विजयाचे ‘वरुड पॅटर्न’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 01:02 AM2018-03-08T01:02:53+5:302018-03-08T01:02:53+5:30
निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही.
निवडणुकीत जी व्यक्ती विजय मिळवते तो विजय त्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे की निवडणूक जिंकण्याच्या तंत्राचा? अर्थातच कार्यकर्तृत्वाचा असला पाहिजे. पण, दुर्दैवाने आजच्या निवडणुका या निवडणूक जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे तंत्र ज्याला साधले तो सत्ताधीश. मग त्यात ती सत्ता सांभाळण्याची क्षमता आहे की नाही, याकडे बघायला कुणाकडेच वेळ नाही. म्हणूनच मेघालयात फक्त दोन आमदार असलेला पक्ष सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका वठवतो आणि तब्बल २१ आमदार जिंकून जनाधार आपल्यासोबत आहे हे सिद्ध करणारा पक्ष विरोधी बाकावर बसतो. निवडणूक व त्यासाठी आवश्यक असलेले राजकारण मग ते दिल्लीच्या तख्ताचे असो वा गल्लीतल्या संस्थेचे. आजच्या निवडणुका अशाच जिंकण्याच्या तंत्रावर जिंकल्या जात आहेत. हे ‘तंत्र’ नव्याने आठवण्याचे कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाची निवडणूक आहे. काल-परवाच या निवडणुकीचा निकाल लागला. नागपुरातून तीन जागांकरिता सात उमेदवार रिंगणात होते. यापैकी नागपूर शाखेचे नरेश गडेकर, शेखर बेंद्रे, प्रमोद भुसारी अपेक्षेनुसार विजयी झाले. यामध्ये रंगसेवक पॅनलचे अनिल चणाखेकर, सलीम शेख या अनुभवी रंगकर्मींना पराभवाचे तोंड बघावे लागले. दिलीप देवरणकर व दिलीप ठाणेकर यांना मिळालेली अनुक्रमे १११ व २८ मतेही फारच बोलकी आहेत. ही निवडणूकही तंत्राने जिंकण्यात आल्याची चर्चा आता रंगत आहे. या तंत्राचे गोड नामकरणही झाले आहे. ‘वरुड पॅटर्न’. हा ‘वरुड पॅटर्न’ नेमका काय आहे आणि तो या निवडणुकीत कसा चालला, याची कथाही नाटकाइतकीच रंजक आहे. वरुडच्या एका शाळेतील तब्बल ७९ जण नाट्य परिषदेचे मतदार आहेत. विशेष म्हणजे, या सगळ्यांचा पत्ताही सारखाच आहे. यातल्या ६६ जणांनी या निवडणुकीत मतदान केले. आजूबाजूच्या शहरात नाटकाची फारशी चर्चा नसताना वरुडसारख्या छोट्या गावातील एकाच शाळेत इतके मतदार असणे व त्यांनी या निवडणुकीत व्यापक सक्रियता दाखवणे, यात काहीच वावगे नाही. प्रश्न हा आहे की यातल्या किती जणांना नाटक नावाचा प्रकार माहिती आहे? जे उमेदवार मैदानात होते त्यांचे जवळपास १०० नातेवाईकही या निवडणुकीत मतदार होते. याचा अर्थ निवडणूक डोळ्यापुढे ठेवूनच मतदारांची संख्या पद्धतशीर वाढविण्यात आली आणि निवडणुकीत ती मते आपल्याकडे वळती करण्यात आली, असे म्हणण्याला पूर्ण वाव आहे. खंत एकाच गोष्टीची की या निवडणुकीत तंत्र जिंकले पण नाटक हरले. नाटक जिंकले असते तर नागपूर-विदर्भातील नवोदित रंगकर्मींचा आवाज ‘मध्यवर्ती’पर्यंत पोहोचवता आला असता. ‘वरुड पॅटर्न’ने हा आवाजच दडपून टाकला आहे.