वृंदावनी वेणू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:49 AM2018-03-08T00:49:44+5:302018-03-08T00:49:44+5:30

भारतीय संस्कृतीने आणि लोकजीवनाने संगीताला केवळ कला म्हणून स्वीकारले नाही, तर नादब्रह्माची अनुभूती म्हणून संगीताला गौरविले. संगीतामध्ये गाणारा एवढा एकरूप होतो की स्वत:ला विसरतो. ऐकणाराही ऐकताना इतका एकरूप होतो, की तोही मैफलीत स्वत:ला विसरतो. स्वत:ला आणि देहाला विसरणे हीच समाधी असते.

Vrindavan Venu | वृंदावनी वेणू

वृंदावनी वेणू

Next

- डॉ. रामचंद्र देखणे

भारतीय संस्कृतीने आणि लोकजीवनाने संगीताला केवळ कला म्हणून स्वीकारले नाही, तर नादब्रह्माची अनुभूती म्हणून संगीताला गौरविले. संगीतामध्ये गाणारा एवढा एकरूप होतो की स्वत:ला विसरतो. ऐकणाराही ऐकताना इतका एकरूप होतो, की तोही मैफलीत स्वत:ला विसरतो. स्वत:ला आणि देहाला विसरणे हीच समाधी असते.
तर दोघांनी एकरूप होऊन नादसमाधीची अनुभूती घेणे हेच एक अद्वैत असते. अद्वैतात गेलेले स्वर द्वैतात येऊन नाचू लागतात आणि स्वरमहोत्सव रंगतो. ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांना भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या गाण्याविषयी लिहिलेल्या चार ओळी खूप काही सांगून जातात.
अमृताचे डोही बुडविले तुम्ही।
बुडताना आम्ही धन्य झालो
मी पण संपले झालो विश्वाकार
स्वरात ओंकार भेटला गा।।
स्वरामागचा राग ही संगीताची अनुभूती; पण स्वरातला ओंकार ही आत्म्याची अनुभूती होय. संगीत हे आत्म्याच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे. विंदा करंदीकरांसारखे शब्दप्रभू आणि पंडित भीमसेनजींच्या सारखे स्वरभास्कर जेव्हा एकमेकांशी असा संवाद करतात तेव्हा शब्दातून स्वर आणि स्वरातून शब्द एकमेकांना साद घालत असतात. स्वरातच ओंकार भेटतो. भगवान श्रीकृष्णाने बासरीवादनाने वज्रवासीयांना साद घातली. वृंदावन आणि वेणू हे श्रीकृष्णाचे विश्रांतीस्थान, तर भक्तांचे आनंदधाम.
वृंदावन सम्प्रविश्य सर्वकालसुखावहम्
असे म्हणत गोप, गोपी, गाई, गुरे वज्रवासीयांसह श्रीकृष्ण गोकुळातून वृंदावनात आला. तिथेच गोपगड्यांचे खेळ रंगले आणि श्रीकृष्णाची बासरी घुमली. वेणूवादनाने वृंदावन आनंदले.
वृंदावनी वेणू
वेणू कवणाचा माये वाजे
वेणूनादे गाजे
सारे वृंदावन स्वत:ला विसरून वेणूनादात एकरूप झाले. पशू-पक्षी, पांगुळलेले यमुनाजळ, मुरलीचा ध्वनी ऐकताच विव्हळ झालेले अंत:करण वेणूनादाने गौळणींनी विसरलेला घरधंदा, हरपलेले देहभान आणि गोपींच्या वृत्तीची एकरूपता हे सारे वर्णन ऐकले, की संगीत हे परमेश्वराच्या जवळ कसे नेते, आणि ... नादब्रह्म स्वरातील ओंकाराला कसे भेटते, हे वेगळे सांगायला नको.
 

Web Title: Vrindavan Venu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.