरी केली.
बाळासाहेब दीर्घकाळ संसदेत राहिले. पण, कॉंग्रेसने त्यांना साधे मंत्रिपदही दिले नाही. त्यासाठी त्यांना काही काळ शिवसेनेत जावे लागले. कॉंग्रेसमध्ये राजीव गांधींच्या विरोधात दबावगट काढणारे नेते असा शिक्का त्यांच्यावर मारला गेला. शंकरराव चव्हाण यांनी जी महाराष्ट्र समाजवादी कॉंग्रेस काढली. त्या कॉंग्रेसचे विखे अध्यक्ष होते. चव्हाण वगळता कॉंग्रेसमध्ये त्यांनी कुणाचे फारसे ऐकले नाही. शरद पवार व त्यांचे कधीच पटले नाही. पवारांना त्यांनी जाहीरपणे अनेकदा विरोध केला. १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांचे तिकीट कापले. त्यावेळी अहमदनगर मतदारसंघात कॉंग्रेसच्या यशवंतराव गडाख यांच्या विरोधात विखेंनी अपक्ष निवडणूक लढवली. ते पराभूत झाले. मात्र, या निवडणुकीत गडाख व पवारांनी केलेल्या आरोपांवरुन विखे न्यायालयात गेले. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केली. या निकालाने शरद पवार निवडणुकीतून सहा वर्षे अपात्र होण्याची वेळ आली होती. पण, सर्वोच्च न्यायालयात त्यांना दिलासा मिळाला. हा खटला तेव्हा देशात गाजला. संस्मरणीय झाला.
नगर जिल्ह्याच्या राजकारणात ‘विखे पाटील’ हाच एक पक्ष होता. गावोगाव त्यांचे सर्वपक्षीय समर्थक होते. त्यांना त्यांनी जपले. या जोरावर त्यांचा स्वपक्षात व विरोधकांतही दबदबा होता. हवामानाच्या अंदाजासारखाच ‘विखे पाटलांची भूमिका काय?’ हा अंदाज नेते घ्यायचे. प्रस्थापित व नात्यागोत्याच्या राजकारणाला त्यांनी शह दिला. सहकारी कारखाना काढताना पद्मश्री विखे म्हणायचे, ‘पोट भरलेल्याला घास भरविण्यात काय मतलब आहे? उपाश्याला तुकडा दिला तर तो खरा सहकार’. बाळासाहेबांचे राजकारण काहीसे असेच होते.
- सुधीर लंके

Web Title: 'Vikhe' pattern of rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.