...आस विक्रमाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 03:06 PM2018-09-11T15:06:01+5:302018-09-11T15:31:21+5:30
एखादा विक्रम करायचा म्हटला तर कल्पना सुचण्यापासून तो अंमलात येईपर्यंतचा मोठा प्रवास असतो. विक्रम एकटी व्यक्ती करीत असो की, सामूहिक रीत्या करावयाचा असो, त्यासाठी नियोजनबध्द, शिस्तबध्द कृतीकार्यक्रम लागतोच. त्यासाठी अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागतेच. तसेच दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि ध्येयवेडेपणा लागतो, त्याशिवाय विक्रम घडत नाही.
- मिलिंद कुलकर्णी
एखादा विक्रम करायचा म्हटला तर कल्पना सुचण्यापासून तो अंमलात येईपर्यंतचा मोठा प्रवास असतो. विक्रम एकटी व्यक्ती करीत असो की, सामूहिक रीत्या करावयाचा असो, त्यासाठी नियोजनबध्द, शिस्तबध्द कृतीकार्यक्रम लागतोच. त्यासाठी अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागतेच. तसेच दुर्दम्य इच्छाशक्ती, आशावाद आणि ध्येयवेडेपणा लागतो, त्याशिवाय विक्रम घडत नाही.
जळगाव शहर अशाच दोन विक्रमांची अनुभूति घेणार आहे. पहिला विक्रम आहे, प्लॅस्टिकच्या एक लाख बाटल्यांपासून गणपतीचे म्यूरल साकारण्याचा...खान्देश कॉलेज आॅफ एज्युकेशन या संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि डॉ.जी.डी.बेंडाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकलव्य क्रीडा संकुलाच्या दीड एकर मैदानावर ५० विद्यार्थी ३६ तासांमध्ये हा विक्रम साकारत आहेत. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपासून म्युरल उभारणीस सुरुवात झाली आहे. तीन दिवसांपासून विद्यार्थी या रिकाम्या बाटल्यांमध्ये रंगीत पाणी भरत होते. पर्यावरण संवर्धनाला हातभार म्हणून हाती घेतलेल्या या उपक्रमाची दखल दिल्लीच्या इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस् व फरिदाबाद येथील एशिया बुक आॅफ रेकॉर्डस् यांनी घेतली आहे. १२ रोजी हा उपक्रम यशस्वी झाला तर त्याची विक्रम म्हणून नोंद होईल. जळगावचे नाव जागतिक पातळीवर पोहोचेल.
असाच दुसरा विक्रम साकारणार आहे, २१ डिसेंबर रोजी. नवनवीन उपक्रम हाती घेणाऱ्या मराठी प्रतिष्ठानने या मातीचे ऋण फेडण्यासाठी जळगावचा अभिमान आणि ओळख असलेल्या वांग्याचे भरीत जागतिक पातळीवर पोहोचविण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी प्रसिध्द शेफ विष्णू मनोहर यांची मदत घेतली आहे. तब्बल २५०० किलो भरीत बनविण्याचा विक्रम गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहे.
भरीताच्या वांग्यांसाठी प्रसिध्द असलेल्या बामणोद (ता.यावल) येथून ३२०० किलो वांगे आणले जातील. भरीत बनविण्यासाठी लागणारी सामुग्रीसुध्दा निश्चित झाली आहे. १२० किलो शेंगदाणा तेल, १०० किलो मिरची, ५० किलो लसूण, २० किलो शेंगदाणे, ५ किलो जिरे, १०० किलो कोथिंबीर, २५ किलो जाड मीठ असे जिन्नस लागेल.
जळगावातील मध्यवर्ती मैदान असलेल्या सागर पार्कवर हा विक्रम साकारणार आहे. त्यासाठी ४००० किलो वजन पेलणारी चूल बनविण्यात येणार आहे. ४५० किलो वजन, १० बाय १० फूट आकार व तीन फूट खोलीची कढई बनविण्याचे काम कोल्हापुरात सुरु झाले आहे. ११ फूट लांबीचा सराटा असेल.
सकाळी ५ वाजेपासून वांगे भाजायला सुरुवात होईल. त्यासाठी ६ ट्रॅक्टर तूरकाठ्या (तुरीच्या काड्या), २ ट्रॅक्टर डाळींबाच्या काड्या, ५ ट्रॅक्टर सरपण लागेल.
भरीत बनविण्यातील स्थानिक तज्ज्ञ देवराम भोळे, दत्तात्रय चौधरी यांचे सहकार्य यावेळी घेतले जाणार आहे. त्याशिवाय ६० महिला, ४० पुरुष, २० पर्यवेक्षक आणि दोन मुख्य निरीक्षक असा लवाजमा सोबत राहील.
केळी आणि भरीताचे वांगे ही जळगावची ओळख आहे. परंतु दोघांच्या नशिबी भोग आहेत. केळी हे फळ आहे. पण शासकीय भाषेत त्याला फळाचा दर्जा मिळत नाही. कारण आंबा किंवा इतर फळांची झाडे असतात. त्यांना दरवर्षी फळे येतात. तर केळीचे झाड हे वर्ष -दोन वर्षांनी नव्याने लागवड करुन उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शासकीय योजनांचे लाभ केळी उत्पादक शेतकºयाला फारसे मिळत नाही. केळी हे नाशवंत फळ असल्याने त्याच्या निर्यातीवर बंधने आहेत. प्रक्रिया उद्योगाविषयी शासकीय व सहकार पातळीवर मोठी उदासीनता आहे.
तीच स्थिती भरीताची आहे. केवळ हिवाळ्यातील तीन महिने भरीताचा हंगाम असतो. त्याकाळात बाहेरील पाहुणे खास जळगावात येतात. हुरडा पार्टीसारख्या भरीताच्या पार्टी शेत, मळ्यात होतात. वर्षभर वांग्यांचे उत्पादन आणि त्याची परराज्य व परराष्टÑात निर्यात होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘बेंगन भरता’ हा मेनू असतो, मात्र ती वांगी भरीताची नसतात. भाज्यांची असतात. हे शेफ विष्णू मनोहर यांनी ओळखले आणि विश्वविक्रमाच्या माध्यमातून जळगावच्या भरीताची ओळख जागतिक पातळीवर करुन देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.