वीरश्रीची इतिश्री!

By admin | Published: January 6, 2016 11:18 PM2016-01-06T23:18:26+5:302016-01-06T23:18:26+5:30

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस

Virashree antishri! | वीरश्रीची इतिश्री!

वीरश्रीची इतिश्री!

Next

आपल्या अंगावर येणारा प्रत्येक वार झेलण्याची आणि त्यात आपला हुतात्मा झाला तरी ते हौतात्म्य पत्करण्याची राणा भीमदेवी थाटातील गर्जना करणाऱ्या श्रीपाल सबनीस यांच्यातील या वीरश्रीची (अरेरे) अवघ्या काही तासातच इतिश्री झाल्याने साऱ्या सारस्वतपुत्रांना मोठा धक्का बसला असण्याची शक्यता आहे. आपल्याती वीरश्रीचा लोप पावल्यामुळेच की काय सबनीसांनी पुणे पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आणि पोलिसांनीही ती मोठ्या उदार अंत:करणाने मान्य केली. तसे करताना पोलिसांनी सुरÞक्षा व्यवस्थेचा कोणता दर्जा सबनीसांना देऊ केला हे मात्र कळावयास मार्ग नसल्याने पिंपरी-चिंचवडातील साहित्य संमेलनप्रसंगी संमेलनाध्यक्षांच्या पाठीमागे भिरभिरत्या नजरेचे ‘कॅलिश्नोव्ह’धारी उभे राहातात की कार्बाईनधारी उभे राहातात की चुरगळलेल्या ‘युनिफार्मात’ले मरगळलेले साधे छडीधारी उभे राहातात याचे दर्शन योग्य वेळ येईल तेव्हांच होईल. नरेन्द्र मोदी आज भले देशाचे पंतप्रधान असले तरी कोणे एकेकाळी ते आणि श्रीपाल सबनीस गोट्या, विटीदांडू, आट्यापाट्या आणि तत्सम खेळ खेळत असत याची भाजपावाल्यांना कल्पना नसल्याने श्रीपालांनी नरेन्द्राविषयी एकेरीतले जे उद्गार काढले त्यामागे अनादराची नव्हे तर मित्रत्वाची आणि याच मित्रत्वातून उपजलेल्या आपल्या सवंगड्याच्या प्राण रक्षणाच्या चिंतेची भावना होती हे तरी त्या बिचाऱ्यांना काय ठाऊक असणार? त्यामुळे त्यांना सबनीसांचा बरीक झणका आला आणि त्यांनी त्यांचे चरण कलम करण्याची धमकी दिली. खरे तर त्यात या चरणांचा काय दोष? आक्षेप नरेन्द्रभाईंबद्दल काढलेल्या लागट उद्गारांना होता ना, मग हे उद्गार ज्या जिव्हेतून बाहेर पडले ती जीभ हासडण्याची वगैरे धमकी दिली असती तर जरा मित्रपक्षालाही बरे वाटून गेले असते. पण येताजाता ‘पाय लागू’ संस्कृतीचा भाजपात प्रादुर्भाव झालेला असल्याने लक्ष जिभेकडे न जाता ते पायांकडे गेले असावे. तसेही त्या ऱ्हाळातले भाजपाचे नवजात खासदार अमर साबळे यांच्या मनीध्यानी नसताना त्यांच्या हाती पक्षाने खासदारकीचे घबाड ठेवल्याने अचानकपणे व अनपेक्षितपणे केल्या गेलेल्या या उपकाराची परतफेड करण्यासाठी किंवा गेला बाजार तसे करतो आहोत असे दाखविण्यासाठी अमरभाऊंना ज्या संधीचा शोध होता ती अनायसेच सापडून गेली. पण त्यांच्या या संधीवर आता त्यांच्याच पक्षाचे सरकार विरजण टाकील असा रंग आहे. तथापि सबनीसांचे एकूण रंग बघितल्यानंतर पाव शतकांपूर्वी कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी जे म्हणून ठेवले, त्याची सय येते. पोषाखी साहित्य संमेलने नष्ट होतील वा व्हावीत असे ते म्हणाले होते. रोख त्यांचा उधळपट्टीवर होता. पण सालागणिक अध्यक्षपदाची रया संपत जाईल व त्या पदाचे पोतेरे करणारे लोक उदयास येतील असेही काही तर त्यांना अभिप्रेत नव्हते?

Web Title: Virashree antishri!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.