बिकट होईल वाट, कारण कोरोना सोडत नाहीये पाठ!
By किरण अग्रवाल | Published: June 19, 2022 10:59 AM2022-06-19T10:59:03+5:302022-06-19T10:59:28+5:30
Corona is not leaving : अल्पसा संसर्गही रोखायचा व सुरू असलेले जनजीवन अव्याहत ठेवायचे तर काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
- किरण अग्रवाल
मुंबई-पुण्यापाठोपाठ कोरोना आता हळूहळू पुन्हा राज्याच्या इतर भागातही शिरकाव करू पाहतो आहे. विदर्भात व वऱ्हाडातही मोजके रुग्ण आढळून आले आहेत. हा संसर्ग फैलावू द्यायचा नसेल तर आरोग्य यंत्रणा पूर्ववत अलर्ट करून तातडीने लसीकरणावर भर देणे गरजेचे बनले आहे.
एकदाच नव्हे तर दोनदा जो त्रास अनुभवून झाला आहे, त्याबद्दल पुरेशी काळजी न घेता बेफिकिरी दाखविली जाणार असेल तर त्याच त्रासाला पुन्हा सामोरे जाण्याची वेळ येऊन ठेपल्याशिवाय राहात नाही. कोरोनाच्या संकटाचे तसेच होत आहे. तो पुन्हा फिरून येऊ पाहत असल्याची चिन्हे लक्षात घेता, आपल्या जीवाची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी; पण ते पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही हे दुर्दैव.
कोरोनाच्या महामारीने गेली दोन वर्षे कसा हाहाकार माजवला व जनजीवन अस्ताव्यस्त करून ठेवले हे नव्याने सांगण्याची गरज नसावी. प्रत्येकच व्यक्तीने व कुटुंबाने यासंबंधीचा त्रास अनुभवून झाला आहे; पण यातून आवश्यक तो बोध घेतला न गेल्याने हे संकट पुन्हा घोंगावताना दिसत आहे. देशात एका दिवसात १२ हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून, सक्रिय रुग्णांची संख्या पन्नास हजारांपेक्षा अधिक झाली आहे. राज्यात प्रतिदिनी दोन ते अडीच हजार रुग्णांची भर पडत असून उपचाराधीन रुग्णांची संख्या वीस हजारांच्या जवळ पोहोचली आहे. मुंबई-पुण्यात जसे कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत तसे वऱ्हाडातही हा विषाणू पुन्हा येऊन दाखल झाला आहे. अकोला व वाशिम जिल्ह्यात आजच्या घडीला प्रत्येकी २५ ते २६ तर बुलडाण्यात ७ सक्रिय रुग्ण आहेत. म्हणायला ही स्थिती पूर्णपणे नियंत्रणातील आहे, परंतु हा अल्पसा संसर्गही रोखायचा व सुरू असलेले जनजीवन अव्याहत ठेवायचे तर काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
भारतात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अतिशय प्रभावीपणे झाल्याने पहिल्या दोन लाटानंतरची तिसरी लाट थोपवण्यात व तिच्यापासून जीवितहानी टाळण्यात आपण बरेचसे यशस्वी झालो. त्यामुळे प्रतिबंधात्मक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करून हटविले गेलेत. त्यामुळे कोरोना गेला आता तो पुन्हा येणार नाही, अशाच अविर्भावात सर्वजण वागले. ज्या लसीकरणामुळे आपण या संकटातून बचावलो त्या लसीकरणाकडेही नागरिकांनी अक्षम्य दुर्लक्ष केले. उदाहरणच द्यायचे तर अकोला जिल्ह्यात तब्बल तीन लाखांपेक्षा अधिक लोकांनी अजून लसीकरणाचा एकही डोस घेतलेला नाही. दुसरा डोसही केवळ ५२ ते ५३ टक्के लोकांनीच घेतला आहे. साठ वर्षांवरील नागरिकांसह आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जात आहे; मात्र तोदेखील जिल्ह्यात केवळ सुमारे २१ हजार नागरिकांनीच घेतला आहे, त्यावरून लसीकरणाबाबतची उदासीनता लक्षात यावी. हीच बाब घातक ठरणारी व संकटास निमंत्रण देणारी आहे.
विशेष म्हणजे, आगामी दिवस हे पावसाचे आहेत. पावसाळ्यात तसेही आरोग्याचा प्रश्न काहीसा नाजूक होत असतो. आता शेतीकामे सुरू होतील, त्यामुळे बळीराजा व मजुरांचे त्याकडे लक्ष असेल. श्रावणामुळे सणवार, उत्सवांचे दिवस आहेत. अशात पुन्हा लसीकरणाकडे दुर्लक्षच होण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी लसीकरणाची केंद्रे कमी केली गेली आहेत, ती वाढवावी लागतील तसेच कोरोना संपला म्हणत त्यासाठीची जास्तीची आरोग्य यंत्रणाही गुंडाळली गेली आहे, ती पुन्हा अलर्ट मोडवर ठेवावी लागेल. अर्थात, शासन व प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेतच; परंतु नागरिकांनी स्वतः खबरदारी घेणे अपेक्षित आहे. येऊ घातलेली चौथी लाट रोखायची तर बेसावध राहून चालणार नाही. सध्या जे चलनवलन सुरू आहे ते अबाधित राखण्यासाठी स्वयंशिस्तीने काही निर्बंध पाळणे गरजेचे झाले आहे.
सारांशात, कोरोनाचे संकट पुन्हा चोरपावलांनी येऊ घातले आहे. आज स्थिती पूर्णपणे आटोक्यात असून घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही; पण म्हणून बेफिकीरही राहता येऊ नये. तूर्त तरी लसीकरण हाच यावरील संरक्षणाचा मार्ग असल्याने रखडलेले अगर दुर्लक्षित झालेले लसीकरण नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने करून घेणे गरजेचे आहे.