दृष्टीकोन : विरोधी पक्षाच्या भूमिकेतील भाजपसमोरची आव्हाने

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 02:51 AM2020-02-18T02:51:01+5:302020-02-18T02:52:42+5:30

यदु जोशी । राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार ही भाजप नेत्यांची भविष्यवाणी खोटी ठरतेय. तीन चाकांची ही आॅटोरिक्षा ...

Vision: The challenges facing the BJP in the role of the opposition | दृष्टीकोन : विरोधी पक्षाच्या भूमिकेतील भाजपसमोरची आव्हाने

दृष्टीकोन : विरोधी पक्षाच्या भूमिकेतील भाजपसमोरची आव्हाने

Next

यदु जोशी ।

राज्यातील महाविकास आघाडी सरकार लवकरच कोसळणार ही भाजप नेत्यांची भविष्यवाणी खोटी ठरतेय. तीन चाकांची ही आॅटोरिक्षा सध्या तरी रस्त्यावर नीट धावतेय. याची जाणीव झाल्यानेच प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्याची पाळी भाजप नेत्यांवर आली आहे. नवी मुंबईतील राज्य परिषदेत ही बाब प्रकर्षाने समोर आली. ‘सत्ता पक्षाचे जॅकेट काढा आणि विरोधी पक्षाचे जॅकेट घाला’ ही विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भाषा त्याचेच निदर्शक आहे. उद्धव ठाकरे सरकारविरुद्ध फुंकलेले हे रणशिंग एक प्रकारे भाजपची अपरिहार्यताच म्हणावी लागेल. सरकार पडण्याची शक्यता दिसत नसल्याने भाजपने ही भूमिका स्वीकारली आहे. महाविकास आघाडी सरकारकडील सध्याचे बहुमत बघता आता विरोधी पक्षात राहण्याशिवाय पर्याय नाही, याचीच ती कबुली म्हणावी लागेल.

Image result for devendra fadnavis and chandrakant patilसत्ता गेली तरी सत्तेची झूल अंगावर असल्यासारखेच भाजपजन आतापर्यंत वागत होते. आता तरी ही झूल फेकायलाच हवी. संपूर्ण विरोधी पक्षाची जागा व्यापण्याची संधी भाजपकडे आहे. सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची रणनीती आखावी असा प्रदेश कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांचा दबाव होता. त्या भावनेचा आदर करीत देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आंदोलनाची घोषणा करावी लागली. आज भाजपचे पहिल्या व दुसºया फळीतील नेते सत्तेत नाहीत. मात्र तिसºया-चौथ्या फळीतील नेते, कार्यकर्ते हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तास्थानी आहेत. शीर्षस्थ नेते सत्तेबाहेर आणि खालचे नेते, कार्यकर्ते मात्र सत्तेत असे भाजपबाबत चित्र आहे. त्यामुळेच वरच्या नेत्यांनी रणशिंग फुंकले तरी खालचे नेते, कार्यकर्ते त्यांना कितपत साथ देतील हे पाहावे लागेल. स्थानिक स्वराज्य संस्थेत सरकारचा निधी मिळवणे, विकासकामे करून घेणे यासाठी राज्यात सत्तारूढ असलेल्या पक्षाबरोबर संघर्ष करण्याला आपोआप मर्यादा पडतात. अशा वेळी, ‘तुम्ही सरकारविरुद्ध संघर्ष करा आम्ही तुमच्यासोबत आहोत', हा विश्वास प्रदेश नेतृत्वाला खाली द्यावा लागला. विकासकामांबाबत पक्षीय लेबल लावून अन्याय करता येणार नाही. यासाठी सत्तापक्षावर दबाव निर्माण करावा लागेल. २०१४ पूर्वी भाजपमधील काही नेत्यांचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांसह विशिष्ट मंत्र्यांशी स्नेहपूर्ण संबंध होते. त्यामुळे काही भाजपचे विशिष्ट नेते आघाडी सरकारमधील विशिष्ट मंत्र्यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेण्याचे टाळत असत. त्यामुळे विरोधाची धार कमी व्हायची आणि सत्ता पक्ष व विरोधी पक्ष यांच्यात संगनमत असल्याचेही बोलले गेले होते. आज महाविकास आघाडी सरकारविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहताना विरोधी पक्ष कधीही कोणतीही तडजोड स्वीकारत नाही हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या सर्वच नेत्यांना सिद्ध करावे लागेल.

Image result for devendra fadnavis and chandrakant patil फडणवीस यांची प्रतिमा स्वच्छ आहे. त्यामुळे ते दमदार आणि विश्वासार्ह विरोधी पक्ष उभा करून सरकारला जेरीस आणतील असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो. काही मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी वा अधिकाऱ्यांकडून कामे करवून घेण्यासाठी विरोधी पक्षाला हाताशी धरणाºया दलालांची संख्या कमी नाही. या दलालांना दूर ठेवावे लागेल. भाजपची केंद्रात सत्ता आहे. आजही तो राज्यातील क्रमांक एकचा पक्ष आहे. ११४ आमदार त्यांच्याकडे आहेत. त्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची मोठी फौजदेखील आहे. त्यामुळे एकाच वेळी विधिमंडळात आणि रस्त्यावर येऊन सरकारला जाब विचारण्याची जबरदस्त ताकद त्यांच्याकडे आहे. त्या ताकदीचा योग्य वापर करण्याची जबाबदारी देवेंद्रफडणवीस आणि चंद्र्रकांत पाटील यांच्यावर आहे. ठाकरे सरकारविरुद्ध टीका, आंदोलन करण्याचे अनेक मुद्दे भाजपला मिळू शकतात. तीन पक्ष, त्यांच्या वेगवेगळ्या वैचारिक भूमिका, मंत्र्यांची परस्पर विसंगत विधाने आणि त्यातून निर्माण होणारा अंतर्विरोध हा या सरकारमधील कमकुवत दुवा ठरू शकतो. हे हेरून भाजपकडून सरकारवर कसा हल्ला होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मोठा जनाधार असलेला ओबीसी वा मराठा नेता नसणे हा प्रदेश भाजपमधील कच्चा दुवा आहे. असे नेतृत्व जाणीवपूर्वक पुढे आणणे गरजेचे आहे.

Image result for devendra fadnavis and uddhav thackeray

सत्तेच्या आशेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेकांनी कमळ हाती घेतले. त्यांना पक्षात टिकवून ठेवण्याचे कसब फडणवीस, पाटील यांना दाखवावे लागेल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवू असा निर्धार व्यक्त केला. तीन तगडे पक्ष एकत्र समोर असताना राजकीय कुस्तीचा फड जिंकण्याचे आव्हानही पक्षासमोर आहे.

( लेखक लोकमतमध्ये वरिष्ठ सहायक संपादक आहेत )

 

Web Title: Vision: The challenges facing the BJP in the role of the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.