मतदारांनो... मी गुन्हेगार आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 06:33 AM2018-08-25T06:33:17+5:302018-08-25T06:34:06+5:30
सिगारेट आणि तंबाखूमधील निकोटिनप्रमाणे राजकारणातील गुन्हेगार समाज व देशाच्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत.
राजाभैया लफंगे आज खुशीत होता. येत्या निवडणुकीसाठी त्याचे तिकीट पक्के झाले होते. सकाळीच हायकमांडकडून ग्रीन सिग्नल मिळाला... आगे बढो म्हणून. निरोप मिळताच राजाभैया कामालाही लागला. मतदारसंघात लावायचे पोस्टर्स, घरोघरी वाटायची पत्रके, बिल्ले याचा हिशेबही सुरू झाला. डोक्यात घोळत असलेला पोस्टर्स आणि पत्रकाचा मजकूर त्याने कागदावर लिहून काढला...
आपल्या मतदारसंघाचे सतत दोन वेळा आमदार राहिलेले तुमचे लाडके नेते राजाभैया यावेळी हॅट्ट्रिक करणार!
आपल्या लाडक्या नेत्याला विजयी करा!
बाजूला भैयाचा भलामोठा फोटो. वरच्या बाजूला हायकमांडमधल्या दोन ‘हाय’ नेत्यांचे छोटे फोटो. खाली मतदानाची तारीख, आपले विनित वगैरे, वगैरे...
मजकूर पुन्हा पुन्हा वाचत, स्वत:च खूश होत राजाभैयाने पेग तोंडाला लावला, तेवढ्यात त्याचा लंगोटी यार कल्लू उस्ताद दरवाजात उगवला.
राजा : अरे कल्लू...अगदी वेळेवर आला बघ...! मी आता निघणारच होतो... हे पोस्टर्स छापखान्यात द्यायला...बघ तू, एक नजर टाक.
कल्लूने मजकूर वाचला. त्याच्या ‘सराईत’ नजरेला त्यातील उणीव जाणवली.
कल्लू : राजाभैया... आतापर्यंत ठीक होते. सर्व खपून जायचे. पण यापुढे चालणार नाही.
राजभैया : काय म्हणतोस तू, कळले नाही. जरा स्पष्ट सांग.
कल्लू : हे बघ, तू येथे काय लिहिले...मी रस्त्याची कामे केली, शौचालये बांधली वगैरे वगैरे.
अरे बाबा तू यातले काहीही केले नसताना केले म्हणून लिहिले आणि जे प्रत्यक्षात केले ते मात्र दडवून ठेवलेस. आता बनवाबनवी चालणार नाही.
राजाभैया : काय दडवून ठेवले मी ?
कल्लू : मला सांग...तुझ्यावर आतापर्यंत किती गुन्हे दाखल आहेत?
राजाभैया : असतील २०, २५.
कल्लू : हे सर्व तुला या पोस्टरवर लिहावे लागणार आहे.
राजाभैय्या : काय म्हणतोस ऽऽऽ
कल्लू : होय...ही यादी द्यावीच लागणार. या पोस्टरवर खाली लिही... राजाभैया लफंगे नामक या उमेदवारावर खुनाचे तीन, अपहरण, बलात्काराचे चार
चार नव्हे सहा..(मधेच राजाभैया)
कल्लू : बरं सहा..खंडणी वसुलीचे १५ आदी २५ गुन्हे दाखल आहेत. तेव्हा मतदारांनी मत देताना हा वैधानिक इशारा लक्षात घ्यावा.
राजाभैया : बापरे...असं लिहिलं तर मला कोण मत देणार! निवडणूक आयोगाला द्यायच्या प्रतिज्ञापत्रात यातील काही गुन्ह्यांची माहिती मी देणारच आहे.
कल्लू : तेवढ्यावर नाही भागणार...भारतीय मतदाता संघटनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून अशी माहिती पोस्टर आणि पत्रकावर देण्याबाबत आग्रह धरला आहे.
राजाभैय्या : असं झालं तर कोणताही राजकीय नेता निवडणूक रिंगणात उतरू पाहणार नाही.
कल्लू : ते तुझे तू बघ. मै तो चला.
खरंच कल्लूने म्हटले तसे झाले तर राजकारणातील गुन्हेगारीवर निश्चितच अंकुश लागेल यात शंका नाही. सिगारेट आणि तंबाखूच्या पाकिटांवर ‘आरोग्याला हानीकारक’ असा वैधानिक इशारा लिहिला असतो. सिगारेट आणि तंबाखूमधील निकोटिनप्रमाणे राजकारणातील हे गुन्हेगार समाज व देशाच्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. तेव्हा आपल्या उमेदवाराची पार्श्वभूमी काय हे जाहीररीत्या माहीत करून घेण्याचा मतदारांचा मूलभूत हक्क सुप्रीम कोर्टाने त्यांना देऊनच टाकावा. फिर आयेगा मजा...!
- दिलीप तिखिले