तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 05:21 AM2022-01-17T05:21:09+5:302022-01-17T05:21:39+5:30

बीसीसीआय क्रिकेटपटूंच्या बाबतीत नेहमी कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराट कोहलीला तो आज्ञाधारक मुलगा होणं काही शक्य नव्हतं !

virat kohli was the most successful captain but not the great | तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

तो सर्वात यशस्वी कर्णधार होता, ‘महान’ मात्र झाला नाही !

googlenewsNext

- द्वारकानाथ संझगिरी, ख्यातनाम क्रीडा समीक्षक

विराट कोहलीने आता कसोटीचं नेतृत्वही सोडलं. तो आता राजा राहिला नाही, प्रजेचा भाग झालाय !
- हे अपेक्षितच होतं. आपण मालिका जिंकलो असतो तर तिथल्या तिथे “ जितं मया” म्हणत  नेतृत्वाची राजवस्त्र त्याने बीसीसीआयकडे  फेकली असती आणि तो शिखरावरून निवृत्त झाला असता. पराभव झाल्यामुळे त्याने एक दिवस विचार केला आणि “ कृतार्थ मी, कृतज्ञ मी” म्हणत नेतृत्व सोडलं.
त्याचं आणि बीसीसीआयचं  यापुढे पटणं कठीण होतं. बीसीसीआय  क्रिकेटपटूंच्या बाबतीत कडक बापाच्या भूमिकेत असतं, विराटला आज्ञाधारक मुलगा होणं शक्य नव्हतं. विनोद रॉय  मंडळाचे सर्वेसर्वा असताना त्यांनी विराटचे लाड  पुरवले. अगदी त्याला रवी शास्त्री प्रशिक्षक म्हणून देण्यापर्यंत.  मग जय शहा आणि गांगुली येताच मंडळाची भूमिका ताठर झाली.  ठिणग्या उडाल्या. अलीकडच्या ठिणग्या तर आग लागावी इतक्या प्रखर होत्या. “मी खरं बोलतोय की तू “हा विराट आणि गांगुलीमधला वाद चक्क चव्हाट्यावर आला. त्यात पराभव; त्यामुळे कोहलीच्या मनात डच्चू मिळण्याची भीती निर्माण झाली असेलच. पूर्वी दिग्गज पण पराभूत कर्णधार फेकले गेले होतेच. मग तो इंग्लंडला इंग्लंडमध्ये आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये हरवणारा अजित वाडेकर असो, बेदी असो, व्यंकट असो, की वेंगसरकर! याची पूर्ण कल्पना  विराटला होती. शिवाय ड्रेसिंग रूम बदलली. तिथे आता रवी शास्त्री नव्हता. सपोर्ट स्टाफमधली त्याची खास मंडळी नव्हती. 



 नेतृत्व सोडण्याचा निर्णय ब्रँडच्या दृष्टीने थोडा कठीण असावा. कर्णधाराची ब्रँड व्हॅल्यू ही नेहमीच इतरांपेक्षा जास्त असते. हल्लीचे खेळाडू ब्रँडचा विचार आधी करतात. पण विराट अशा उंचीवर आहे, की त्याला पैशाची फार फिकीर नसावी. असे आर्थिक तोटे त्याला साधा ओरखडाही काढू शकत नाहीत. 
विराटचं कॅप्टन म्हणून मूल्यमापन कसं करायचं? - यशाचा निकष लावला तर भारतीय क्रिकेटमधला तो सर्वांत यशस्वी कर्णधार ठरतो! ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याचा विक्रम त्याच्या संघाने केलाय. त्याच्या नेतृत्वाच्या टोपीमध्ये अनेक मानाचे तुरे खोवलेले आहेत, यात काही वादच नाही. एक महत्त्वाचा तुरा त्यात नाही, तो म्हणजे आयसीसी ट्रॉफी... पण  कुणाच्या करिअरमध्ये परिपूर्णता असते? ब्रॅडमनसारख्या माणसालासुद्धा १००च्या सरासरीपासून कणभर दूर राहावं लागलंच की !



विराट फलंदाजीच्या बाबतीतही सेनापती राहिला. किंबहुना नेतृत्वाच्या जबाबदारीने त्याची फलंदाजी अधिक फुलली. तो मॅच विनर फलंदाज ठरला. कोहलीने भारतीय क्रिकेटमध्ये आक्रमकता आणली. परदेशी खेळाडूंच्या वलयाला कस्पटाप्रमाणे लेखायला सुरवात सर्वात प्रथम गांगुलीने केली होती. गांगुलीने भारतीय खेळाडूंना गोऱ्या खेळाडूंच्या नजरेला कशी नजर भिडवायची ते शिकवलं.  विराट फारच पुढे गेला. तो गोऱ्यांच्या डोळ्यात वडस होऊन वाढण्याइतपत आक्रमक झाला. इतका की ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्याकडून चार गोष्टी शिकले असते !

 पण काही वेळा आक्रमकपणा, बेजाबदारपणा आणि बालिशपणा यातल्या रेषा पुसल्या जायला लागल्या. त्याचं मैदानावरचं वर्तन अधिकाधिक बेजबाबदार व्हायला लागलं. परवाच्या त्या कसोटीमध्ये ते  लांच्छनास्पदच होतं. कितीही निर्णय तुमच्या विरोधात गेले तरी ज्या पद्धतीने विराट त्या दिवशी वागला - स्टंपच्या माईकमध्ये मुद्दामहून बोलणं वगैरे- ते गैरच होतं.  त्याला त्याच्या भावना  लपवता येत नाहीत. गांगुलीच्याही चेहऱ्यावर त्याच्या भावना दिसायच्या. प्रत्येकजण काय धोनी होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा मैदानावर किती आणि कसं व्यक्त व्हायचं, यालाही काही मर्यादा असतात. कर्णधार म्हणून त्या पाळाव्या लागतात. 

डावपेचदृष्ट्या विराट धोनीसारखा धूर्त कधीही नव्हता. विशेषतः कसोटी स्तरावर डावपेचाच्या बाबतीत त्याने अनेक वेळेला अनेक चुका केल्या. काही विशेष खेळाडूंवर त्याचा लोभ होता.  एखादा त्याच्या मनातून उतरला की मग विराट कुठल्याही टोकाला जायचा. विराट चांगला कर्णधार होता,  यशस्वी कर्णधार होता.. पण तो महान कर्णधार मात्र कधीही नव्हता. - तो महान फलंदाज आहे, आणि आता नेतृत्वाचा दबाव डोक्यावरून गेल्यानंतर तो महानतेच्या आपल्या कक्षा नक्कीच रुंदावू शकतो.

Web Title: virat kohli was the most successful captain but not the great

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.