माणुसकीच्या गावात

By admin | Published: February 28, 2017 11:54 PM2017-02-28T23:54:32+5:302017-02-28T23:54:56+5:30

खळेगाव या छोट्याशा गावाने अनाथालयासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले.

In the village of Manusaki | माणुसकीच्या गावात

माणुसकीच्या गावात

Next


खळेगाव या छोट्याशा गावाने अनाथालयासाठी प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले. प्रत्येक हाताने दिलेला रुपया आणि प्रत्येक उंबरठ्यावरून किमान मूठभर मिळालेले धान्य हेच त्याचे मूल्य. ते पैशांत थोडेच मोजता येणार?
ओंकार म्हणतो, मला पोलीस व्हायचंय... पायल म्हणते, मला डॉक्टर होऊन आजारी लोकांना बरं करायचं आहे... शुभम म्हणतो, मिलिट्रीमध्ये जाऊन देशाची सेवा करायची आहे... ही स्वप्ने आहेत सहारा अनाथालय परिवारातील मुलांची. चिमुकल्यांचे कुठलेही स्वप्न पूर्ण करण्याचे बळ त्यांना त्यांचे आई-बाप देतात. कुटुंबीय देत असतात. यांना तर आई ठाऊक नाही अन् बापही माहीत नाही. मग त्यांच्या स्वप्नांचे काय? बीड जिल्ह्यातील संतोष आणि प्रीती गर्जे या दांपत्याने अशा ८५ बालकांच्या पंखांना बळ दिले. या बालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच १३ वर्षांपासून हे दांपत्य धडपडत आहे. गेवराई तालुक्यातील ‘बालग्राम’ हे माणुसकीचे गाव गेल्या आठवड्यात जवळून अनुभवता आले.
बीड जिल्ह्यातील पाटसरा या खेड्यातील गरीब मजूर ऊसतोड शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या संतोषला मोठ्या बहिणीचा बाळंतपणात झालेला मृत्यू अस्वस्थ करून गेला. तिच्या लहान मुलीचा सांभाळ मी करेन. पण इतरांचे काय? बहिणीच्या मुलीवर अचानक कोसळले तसे आभाळ इतर कोणावर कोसळू नये, त्यांच्या आयुष्यात पोरकेपणा येऊ नये म्हणून वयाच्या १९व्या वर्षीच म्हणजे २००४ साली संतोषने सहारा परिवाराची सुरुवात केली. समाजातील अनाथ, निराधार निराश्रित, बेघर, वंचित, उपेक्षित, पीडित, गरीब मुलांची अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण ही जबाबदारी घेतानाच त्यांचे पुनवर्सन करण्याची जबाबदारी संतोषने उचलली. गेवराईपासून ३ कि.मी. अंतरावर तीन एकराच्या कॅम्पसमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात हे अनाथालय वसले आहे. या परिवारात वय वर्षे तीनपासून १८ वर्षांपर्यंतची मुले राहतात आणि खासगी शाळेत शिक्षण घेतात.
‘हम दो, हमारे दो’च्या या जमान्यात ८५ मुलांचा सांभाळ करणे तसे कठीणच. संतोष ते करतो. तो म्हणतो, यांना घडविताना आम्हाला एक हात तुमचा लागणार आहे. भविष्याची स्वप्न दाखविताना तुमची दूरदृष्टी मागणार आहे. यांच्या पंखांना बळ देण्यापूर्वी त्यांना तुमची भरारी दाखविणार आहे. सुजाण नागरिक घडविताना आम्ही तुमचाच आदर्श पुढे ठेवणार आहोत. आम्ही स्वप्न बघत आहोत एका सुसंस्कृत समाजाचे, जिथे आयुष्य ओझं वाटणार नाही. जगण्याचा धाक वाटणार नाही. जीवन असेल एक आनंददायी प्रवास. या प्रवासात अनाथ लेकरांच्या जीवनाला आकार देण्यासाठी आम्हाला आपली साथ हवी आहे... संतोषच्या या हाकेला साथ कोणी दिली? गेवराईपासून पुणे-मुंबईपर्यंत ती अनेकांनी दिली. म्हणूनच बालग्राममध्ये हा ८५ लेकरांचा संसार सुरू आहे. तो आनंदात सुरू आहे असे नक्कीच म्हणता येणार नाही. अनेक गोष्टी आहेत ज्या करता येत नाहीत. अनाथालयातील ५० मुलींसाठी वेगळी इमारत बांधायची आहे. संगणक कक्ष, प्रयोगशाळा, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र, वाचनालय, अन्नपूर्णा सदन, अतिथी भवन, असे अनेक प्रकल्प उभारायचे आहेत. गरज आहे ती मदतीचे अनेक हात पुढे येण्याची. हीच जाणीव ठेवून गेवराई तालुक्यातील खळेगाव या छोट्याशा गावाने गेल्या आठवड्यात प्रत्येक घरातून एक रुपया आणि थोडे-थोडे धान्य जमा केले. तब्बल ३ हजार रुपये आणि चार क्विंटल धान्य जमा झाले. राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमात ही मदत संतोषच्या हवाली करण्यात आली. ही मदत फार मोठी वाटणार नाही कदाचित. गावातील प्रत्येक हाताने दिलेला एक रुपया आणि प्रत्येक उंबरठ्यावरून किमान मूठभर मिळालेले धान्य हेच त्याचे मूल्य. ते पैशांत थोडेच मोजता येणार? इतरांना देण्यासाठी स्वत:कडे खूप असावे लागते, असे अजिबात नाही. तुमच्याकडे काय आहे, यापेक्षा काय देण्याची दानत आहे, यावरच सारे काही अवलंबून असते. म्हणूनच तर खळेगावसारख्या सर्वसामान्य गावाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. माणुसकीच्या अशा अनेक गावांची आज गरज आहे. जशी ती गेवराईच्या संतोषला आहे तशी ती अनेक अनाथालयांना आहे. या माध्यमातून अनाथालयांप्रति आणि त्यात राहणाऱ्या बालकांप्रति गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली ही भावना खूप महत्त्वाची आहे. माणूस माणसांपासून दूर जात असलेल्या या जगात सामाजिक स्वास्थ्यासाठी हेच तर हवे आहे.
- सुधीर महाजन

Web Title: In the village of Manusaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.