विक्रम तो विक्रमच!
By admin | Published: January 7, 2016 11:25 PM2016-01-07T23:25:34+5:302016-01-07T23:25:34+5:30
‘क्रिकेट इज अ गेम आॅफ चान्स’ अशी मुळात म्हणच आहे. त्यामुळे संधी प्राप्त होत नसेल तर गावस्कर किंवा तेंडूलकरदेखील शून्यावर बाद होतात आणि झालेही आहेत
‘क्रिकेट इज अ गेम आॅफ चान्स’ अशी मुळात म्हणच आहे. त्यामुळे संधी प्राप्त होत नसेल तर गावस्कर किंवा तेंडूलकरदेखील शून्यावर बाद होतात आणि झालेही आहेत. ‘कॅचेस वीन मॅचेस’ ही याच खेळ प्रकारातली आणखी एक म्हण. त्यामुळे एखाद्या फलंदाजाने उडवलेले झेल प्रतिस्पर्धी संघाला झेलता आले नाहीत आणि फलंदाजाने मन:पूत धावा कुटून काढल्या तर त्याच्या फलंदाजीचे किंवा त्याने काढलेल्या धावा यांचे महत्व कमी होत नाही. त्यामुळे प्रणव धनावडे या पंधरा वर्षीय किशोराने नाबाद १००९ धावांचा जो विश्वविक्रम केला त्याच्या या विक्रमाचे महत्व कमी करण्यासाठी त्याने उडवलेले २१ झेल क्षेत्ररक्षकांना टिपता आले नाहीत म्हणून तो विश्वविक्रम करु शकला असा दावा करणे किमान ‘स्पोटर्््समनशिप’मध्ये तरी बसत नाही. मुंबई क्रिकेट संघटना दर वर्षीच शालेय स्तरावरील मुलांसाठी एच.टी.भंडारी चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करीत असते. त्याच स्पर्धेच्या अंतर्गत ठाण्यामध्ये के.सी.गांधी स्कूल आणि आर्य गुरुकुल यांच्यात जो सामना झाला त्या सामन्यात के.सी.गांधीच्या वतीने खेळताना प्रणवने आपला विश्वविक्रम रुजू केला. त्याच्या या विक्रमाचे मोल कमी करण्यासाठी म्हणूनच की काय आर्य गुरुकुलच्या प्रशिक्षकांनी अनेक सबबी पुढे केल्याचे प्रसिद्ध झाले आहे. आपण तयार केलेल्या संघातील सहा मुले दहावीची परीक्षा असल्याने खेळू शकत नव्हते व त्यामुळे स्पर्धेतून माघार घेतली असती तर पुढील वर्षी आम्हाला प्रवेश नाकारला गेला असता त्यामुळे जेमतेम बारा वर्षीय मुलाना ऐनवेळी मैदानावर उभे केल्याचे या प्रशिक्षकानी म्हटले आहे. आयत्या वेळी ज्यांना मैदानावर आणले त्यांनी टेनीस बॉलवरच तोपर्यंत खेळ केला होता आणि कातडी चेंडू त्यांच्यासाठी नवखा आणि अडचणीचा होता असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांचे हे कथन खरेही असेल पण मग येथेच क्रिकेट हा संधीचा खेळ असतो या म्हणीची सत्यता लक्षात येते. तरीही या प्रशिक्षकाने जे म्हटले त्याकडे साफ दुर्लक्ष करणेही किमान प्रणवच्या दृष्टीने धोकेदायक ठरु शकते. विशेषत: तेंडूलकर मिळाला किंवा गावस्कर सापडला अशा विशेषणांनी त्याला आत्ताच डोक्यावर घेणे समंजसपणाचे नाही. कारण याआधी अशाच काही विक्रमवीरांवरील अवास्तव स्तुतीसुमनांनी त्यांची कारकीर्द पुरेशी फुलण्याआधीच कोमेजून गेली होती.