संस्कारातून विवेकाचे दर्शन

By admin | Published: August 27, 2016 05:52 AM2016-08-27T05:52:42+5:302016-08-27T05:52:42+5:30

सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते.

Visionary philosophy from Samskaras | संस्कारातून विवेकाचे दर्शन

संस्कारातून विवेकाचे दर्शन

Next


रिओ आॅलिम्पिकमध्ये आपली सिंधू आणि स्पेनची मारिना कॅरोलिना यांच्यातील बॅडमिंटनचा अटीतटीचा अंतिम सामना दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर सगळे भारतीय श्वास रोखून व नजर खिळवून पाहात होते. ती नाट्यमय चुरस आशानिराशेच्या हिंदोळ्यावर झुलत होती. दोघींच्या खेळात विजेची चपळता व कुशलता होती. आत्मविश्वास, जिद्द आणि एकाग्रता होती. आॅलिम्पिकच्या रौप्यपदकाची सिंधू मानकरी ठरली. मनातील खळबळ सावरत तिने मोठ्या उमदेपणाने मारिनाला जवळ घेतले व तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले. त्याचक्षणी सव्वाकोटी भारतीयांची व जगातील क्रीडाप्रेमी प्रेक्षकांची मने या सोनपरीने जिंकून घेतली.
आॅलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याचा गर्वाने, अहंकाराने तर नव्हेच पण अभिमानाने वारंवार उच्चार करण्याचे तिने संयमाने आणि उच्च संस्कार मिळाले असल्याने टाळले. ‘सुवर्णपदक मिळवण्याचे माझे लक्ष्य होते. त्यासाठी मी खूप प्रयत्न केले. पण मारिना खूप छान खेळली. तिच्या खेळावर मी खूश आहे’ अशी संयत प्रतिक्रिया तिने दिली. तिचे गुरू गोपीचंद, आई, माजी व्हॉलिबॉलपटू पी. विजया आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे माजी मानकरी पी.व्ही. रामण्णा म्हणजे तिचे वडील यांनीही मारिनाचे सोनेरी यश खिलाडू उमदेपणाने स्वीकारले.
सिंधूचे सुवर्णपदक हुकले म्हणून यापैकी कोणीही आदळआपट, धुसफूस केली नाही. आपल्या अपयशाला प्रतिस्पर्धीच जबाबदार आहे, तिला दाद देणारे, तिचे मनोधैर्य वाढवणारे कितीतरी प्रेक्षक तिथे होते असा कांगावा एकानेही केला नाही. देशातील याआधीच्या खेळाडूंनी कधी नेत्रदीपक कामगिरी केलीच नाही, त्यांनी पदक न मिळवण्याचा वारसा आम्हाला विरासत (वारसा) म्हणून दिला असे म्हणत आपल्या अपयशाचे खापर त्यांनी आधीच्या खेळाडूंवर फोडले नाही. घरची साधारण आर्थिक स्थिती, समाजाकडून निर्माण केले जाणारे अडथळे, देशाची खेळनीती यांच्यावर सुवर्णपदक हुकल्याची जबाबदारी न ढकलता १२ वर्षे निष्ठेने तप करणाऱ्या सिंधूने आणि तिच्या पाठीशी पहाडाप्रमाणे उभे ठाकलेल्या गुरूंनी, आई-वडिलांनी प्रश्नकर्त्यांना अत्यंत सकारात्मक उत्तर दिले - ‘यानंतर स्वत:त अधिक सुधारणा करून भावी काळात यशासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.’
एकाग्रता, परिश्रम तसेच विवेक विचार मानवी स्वभावाचा अमूल्य पैलू असतो हे त्यांनी दाखवून दिले. या विवेकाचेच दर्शन सिंधूच्या कृतीतून साऱ्या जगाने बघितले.
-डॉ. सौ. प्रज्ञा आपटे

Web Title: Visionary philosophy from Samskaras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.