विराट-अनुष्काची ‘गोड बातमी’ : पर्सनल ते सोशल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 06:57 AM2020-08-29T06:57:24+5:302020-08-29T06:57:52+5:30
नव्या काळाने नवी संस्कृती आणली आणि नव्या माध्यमांनी ‘नजरेआड’ असे काही ठेवलेलेच नाही. आता तर प्रख्यात स्रियांच्या ‘बेबी बम्प’च्या चर्चा उघडपणे होतात. ‘बातमी’ जाहीर झालेली नसली, तर ‘बिफोर’ आणि ‘आफ्टर’ असे फोटो दाखवून ‘तसे काहीतरी आहेच आहे’ असे तर्कही लढवले जातात.
अपर्णा वेलणकर । फीचर एडिटर, लोकमत
एरवी चुकूनही ‘सेलिब्रिटीं’च्या वाट्याला न जाणाऱ्या, सेलिब्रिटींच्या रिलेशनशिप्स, त्यांचे ते लिव्ह-इन, त्यांची ब्रेक-अप्स, त्यांची लग्ने, त्यांचे हनिमून, त्यांची व्हेकेशन्स या सचित्र छचोरपणाकडे अगदी अजिबातच दुर्लक्ष करणाºया गंभीरातल्या गंभीर बुद्धिजीवींनासुद्धा परवाच्या एका ‘इन्स्टा-मोमेंट’ने प्रसन्न आनंद दिला असेल : ‘वी आर प्रेग्नन्ट’ही ब्रेकिंग न्यूज देणारे विराट आणि अनुष्काचे ते साधेसे पण देखणे आणि प्रसन्न छायाचित्र ! त्यांच्या आयुष्यात येणाºया नव्या पाहुण्याच्या चाहुलीचे तेज अनुष्काइतकेच विराटच्या चेहेºयावरही उमललेले दिसते आहे त्यात ! गेल्या चार-सहा महिन्यात रोजच्या बातम्या म्हणजे सगळी अस्वस्थ गुदमरच नशिबी असताना अचानक मळभ हटून अगदी क्षणभरच सकाळचे कोवळे ऊन खाली उतरावे, तसे काहीतरी त्या छायाचित्रात आहे खरे!
तसे पाहाता ही ‘गोड बातमी’ म्हणजे आपल्या संस्कृतीत केवढे खाजगीपण ! अपत्यसंभव, गर्भाचे तेज ल्यायलेली गर्भिणी, तिच्या ताटातले अन्न, तिचे नवजात मूल हे सारे अन्यांच्या ‘दृष्टी’स पडू नये, अशी धडपड ! अपत्यजन्म म्हणजे सगळे काही सुखरूप पार पडेतो केवळ कुटुंबीयांपुरता आणि अन्यांच्या ‘नजरेआड’चा सोहळा !
नव्या काळाने नवी संस्कृती आणली आणि नव्या माध्यमांनी ‘नजरेआड’ असे काही ठेवलेलेच नाही. आता तर प्रख्यात स्रियांच्या ‘बेबी बम्प’च्या चर्चा उघडपणे होतात. ‘बातमी’ जाहीर झालेली नसली, तर ‘बिफोर’ आणि ‘आफ्टर’ असे फोटो दाखवून ‘तसे काहीतरी आहेच आहे’ असे तर्कही लढवले जातात. हा उघडावाघडा छचोरपणा असंस्कृत आणि अश्लाघ्य खराच! पण ‘पेज थ्री’ पत्रकारितेने चालवलेला हा धिंगाणा काही प्रमाणात रोखण्याचे एक नवे शस्र आता सेलिब्रिटींना मिळाले आहे : सोशल मीडिया ! तुम्ही प्रेमात आहात का, लग्न करता आहात का, प्रेग्नन्ट आहात का असे खोदून खोदून विचारत खासगी आयुष्यात घुसू पाहाणाºया ‘पापाराझ्झी माध्यमां’मुळे हरमाळलेले सेलिब्रिटी आता प्रिन्सेस डायनाच्या दुर्दैवी काळाइतकेच जुने होऊन इतिहासात गेले. आता ही मंडळी आपल्याच सोशल मीडिया अकाउण्टसवरून सगळे ‘पर्सनल अपडेट’स देत असतात. एवढेच नव्हे तर आपल्या लग्नाचे, आपल्या हनिमूनचे किंवा आपल्या बाळाचे पहिलेवहिले, एक्सक्लुझिव्ह फोटो छापण्याचे रीतसर अधिकार देण्याच्या बदल्यात माध्यमसमूहांकडूनच दणदणीत पैसेही वसूल करतात.
पण अलीकडच्या काळात या कलकलाटातूनच एक स्वागतार्ह बदल मूळ धरू लागला आहे आणि ‘इन्स्टा-स्टोरीज’पासून प्रेरणा घेत घेत सामान्यांच्या आयुष्यातही उतरू लागला आहे.
हल्ली खºया अर्थाने ‘सहजीवना’चा अर्थ जगू पाहाणारी जोडपी ‘वी आर प्रेग्नन्ट’ असे जाहीर करतात. गर्भिणी स्रीच्या बरोबरीने तिचा जोडीदारही गरोदरपण आणि अगदी प्रत्यक्ष प्रसूतीच्या वेळीही ‘सोबत’ असतो. पूर्ण वाढ झालेल्या गर्भाचे तेज आलेल्या सामान्य स्रियाही हल्ली ते क्षण पुढे चिरंतन आठवणीत ठेवण्यासाठी ‘फोटो शूट’ करतात, प्रसूतीनंतरचे औदासीन्य यासारख्या आजवर मनाआड ढकलायच्या विषयाबद्दल उघडपणाने बोलतात, त्यावर योग्य ते उपचार घेतात. एवढेच नव्हे तर तंत्राच्या साहाय्याने गर्भधारणा, सरोगसी, दत्तक मूल हे सारे पर्यायही खुलेपणाने आणि आनंदाने स्वीकारावे, त्यात लपवण्यासारखे काही असते असे मानू नये; ही नवी धारणा समाजात रुजवण्यात या सेलिब्रिटी जोडप्यांचा मोठा वाटा आहे, हे विसरता कामा नये. लग्नबाह्य संबंधातून जन्मलेली मसाबा आणि एकल मातृत्व पत्करून मुलीला हिमतीने वाढवणारी नीना गुप्ता यांची वाट सोपी नव्हती. त्या तुलनेत करण जोहर आणि तुषार कपूरचे पत्नीविना पितृत्व मात्र औत्सुक्य आणि उत्साहाने ‘सेलिब्रेट’ केले गेले.
आता तर लग्नाआधीच्या मातृत्वाचाही यथोचित सन्मान व्हायला हवा असे (सामान्यांना पचायला अद्याप अवघड असलेले) सूत्र कल्की कोचेलीन, हार्दिक पांड्या आदींनी अगदी सहज स्वीकारलेले दिसते. अशा व्यक्तिगत स्वीकारातूनच सामाजिक बदल आकाराला येतात. अर्थात ‘त्यांचे’ ते सगळेच चकचकीत म्हणून चांगले अगर स्वीकारार्ह नसते. टोकाचे यश अगर टोकाचे अपयश, स्वप्नभंग, मानसिक ताण यातले काहीच पेलता/पचवता न आल्याने अख्ख्या आयुष्याचाच चिवडा करून ठेवलेल्या सेलिब्रिटीजच्या कहाण्यांचा चिखल रोज आजूबाजूने वाहातच असतो हल्ली ! म्हणून तर पैसा-प्रसिद्धीचे मोठे वलय भोवती असतानाही व्यक्तिगत आयुष्याचा तोल कसोशीने सांभाळणाºया, आपल्या वर्तनातून जनसामान्यांच्या मानसिकतेला वेगळे वळण देणाºया मोजक्यांचे कौतुक !