विनोदरंगात रंगला...
By Admin | Published: November 21, 2014 12:46 AM2014-11-21T00:46:22+5:302014-11-21T00:46:22+5:30
श्रीरंग गोडबोले माझ्या आयुष्यात कसा आला, कधी आला, हे मला तपशीलवार सांगता येईल.
संजय मोने
(प्रसिद्ध अभिनेते व लेखक)
श्रीरंग गोडबोले माझ्या आयुष्यात कसा आला, कधी आला, हे मला तपशीलवार सांगता येईल. अगदी तारीख, वार, दिवस, महिना आणि सन यांसकट सांगता येईल. निर्णयसागर पंचांग आणि टिळक पंचांग यातल्या भिन्न तिथींनुसार सांगता येईल. शिवाय, विक्रम संवत् आणि बनिया लोकांच्या चोपडीपूजनानुसार जे काही वर्ष असेल तेही मी सांगू शकेन; पण आधी म्हटलं तसं तो फक्त तपशील होईल. अर्थात, एखाद्या माणसाचे जर व्यक्तिरेखन करायचं असेल तर हा तपशील सगळेच सांगतात. कारण त्यानं तो लेख फुगतो आणि लेखकाची स्मरणशक्ती किती तीव्र आहे, हे जाताजाता सुचवता येते. याला कारणीभूत आपला इतिहास आहे. इतिहास म्हणजे शाळेतला इतिहास हा विषय. आपण इतिहास तब्बल शंभर मार्कांचा विषय म्हणून शिकतो आणि नंतरच्या आयुष्यात इतिहासापासून आपण काहीच शिकलो नाही, अशी खंत व्यक्त करणारा, पाच-दहा हजार रुपयांच्या नुकसानभरपाईवर बोलणारा एखादा वक्ता आपल्या सगळ्या अभ्यासावर बोळा फिरवून जातो. (माफ करा! नुकसानभरपाई हा शब्द चुकून वापरला.. मानधन असं म्हणायचं होतं.) आणि मग आपल्याला प्रश्न पडतो आपण का शिकत होतो?
श्रीरंग ऊर्फ रंगा हा पुढे प्रसिद्ध होणार, हे फार लहानपणीच ठरलं होतं कारण त्याच्या श्रीरंग या नावापुढे ऊ र्फ या संबोधनानं जोडणारं रंगा किंवा रंग्या हे अजून एक नाव होतं. जसं विश्वनाथ ऊर्फ नाना पाटेकर किंवा सी. ऊर्फ अण्णा रामचंद्र किंवा.. सुधीर फडके ऊ र्फ बाबुजी. इथून पुढची यादी प्रत्येकानं आपापल्या मगदुराप्रमाणे वाढवावी. तो आणि मी शाळेत होतो तेव्हा आम्ही प्रथम भेटलो. माझा पार लहानपणापासूनचा आणि आजही मित्र असलेला धनंजय गोरे याचा तो मामेभाऊ (मी आणि धनंजय याची मैत्री आजही टिकून आहे, याचं श्रेय संपूर्णपणे त्याला.) पहिल्याच भेटीत तो माझ्या स्मरणात राहिला वगैरे काही झालं नाही. नंतर एकदोनदा मी पुण्याला गेलो होतो, तेव्हा तो मला खडकीला त्याच्या कॉलेजात भेटला. तिथं त्यानं खडकीची एक वेगळी भाषा कशी बोलली जाते, हे मला दाखवलं होतं. तिथं पहिल्यांदा त्याची विनोदाची जात मला आवडली. त्याच्याकडे आज असे अनेक किस्से आहेत; पण तिथे कदाचित त्याची सुरुवात झाली असावी. तो तसा इंजिनिअर आहे, अशी त्याला अंधूक शंका आहे, कारण ते शिक्षण त्यानं घेतलं आहे म्हणून. तो वारंवार भेटत राहतो ते त्याच्या अफाट विनोदामुळे, त्याच्या हुशारीमुळे. त्याच्या विनोदाचा म्हणून एक ठसा आहे. आपल्याकडे गंभीर विषयाला न वाहिलेली किंवा ज्यांचं लेखन कुणी गंभीरपणे घेत नाही (बहुतेक वेळा ते त्याच लायकीचं असतं) त्याला विनोदी लेखक म्हणतात. साधारण ‘चिंतोपंत स्वर्गात जातात’ किंवा ‘भाल्याची भंबेरी’ छापाचे लेख किंवा पुस्तक तुमच्या नावावर असले, की तुम्ही ते तसे लेखक बनता. रंग्याचा विनोद हा अत्यंत तिरकस, पण कुणालाही न दुखावणारा आणि त्याची असामान्य हुशारी ठायीठायी दाखविणारा असतो. त्याची नाटकं, एकांकिका त्याच्या मालिका हे वारंवार सिद्ध करीत आल्या आहेत. साहित्याच्या माफिया टोळ्या आहेत त्यातल्या कुठल्याही टोळीत तो सहभागी नाही, म्हणूनच त्याला आज जितकी मान्यता मिळायला हवी, तितकी मिळालेली नाही. त्याच्या मालिका आणि नाटकं लोकप्रियतेच्या लाटेवर असून, आज एक लेखक म्हणून त्याला लेखणीनंच नव्हे तर चेहऱ्यानं ओळखतात, हे माहीत असून मी हे विधान करतोय, कारण आपण ‘लेखक’ आहोत ‘लेखक’! असा आविर्भाव त्याच्याकडे नाही. जाणिवा, नेणिवा, मांदियाळी वगैरे शब्द न वापरता तो फार उत्तम मांडत आला आहे. फार पूर्वी त्यानं काही मित्रांसोबत मिळून ‘कट्टा’ नावाचं एक अनियतकालिक प्रकाशित केलं होतं. एका अंकानंतर सहा महिन्यांनी दुसरा अंक, तर तिसरा लगेच त्याच दिवशी काढायचा हे सुचायलाच एक वेगळी वृत्ती लागते. जी आज महाराष्ट्रात उरली नाही. पूर्वी ललित मासिक जसं होतं त्या तोडीचा ‘कट्टा’ होता. आता साहित्यावर काही लिहिण्यासारखं उरलं नाही, कारण सर्वसामान्य लोकांचा त्यातला रस उडाला आहे. पण, जर ‘ठणठणपाळ’सारखं सदर आज लिहायचं झालं, तर माझ्या दृष्टीनं रंगा हा एकमेव आहे, जो ते लिहू शकेल, कारण असूया हा गुण(?) त्याच्यात नाही. या पूर्ण लेखात मी रंगाच्या साहित्यिक कर्तृत्वाचा तपशील दिला नाही, कारण तो तुम्ही शोधून काढा, आज विनोदाची गरज आपल्याला आहे.
थोडक्यात सांगायचं, तर मी पाहिलेल्या, शब्द लिहताना अत्यंत वेदना होत आहेत पण तरी लिहितो, मला ‘भावलेल्या’ काही अत्यंत हुषार व्यक्तींपैकी रंगा गोडबोले आहे हे निर्विवाद. (यावर वाद करायला अनेक लोक उत्सुक असतील; पण माझं आधीच ठरलेलं आहे त्यात बदल होणार नाही. धन्यवाद!)