उत्सवातून एकतेचे, दातृत्वाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 01:30 PM2019-09-10T13:30:51+5:302019-09-10T13:39:08+5:30
मिलिंद कुलकर्णी गणेशोत्सवाची सांगतेकडे वाटचाल सुरु आहे. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे मानवी जीवनाचा आविभाज्य अंग असलेल्या सुख-दु:खाच्या भावनेचा संमिश्र ...
मिलिंद कुलकर्णी
गणेशोत्सवाची सांगतेकडे वाटचाल सुरु आहे. यंदाच्या उत्सवाचे वैशिष्टय म्हणजे मानवी जीवनाचा आविभाज्य अंग असलेल्या सुख-दु:खाच्या भावनेचा संमिश्र कल्लोळ तेथे दिसून येत आहे. महिनाभरापूर्वी महाराष्टÑातील कोल्हापूर, सांगली या भागात महापूर आल्याने मदतीचे हात तिकडे वळले आहेत. गणेशोत्सवाचे औचित्य साधून गणेश मंडळांनी, स्वयंसेवी संस्थांनी वर्गणी, देणगीचा काही भाग हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उत्स्फूर्तपणे देऊ केला. काही मंडळांनी आरासीपुढे देणगीपेटी ठेवून हा निधी पूरग्रस्तांना देणार असल्याचे आवर्जून नमूद केले. काही मंडळांनी यंदा आरास, मिरवणुका, ढोल-ताशे, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद यावरील खर्च टाळून तेवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ केली. संकटात सापडलेल्या आपल्याच भावंडांसाठी घेतलेल्या या पुढाकारातून समाजाच्या एकता आणि दातृत्वाचे दर्शन घडविले आहे. या स्तुत्य उपक्रमाविषयी या मंडळांचे मन:पूर्वक कौतुक करायला हवे.
भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने, इस्त्रोने चांद्रयान पाठविल्याच्या सुखद घटनेचा समाज मनावर मोठा परिणाम दिसून आला. गणेशोत्सवाच्या आरासींवरदेखील त्याचा व्यापक प्रभाव उमटला. घरगुती मंडळांपासून तर सार्वजनिक मंडळांपर्यंत बहुसंख्य मंडळांनी चांद्रयानाशी निगडीत देखावे साकारले आहे. धर्म आणि विज्ञानाचा हा अनोखा संगम या कृतीतून दिसून आला. लोकमान्य टिळकांनी देव्हाऱ्यातील गणपती देवता रस्त्यावर म्हणजे सार्वजनिक उत्सवात आणण्याचे मूळ कारण हेच आहे. एकता, संघटनाच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीत आवश्यक असलेल्या विचारांविषयी मंथन व्हावे. विचारविनिमयातून मार्ग शोधावा आणि समाजाने त्या दिशेने वाटचाल करावी. इस्त्रो आणि चांद्रयानाविषयी एवढी आत्मियता, गौरव प्रथमच दिसून आला. ही चांगली सुरुवात आहे.
केवळ समाजाने विज्ञानवादी व्हावे, असा उपदेश करुन काही होत नाही. समाजातील सामान्य घटकाला तो विचार आपलासा वाटेल तेव्हा तो खºया अर्थाने स्विकारला जात असतो. गणेशोत्सवात चांद्रयानाचा देखावा साकारुन विज्ञानाविषयीची समाजाची आत्मियता प्रकट होते. भावी पिढींनी संशोधक होण्याची प्रेरणा अशा गोष्टींमधून मिळू शकते. सार्वजनिक उत्सवातून हे घडतेय, याचे मोठे समाधान वाटते.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा उत्सव येत असल्याने राजकीय मंडळींचे मोठे अर्थसहाय्य यंदा मंडळांना लाभले. राजकीय मंडळी तसे हात मोकळे सोडत नाहीत, सरकारी तिजोरीतून पुण्यकर्म करण्याकडे त्यांचा कल अधिक असतो, असा सार्वत्रिक आरोप असला तरी निवडणुकीच्या तोंडावर मंडळांना आणि त्यातील उत्साही तरुण कार्यकर्त्यांना नाराज करण्याचे धाडस कोणत्याही राजकीय नेत्याने केले नसावे. त्यामुळे यंदाचा उत्सवाचा थाट हा दिमाखदार असा आहे. स्वागत मिरवणुका प्रचंड जल्लोष आणि उत्साहात झाल्या. त्याच प्रमाणे विसर्जन मिरवणुकादेखील होतील. पण हे सगळे करताना मंडळांनी सामाजिक भान बाळगले आहे, हे नमूद करायला हवे. जळगावातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने सीमेवरील जवानांच्या स्वास्थ्यासाठी महामृत्यूंजय जाप करण्याचा मोठा कार्यक्रम घेतला. चंदू चव्हाण याच्यासह लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. ३७० वे कलम वगळण्याचा आनंद काही मंडळांनी देखाव्यांच्या माध्यमातून व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतीचे अभिनंदन करणारे देखावेदेखील काही मंडळांनी साकारले. राजकीय, राष्टÑीय देखाव्यांची मोठी परंपरा या शतकोत्तरी उत्सवाला आहे. ब्रिटिश राजवट, आणीबाणीच्या काळात कल्पक देखाव्यांमधून नेमका संदेश जनतेपर्यंत पोहोचविला जात होता. बांगलादेश निर्मिती, कारगिल विजय, अंतराळवीर राकेश शर्मा या घटनादेखील देखाव्यांमधून साकारल्या होत्या.
आपला गणेशोत्सव त्याच वाटेने जात आहे, याचे समाधान समाजातील सर्वच घटकांना आहे, हे विशेषत्वाने नमूद करायला हवे. यासाठी नियोजन, अंमलबजावणी आणि संकल्पना राबविणाºया सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करायला हवे.