भिंतीलाही कान असतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:26 AM2017-09-08T01:26:41+5:302017-09-08T01:27:13+5:30
लोहाणींच्या नेमणुकीने रेल्वे बोर्डात असंतोष-
मध्यरात्री कट केल्याप्रमाणे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष म्हणून अश्विनी लोहाणी यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे रेल भवनात संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या महिन्यात लागोपाठ दोन रेल्वे अपघात झाल्यामुळे बोर्डाचे अध्यक्ष के. मित्तल यांनी पदत्याग केल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने लोहाणी यांची नेमणूक केली. मित्तल यांच्या राजीनाम्यातून रेल्वे प्रशासन सावरण्यापूर्वीच रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनीही राजीनामा दिला. पण लोहाणी यांना अध्यक्ष केल्यावर खूपच गहजब झाला. नियम आणि पद्धत यांचा विचार केला असता तर लोहाणी यांची नेमणूक होऊ शकली नसती.रेल्वेमध्ये मुख्य व्यवस्थापक म्हणून काम केले नसेल तर ती व्यक्ती बोर्डाची अध्यक्ष होऊ शकत नाही असे नियम सांगतात.
ज्येष्ठता क्रमात लोहाणी हे दोन श्रेणी खाली असतानाही त्यांना सरळ अध्यक्ष करण्यात आले. याशिवाय अपमानास्पद बाब ही की बोर्डातील दोघा सक्षम आणि वरिष्ठ अधिकाºयांना डावलून लोहाणींना अध्यक्ष करण्यात आले. हे दोन अधिकारी रवींद्र गुप्ता आणि महंमद जमशेद पदत्याग करण्याच्या मानसिकतेत आले आहेत. अनेक गंभीर विषय सोडविण्याचा प्रयत्न रेल्वे विभागाकडून होत असताना हे नवे संकट उद्भवले आहे. लोहाणी हेही अनुभवी आणि तांत्रिक गोष्टींचे तज्ज्ञ आहेत. आय.टी.डी.सी.चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे पंतप्रधान कार्यालय प्रभावित झाले होते. त्यांच्या नव्या नेमणुकीमुळे आय.टी.डी.सी.तही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशावेळी त्यांना एअर इंडियाचे चेअरमन करून त्यांना ‘बूस्ट’ मिळाला होता!
नारायण राणेंना अमित शहांचा सल्ला-
काँग्रेसचे असंतुष्ट नेते नारायण राणे यांना संयम पाळण्याचा सल्ला भाजपाच्या हायकमांडने दिला आहे. त्यांचा भाजपा प्रवेश होणारच आहे पण काही काळानंतर. दोन महिन्यापूर्वी नारायण राणे आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची बैठक झाली. त्याचवेळी राणेंना भाजपात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य पक्षातील नेत्यांना खुल्या मनाने भाजपात प्रवेश देण्याचे अमित शहा यांचे धोरण आहे. पक्षात दाखल करून त्यांच्यात ‘बदल’ घडवून आणता येतो. कमी काळात भाजपाचा विस्तार करून लोकसभेच्या जागा जिंकण्याचा हा एकमेव मार्ग आहे असे शहा यांना वाटते. यापूर्वीचे अध्यक्ष अन्य पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याबाबत धीमे धोरण राबवीत होते. त्यांच्यापेक्षा शहा यांचे विचार वेगळे आहेत. प्रत्येक प्रभावशाली नेता भाजपामध्ये असावा असे शहा यांना वाटते. म्हणूनच त्यांनी राणेंना भाजपा प्रवेशाविषयी आश्वस्त केले आहे.
इंडिया फाऊन्डेशनचे योगदान-
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, व्यापार मंत्री सुरेश प्रभू, हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा आणि परराष्टÑ विभागाचे राज्यमंत्री एम.जे. अकबर या सर्वात एकच साम्य आहे. ते प्रोफेशनल आहेत आणि अत्यंत यशस्वी ठरले आहेत. त्यांची प्रगती चकित करणारी आहे. निर्मला सीतारामन यांची प्रगती तर नेत्रदीपक म्हणावी लागेल. त्या सगळ्यांमध्ये एक धागा समान आहे तो म्हणजे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्थापन केलेल्या इंडिया फाऊन्डेशनचे ते महत्त्वाचे सदस्य आहेत. इंडिया फाऊन्डेशन नावाने ओळखले जाणारे थिंक टँक २०१४ मध्ये स्थापन करण्यात आले. त्यापूर्वी राम माधव हे अनेक वर्षे नरेंद्र मोदींसोबत गुजरातमध्ये काम करीत होते. समांतर सत्ता केंद्र अशी राम माधव यांची ओळख आहे. संघ आणि भाजपाशी संबंधित व्यक्तींनी यातºहेचे आठ थिंक टँक निर्माण केले आहेत. त्यापैकी इंडिया फाऊन्डेशन आणि विवेकानंद इंटरनॅशनल फाऊन्डेशन हे अधिक शक्तिशाली आहेत. त्यातूनच नरेंद्र मोदी यांना गुणवंत नेत्यांचा पुरवठा होत असतो. निर्मला सीतारामन यांची पदोन्नती अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यामुळे झाली असे बोलले जाते. पण त्यांच्या यशामागे राम माधव यांचाच हात असून प्रत्येक पातळीवर त्यांनीच सीतारामन यांना पुढे करण्याचा प्रयत्न केला आहे.
जुन्या नोटांचे रहस्य गडद झाले-
नोटाबंदीनंतर बँकेत जमा झालेल्या नोटांच्या गणतीनंतर रिझर्व्ह बँकेने रु.१५.४४ लाख कोटीच्या जमा झालेल्या नोटांपैकी रु.१५.२८ लाख कोटीच्या जुन्या नोटांची मोजणी पूर्ण झाली असून अंतिम आकडेवारी लवकरच कळविण्यात येईल असे रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे. त्यामुळे जुन्या नोटांचे रहस्य अधिक गडद झाले आहे. रु.१६००० कोटीच्या नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झालेल्या नाहीत हे त्यामुळे स्पष्ट झाले. याशिवाय नेपाळ राष्ट्रीय बँकेत आणि अन्य शेजारी राष्टÑात जमा झालेल्या नोटा वेगळ्या आहेत. हा आकडा रु.८००० कोटींच्या वर असावा. सहकारी बँकांकडील रु.७००० कोटीच्या नोटा रिझर्व्ह बँकेने अद्याप स्वीकारलेल्या नाहीत. याशिवाय अनिवासी भारतीयांनी रिझर्व्ह बँकांच्या शाखांसमोर आपल्या जवळील नोटा जमा करण्यासाठी रांगा लावल्या होत्या आणि त्या जमा करण्यासाठी सरकारने वारंवार नियमात मनमानी सुधारणा केल्या होत्या. याशिवाय आयकर विभाग, ई.डी., राज्यातील पोलीस दले यांना आपल्याकडील नोटा रिझर्व्ह बँकेत जमा करता आल्या नाहीत त्या वेगळ्याच. तेव्हा प्रत्यक्षात अधिक नोटा छापण्यात आल्या होत्या का या प्रश्नाचे उत्तर कुणापाशीच नाही. या सर्व नोटा बँकेत जमा करण्याची परवानगी देण्यात आली तर काय होईल, या कल्पनेने सरकार घाबरलेले आहे हे मात्र खरे!
महागठबंधनमध्ये ममतांना केजरी हवे!
१७ विरोधी पक्षांच्या महागठबंधनमध्ये आम आदमी पार्टीचा समावेश करावा असे ममता बॅनर्जींना वाटते. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल हे प्रभावशाली असल्याने ते महागठबंधनमध्ये हवे असे ममता बॅनर्जीचे म्हणणे आहे. पण ‘आप’ला महागठबंधनमध्ये स्थान राहणार नाही हे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. स्वप्नांचे सौदागर म्हणून अरविंद केजरीवाल यांचा लौकिक असल्यामुळे त्यांच्यापासून दूर राहा असा सल्ला काँग्रेसने ममता बॅनर्जींना दिला आहे. आपण कधीच राजकीय पक्ष स्थापन करणार नाही उलट आपल्या विजयासाठी काम करू असे सांगून केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांची फसवणूक केली होती हे काँग्रेसने मान्य केले आहे. पण केजरीवालांना सोडायला ममता तयार नाहीत. कारण २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान म्हणून ममता बँनर्जींच्या नावाचा पुरस्कार करण्याचे केजरीवाल यांनी अभिवचन दिले आहे म्हणतात!
-हरीश गुप्ता
‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर