विवेकनिष्ठ विज्ञान
By Admin | Published: May 18, 2017 04:03 AM2017-05-18T04:03:33+5:302017-05-18T04:03:33+5:30
विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवेकाची कास धरून विज्ञानाचा प्रसार होत गेला तर हे विज्ञान विधायक कामासाठी वापरले जाऊन माणसाचे जीवन समृद्ध होईल.
- विजय बाविस्कर
विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवेकाची कास धरून विज्ञानाचा प्रसार होत गेला तर हे विज्ञान विधायक कामासाठी वापरले जाऊन माणसाचे जीवन समृद्ध होईल.
माणसाच्या उत्क्रांतीपासून विकास आणि विकासातून प्रगती हा सारा प्रवास शक्य झाला आहे तो विज्ञानामुळे. विज्ञानामुळेच आज जग जवळ आलं आहे आणि त्यामुळे जगणंही सोपं झालं आहे. अवघं विश्व आणि आपलं जगणं हे विज्ञानाने व्यापून उरलेलं आहे. ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान या तिहेरी स्तरांवर आपले जीवन क्षणाक्षणाला जोडलेले आहे.
विज्ञानाचे नवनवीन शोध माणूस लावत गेला ते अर्थातच गरजेतून. अश्मयुगापासून माणसाची जी काही प्रगती होत गेली. ‘गरज ही शोधाची जननी आहे.’ हे म्हणतात ते काही उगीच नाही. हजारो वर्षांपासून माणसाने नवनवीन शक्कल लढवल्या. माहीत नसलेल्या अनेक गोष्टी त्याला माहीत झाल्या. दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गोष्टींचे शोध लावून त्याने आपलेच जगणे सुसह्य केले. कोट्यवधी वर्षांपासून निसर्गात अस्तित्वात असलेल्या साधनसंपत्तीमधून मानवाने संशोधन केले. काळानुरूप मानवी मेंदू प्रगत होत गेला. त्यातून संशोधनाचे अवकाशही विस्तारत गेले. गरजेच्या परिपूर्तीसह जगणे अधिक सुलभ, सोपे, अत्याधुनिक करता येईल असा त्याचा प्रयत्न राहिला. अल्बर्ट आईनस्टाईन, थॉमस एडिसन, न्यूटन यांच्यासारख्या नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांनी विज्ञानाच्या प्रगतीत अत्यंत मोलाचे योगदान दिले. तिथपासून विज्ञानाचा पैस विस्तारत राहिला. विज्ञानाच्या भरारीला तंत्रज्ञानाचे पंख लाभले आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही कवेत येऊ लागल्या. आजमितीला हरेक क्षणाला नवे विज्ञान-तंत्रज्ञान आपले अवकाश व्यापत आहे. भूगर्भापासून ते अवकाशापर्यंत नवनवे शोध लागत आहेत. गंमत म्हणजे इतके असूनही विश्वाच्या अनंत पसाऱ्यात आजवर आपल्याला जे काही उलगडले ते एक अंशच आहे. पण जे काही आजवर उलगडलंय तेही भव्य दिव्य असेच आहे. मानवी अवकाश व्यापून उरलेल्या या विज्ञान-तंत्रज्ञानाची एक झलक गेल्या आठवड्यात पुणेकरांना अनुभवायला मिळाली. महाराष्ट्र शासन, विज्ञान भारती व डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे पुण्यात आयोजित केलेल्या ‘पाचव्या भारतीय विज्ञान संमेलनाच्या’ निमित्ताने. विज्ञान-तंत्रज्ञानातील महत्त्वपूर्ण संशोधन, नव्या प्रतिकृती तसेच भारतीय संरक्षण विभाग, इस्रो तसेच विज्ञानक्षेत्रातील काही संस्थांनी विविध क्षेपणास्त्रे, विविध संशोधने प्रत्यक्ष पाहण्याची, हाताळण्याची संधी सामान्यांना उपलब्ध करून दिली होती. हे प्रदर्शन पाहण्यासाठी तीन दिवस फर्ग्युसनचे महाविद्यालय फुलून गेले होते. त्यातही लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती हे विशेष. या निमित्ताने आपली विज्ञानातील झेप तर कळलीच; पण अनेकांच्या मनात या क्षेत्राविषयी कुतूहलही निर्माण झाले. या संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भारतीय विज्ञान संमेलनाच्या धर्तीवर येत्या काळात महाराष्ट्र विज्ञान संमेलन सुरू करावेत. तसेच ही संमेलने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होण्याची गरज असल्याचे नमूद केले. यासाठी राज्य सरकार नियोजनाची जबाबदारी घेईल अशी ग्वाहीही दिली. भविष्यातील पिढी विज्ञाननिष्ठ होणे आवश्यक आहे. विद्यार्थीदशेतच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून असे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरू शकतात. भारतीय प्राचीन विज्ञानानेही विविध संशोधन शाखांमध्ये अनेक मूलभूत गोष्टींचा विकास केला होता. आधुनिक विज्ञानाची मुळं आपल्या पारंपरिक विज्ञानात सापडतात. पारंपरिक विज्ञानाचा शोध घेऊन आधुनिकतेशी त्याची सांगड घालण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. एकीकडे तंत्रज्ञानाचा विकास करून बनविलेली क्षेपणास्त्रे दिमाखात उभी आहेत. भारत चांद्रयान, मंगळ ग्रहावरील मोहीम आखत आहे. तसेच सॅटलाइट क्षेत्रातही इस्त्रोने अभूतपूर्व यश संपादित केले आहे, तर दुसरीकडे अंधश्रद्धेपोटी अजूनही अंधश्रद्धेची मुळे ठिकठिकाणी रुतलेली आहेत. त्याचवेळी विज्ञानाचा दुरूपयोगही होताना आपण पाहतो. हे चित्र बदलायचे असेल तर विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक प्रसार होणे गरजेचे आहे. त्यामुळेच विवेकाची कास धरून विज्ञानाचा प्रसार होत गेला तर हे विज्ञान विधायक कामासाठी वापरले जाऊन माणसाचे जीवन समृद्ध होईल यात शंका नाही.