भाष्य - टेनिसविश्वातील विक्रमादित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2017 12:12 AM2017-09-14T00:12:01+5:302017-09-14T00:13:35+5:30

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे टेनिसविश्वातील दोन विक्रमादित्य. टेनिसमधील प्रतिष्ठेची असलेली ग्रँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे हे दोन विक्रमवीर खेळाडू. सुमारे दशकभर टेनिसविश्वावर आपली हुकूमत राखलेल्या फेड आणि राफा यांना नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांनी आव्हान उभे केले.

Vikramaditya in tennis world | भाष्य - टेनिसविश्वातील विक्रमादित्य

भाष्य - टेनिसविश्वातील विक्रमादित्य

Next

रॉजर फेडरर आणि राफेल नदाल हे टेनिसविश्वातील दोन विक्रमादित्य. टेनिसमधील प्रतिष्ठेची असलेली ग्रँडस्लॅम स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकणारे हे दोन विक्रमवीर खेळाडू. सुमारे दशकभर टेनिसविश्वावर आपली हुकूमत राखलेल्या फेड आणि राफा यांना नोव्हाक जोकोविच आणि अँडी मरे यांनी आव्हान उभे केले. नुसते आव्हानच उभे नाही केले, तर फेड-राफाच्या वर्चस्वाला सुरुंगही लावला. यामुळे, टेनिसप्रेमींनाही फेड-राफाच्या पलीकडेही काही खेळाडू असल्याची जाणीव व्हायला लागली. दशकभर आपला दबदबा राखलेल्या फेड-राफा या जोडीला जोको-मरे यांनी चांगलेच जेरीस आणले. यानंतर कोणतीही स्पर्धा असली की त्या स्पर्धेचा उपांत्य व अंतिम सामना या चार खेळाडूंमध्येच व्हायचा. यातही बहुतेकदा जोको किंवा मरे बाजी मारायचे. त्यामुळेच, २०१२ साली सातवे विम्बल्डन जिंकलेल्या फेडरर आणि २०१४ साली नववे फ्रेंच ओपन जिंकलेल्या नदाल यांचा खेळ संपला असल्याची चर्चा सुरू झाली. त्याचदरम्यान, या दोन्ही दिग्गजांना दुखापतींनी ग्रासले. याचा परिणाम त्यांच्या क्रमवारीवर झाला आणि जोको-मरे यांचा धडाका सुरू झाला. जे वर्चस्व फेड-राफा यांनी राखले तीच मालिका जोको- मरे यांनी पुढे कायम ठेवली. त्यामुळे, फेड आणि राफा यांच्या निवृत्तीच्याही चर्चा रंगल्या. पण, सहजासहजी हार पत्करणारे हे सम्राट नव्हते. या दोघांनी सर्वप्रथम आपल्या दुखापतींकडे लक्ष देऊन काही स्पर्धा टाळल्या आणि दिमाखात पुनरागमन केले. नुसते पुनरागमन केले नाही, तर पुन्हा एकदा आपल्या जुन्या धडाक्यासह स्वत:च्या आगमनाची वार्ता टेनिसविश्वाला दिली. पुनरागमन कसे करावे आणि जिद्द कशी असावी याचा धडा फेड आणि राफा यांनी संपूर्ण क्रीडाविश्वाला दिला. या जोरावरच फेडररने चार वर्षांचा, तर नदालने अडीच वर्षांचा ग्रँडस्लॅम जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यात यश मिळवले. यंदाच्या वर्षात प्रत्येकी दोन ग्रँडस्लॅम जिंकलेल्या फेडरर, नदाल यांनी आपल्या दुसºया इनिंगची जबरदस्त सुरुवात केली आहे. आता, या विक्रमादित्यांच्या आव्हानाला सामोरे जात जोको आणि मरे दुखापतीतून स्वत:ला कसे सावरतात याकडे टेनिसविश्वाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vikramaditya in tennis world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा