आता तरी जागे व्हा..!
By admin | Published: March 13, 2017 11:35 PM2017-03-13T23:35:49+5:302017-03-13T23:35:49+5:30
चार राज्यांनी त्यांच्या विद्यमान सरकारांच्या विरोधात कौल दिला. याचा फायदा महाराष्ट्रात घ्यायचा की नाही हे सर्वस्वी विरोधकांच्या हाती आहे.
चार राज्यांनी त्यांच्या विद्यमान सरकारांच्या विरोधात कौल दिला. याचा फायदा महाराष्ट्रात घ्यायचा की नाही हे सर्वस्वी विरोधकांच्या हाती आहे.
पाच राज्यांच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाले. त्या निकालांचे त्या त्या राज्यात जे काय परिणाम व्हायचे ते होतील. पण हे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीची नांदी ठरणार आहेत. भाजपाला या निकालाने बूस्टर डोस मिळाला आहे, तर शिवसेना सत्तेत राहणार की नाही यापेक्षा ती स्वत: एकजीव राहणार की नाही हा प्रश्न त्यांच्यासाठी महत्त्वाचा बनलाय. राज्यातल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला चेहराच उरलेला नाही. काँग्रेसकडे लढण्याची जिद्द उरलेली नाही. राष्ट्रवादी पुणे, पिंपरी चिंचवडच्या पराभवातून बाहेर पडलेली नाही. २८८च्या विधानसभेत दोन्ही काँग्रेसचे ८३ सदस्य असूनही सक्षम विरोधी चेहरा यांना उभा करता आलेला नाही. कागदावर मोठमोठी नावे दोन्ही काँग्रेसमध्ये असूनही परफॉरमन्सची दोन पाने भरणेही या सगळ्यांना अशक्य झाले आहे. त्याउलट विधान परिषदेत धनंजय मुंडेंची कामगिरी सातत्याने लक्षणीय राहिलेली आहे. दोन्ही काँग्रेस आजमितीला अस्तित्वाच्या शोधात धडपडत आहेत. या परिस्थितीत येणाऱ्या काळात राज्यात मोठी राजकीय गणिते मांडली जातील आणि प्रत्येकजण आपापल्या ताकदीने ती सोडवतानाही दिसेल.
भाजपा सरकार नोटीस पिरीएडवर आहे, आमच्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशात आहेत, असे सांगणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांनी जुन्या मंत्र्यांना काढून नवीन चेहऱ्यांना संधी द्या अशी मागणी केली आहे. भाजपाने शिवसेनेत लावून दिलेली ही सोनेरी काडी आहे. सत्तेतच राहणार नाही म्हणणारी शिवसेना आता जुने मंत्री बदलून नव्यांना संधी द्या म्हणत सत्तेत राहण्याचा कसा आटोकाट प्रयत्न करत आहेत, हे पद्धतशीरपणे भाजपाने दाखवून दिले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी गुफ्तगू करतात, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे स्वत:च्या मतदारसंघात मंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी हातमिळवणी करत जालना नगराध्यक्षासाठी उमेदवारच देऊ देत नाहीत. शिवसेनेचे आमदार बंदखोलीत स्वत:च्याच मंत्र्यांना अरे-तुरे करत उद्धार करतात. अशा स्थितीत शिवसेना भाजपाशी लढणार कशी? उद्या जर शिवसेनेचेच मंत्री आणि आमदार वेगळ्या वाटेने जाण्याचा निर्णय घेऊ लागले तर शिवसेनेची अवस्था काय होईल? भाजपाने मुंबई महापालिकेत कोणतेही पद न घेता शिवसेनेला महापालिका देऊन मोठा ट्रॅप लावला आहे. त्या सापळ्यात सेनेचा वाघ अलगद सापडला तर तो भाजपाला हवाच आहे. आम्ही शिवसेनेला संपवले नाही, तेच त्यांच्या कर्माने संपले असे म्हणायला पुन्हा भाजपावाले मोकळे होतील. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शिवसेनेची आहे. २५ वर्षे युतीत सडली असे म्हणणाऱ्या शिवसेनेवर कोणत्या तोंडाने राज्याच्या सत्तेत कायम रहायचे हा यक्ष प्रश्न उभा आहे. त्यासाठी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीने पुकारलेल्या कर्जमाफीच्या मागणीत उडी घेतली आहे. मात्र जर भाजपाने राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर या तिघांनाही तोंड दाखवायला जागा रहाणार नाही.
अशावेळी नेमके करायचे तरी काय, असा यक्ष प्रश्न दोन्ही काँग्रेसपुढे आहे. भाजपा कशी वागते किंवा त्यांच्या वागण्याचे फायदे तोटे हा फार पुढचा विषय आहे. मुळात दोन्ही काँग्रेसची विश्वासार्हताच पूर्णपणे लयाला गेली आहे. लोकांचा या दोन्ही पक्षावरचा उडालेला विश्वास काही केल्या त्यांना परत मिळवता येईनासा झाला आहे. त्यासाठी अधिवेशनासारख्या संधी चालून आल्या तरी त्याचा त्यांना वापर करता येत नाही. राज्यातले शेकडो प्रश्न असे आहेत की ज्यातून सरकारला वारंवार अडचणीत आणता येऊ शकेल; पण त्यासाठी अभ्यास करून दोन्ही काँग्रेसना सभागृहात यावे लागेल. कामकाज चालवावे लागेल. पदोपदी सरकारला, मंत्र्यांना सळो की पळो करून सोडावे लागेल. त्यासाठी खूप मोठी इच्छाशक्ती आणि अभ्यासू टीम उभी करावी लागेल. पण वर्तमानपत्रात छापून आलेले विषयच आमदार सभागृहात मांडणार असतील तर त्यातून काही साध्य होणार नाही.
दोन्ही काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी आपापल्या भांडणांचे गाठोडे बांधून टाकले आणि एकदिलाने मैदानात उतरायचे ठरवले तरच येणारा काळ त्यांचा असेल अन्यथा या अॅन्टीइन्क्मबन्सीचा फायदा अशक्य आहे..!
- अतुल कुलकर्णी