धर्म नष्ट झाल्याशिवाय हिंसा थांबणार नाही

By admin | Published: September 6, 2015 04:39 AM2015-09-06T04:39:49+5:302015-09-06T04:39:49+5:30

‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देताना त्याचा जीवच घेण्याची ही अजब तऱ्हा एकूणच वैचारिक प्रगतीला किती मोठ्या प्रमाणात खीळ घालते आहे याचे भान आज कुणालाही नाही. त्यामुळे आता माणसांना

Violence will not stop unless religion is destroyed | धर्म नष्ट झाल्याशिवाय हिंसा थांबणार नाही

धर्म नष्ट झाल्याशिवाय हिंसा थांबणार नाही

Next

- राजन खान

‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर देताना त्याचा जीवच घेण्याची ही अजब तऱ्हा एकूणच वैचारिक प्रगतीला किती मोठ्या प्रमाणात खीळ घालते आहे याचे भान आज कुणालाही नाही. त्यामुळे आता माणसांना जगायला धर्माची आवश्यकता राहिलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. धर्माच्या जिवावर जगणारे जे कोणी फुकटे आहेत, ज्यांना स्वत:च्या कष्टावर जगायची इच्छा नाही अशाच लोकांनी धर्म नावाची गोष्ट लावून धरली आहे. तर या सगळ्या फुकट्या धर्ममार्तंडांना सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळी कामात जुंपले पाहिजे; आणि लोकांनो, तुमच्या घामावर तुम्ही जगा, असे सांगितले पाहिजे. तेव्हाच या जगातून धर्मांचा नायनाट होईल आणि जग हिंसामुक्त होईल.

विचारांच्या विरोधात शस्त्र वापरण्याची परंपरा मानवी समाजाला नवी नाही. समाज आपल्या ताब्यात राहिला पाहिजे असे वाटणाऱ्या लोकांना केवळ हिंसेचा वापर करणेच माहीत असते. ज्यांच्यामुळे समाज कणाकणाने पुढे जाण्याची शक्यता असते, त्यांना अशा रीतीने मृत्यूला सामोरे जावे लागणे हा किती पराकोटीचा पराभव आहे, अशी आजची स्थिती आहे. आता आपण आधुनिक समाजात जगतो आहोत. जो समाज विज्ञानाधिष्ठित आहे. यात विचार मारणे ही विकृती आहे. आणि भारतासारख्या देशात विचार स्वातंत्र्याची तरतूद करूनसुद्धा अशी कृत्ये घडतात, हे अपमानास्पद आहे. घटनाकारांनी जात, धर्म आणि श्रद्धा स्वातंत्र्याचा समावेश घटनेत केला आहे. हे त्यांचे उदात्त उपकार आहेत, असे आपल्याला म्हणायला हरकत नाही. हे उदात्त विचार समजण्याच्या लायकीचा समाज आहे, असे मला वाटत नाही. हे उपकार कसे वापरायचे याची धड अक्कलही आपल्या समाजाला नाही. किंबहुना, या उपकारांचा गैरवापर करणे आणि मिळालेल्या स्वातंत्र्याचा अतिरेक करणे अशी परिस्थिती सध्या समाजात आहे. समाजाला घटनेचे सोयर - सुतक वाटत नाही. आपल्याकडे असणारी घटना दुरुस्तीची तरतूद वापरून त्यातील धर्मनिरपेक्ष लोकशाहीचे तत्त्व कायम ठेवून बाकी धर्म, जात आणि श्रद्धा स्वातंत्र्य काढून घेण्याची वेळ आली आहे.
समाजात, शांततेसाठी धर्माची स्थापना झाली आहे, असे म्हटले जाते. मात्र हे लोक दुसऱ्यांच्या विचारांचा नायनाट करण्यासाठी शस्त्रांचा वापर करतात. ज्या दिवशी ही धर्म नावाची काल्पनिक आणि थोतांड गोष्ट नष्ट होईल त्याचवेळी या जगातील विकृत हिंसा थांबेल.

पुढील काळ भयावह...
हे वातावरण अधिकाधिक तीव्र होणे काठी मूठभरांना आवश्यक वाटते. तरीही बहुसंख्येने त्याविरोधात असलेले सगळे जण गप्प बसणार असतील तर यापुढील काळ किती भयावह असेल, याची कल्पना येऊ शकते.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
- शब्दांकन : स्नेहा मोरे

Web Title: Violence will not stop unless religion is destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.