या युद्धाला अंत नाही?
By admin | Published: April 10, 2017 12:32 AM2017-04-10T00:32:51+5:302017-04-10T00:32:51+5:30
सिरियाचा हुकूमशहा आसद याच्या सैन्याने आपल्याच नागरिकांवर रासायनिक अस्त्रे सोडल्यानंतर अमेरिकेने त्याच्या विमानतळावर मिसाईलचे
सिरियाचा हुकूमशहा आसद याच्या सैन्याने आपल्याच नागरिकांवर रासायनिक अस्त्रे सोडल्यानंतर अमेरिकेने त्याच्या विमानतळावर मिसाईलचे हल्ले चढवून त्या देशाच्या सरकारला शासन करण्याचा प्रयत्न केला. त्याची प्रतिक्रिया रशियात उमटून त्या देशाचे अध्यक्ष पुतीन यांनी आपल्या युद्धनौका सिरियाच्या दिशेने रवाना केल्या. पुतीन यांना सिरियाचे आसद सरकार राखायचे, तर अमेरिकेला ते पायउतार करायचे वा दुबळे बनवायचे आहे. या सगळ्या घटनाक्रमामुळे अमेरिका आणि रशिया या दोन जागतिक महाशक्ती पुन्हा एकवार एकमेकींविरुद्ध युद्धाच्या पवित्र्यात उभ्या झाल्या आहेत आणि साऱ्या जगाला त्यांनी चिंतेत लोटले आहे. सिरियन सैनिकांनी केलेला रासायनिक शस्त्रांचा वापर अतिशय निंद्य व निषेधार्ह होता यात शंका नाही. त्यात बळी पडलेल्या लोकांची, त्यातील स्त्रियांची व मुलांची छायाचित्रे कुणाचेही काळीज फाडून टाकणारी होती. मात्र त्यावरचा अमेरिकेचा मिसाईल हल्ल्याचा उपायही तेवढाच हिंसक आणि परिणामशून्य होता. बॉम्बहल्ल्यांनी टणक बनविलेले सिरियाचे विमानतळ त्यामुळे फारसे उद्ध्वस्त झाले नाही आणि त्याची दहशतही तेथील आसद सरकारने घेतली नाही. इराक व लिबियामध्ये अमेरिकेचे हात याआधीच पोळले आहेत. त्याची सिरियाबाबतची धोरणेही फसली आहेत. या स्थितीत अध्यक्ष ट्रम्प यांनी मिसाईल हल्ल्याचा आदेश आपल्या विमान दलाला दिला असेल तर त्याचा नेमका उद्देश काय असावा याचीच चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. ट्रम्प हे आसदला सत्तेवरून खाली ओढू शकत नाहीत. तसा कित्येक वर्षे बराक ओबामांनी केलेला प्रयत्नही फसला आहे. या हल्ल्यांनी सिरियात शांतता निर्माण होण्याची शक्यताही फारशी नाही. ज्या देशातील पाच लक्ष माणसे तेथे सुरू असलेल्या अल-कायदाविरोधी व यादवी युद्धात मृत्यू पावली आहेत आणि ज्याचे एक कोटी वीस लाखांहून अधिक लोक निर्वासित होऊन इतर देशांकडे आश्रय मागत आहेत तो देश अशा हल्ल्यांनी एकाएकी शांत होईल याची शक्यताही फारशी नाही. त्यातून या तेढीत रशियाचे आरमार उतरत असेल तर हे युद्ध आणखी लांबण्याची व ते अधिक तीव्र होण्याची शक्यताच मोठी आहे. या परिणामांची जाणीव अमेरिकेला नाही असे कोण म्हणेल? तरीही त्याने सिरियावर हल्ले चढवले असतील तर त्याची उघड दिसणारी कारणे बरीच आहेत. रासायनिक शस्त्रांचा वापर हे जगाने निषिद्ध ठरविलेले कृत्य सिरियन सैनिकांनी केले असेल तर त्यांना शासन करणे हे जगाचे कर्तव्य आहे. ते करायला नाटोसह इतर देश पुढे येत नसतील तर ती आपली नैतिक जबाबदारी आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र व संरक्षण मंत्रालयाला वाटले असणार. जगाचे ‘मॉरल पोलीस’ होण्याची मानसिकता तशीही त्या देशाने दुसऱ्या महायुद्धापासून बनवून घेतली आहे. आपण कोणतीही कारवाई केली नाही तर जगाच्या राजकारणावरील आपला प्रभाव संपुष्टात येईल असेही त्या देशाच्या सरकारला वाटले असणे अस्वाभाविक नाही. मात्र मध्य पूर्वेतील समस्या अशा हल्ल्यांनी सुटणाऱ्या नाहीत. त्याला वर्तमानाएवढीच मध्ययुगीन इतिहासाचीही फार मोठी पार्श्वभूमी आहे. सातव्या शतकात सुरू झालेले इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीतले युद्ध सातशे वर्षे चालून चौदाव्या शतकात संपले ही बाब सहजपणे विसरता येण्याजोगी नाही. बराक ओबामांनी ‘आता आपले जुने वैर विसरू या’ अशा आशयाचे जे भाषण इजिप्तच्या ऐतिहासिक व्यासपीठावरून मध्य आशियातील जनतेला उद्देशून केले त्याचाही फारसा परिणाम नंतरच्या काळात कुठे दिसला नाही. त्यातून अल-कायदा, तालिबान किंवा बोकोहरामसारख्या धार्मिक अतिरेक्यांनी त्या प्रदेशातील मध्यममार्गी माणसांच्याच आयुष्याची कोंडी चालविली आहे. त्यांचे तेथील अस्तित्वही अमेरिकेचा प्रभाव वाढू न देणारे आहे. जगाच्या राजकारणाची सगळी समीकरणेच सध्या बदलली आहेत. मध्य पूर्वेतील आताचे दीर्घकाळ चाललेले युद्ध, रशियन साम्राज्याचा शेवट, चीनचा नवा उदय आणि उत्तर कोरियाचे धटिंगणपण यांनी यापुढील काळातील जागतिक राजकारणाचा विचार वेगळ्या पातळीवर करण्याची गरज साऱ्यांच्या लक्षात आणून दिली आहे. या बदलाने महासत्तांचा एकेकाळचा जगाच्या राजकारणावरचा प्रभाव जसा कमी झाला तसेच नव्या सत्तांचे त्यातील आग्रहही बलशाली झाले आहेत. सिरियासारखे देश जोवर स्वत:हून अंतर्गत शांतता उभी करण्यासाठी झटत नाहीत तोवर जागतिक महासत्तांनी कितीही प्रयत्न केले तरी मध्य पूर्वेतील आताचे संकट टळणार नाही हे उघड आहे. एक शंका मात्र येथे नोंदविण्याजोगी आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ट्रम्प यांना येऊन अकरा आठवडे झाले आहेत. या काळात त्यांना त्यांच्याच देशात असलेला विरोध तीव्र झालेला दिसत आहे. तो शांत करण्यासाठी व आपल्या जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्यासाठी ट्रम्प यांनी आताच्या मिसाईल हल्ल्याची जोखीम पत्करली असेल तर तीही तेवढीच निंद्य व निषेधार्ह बाब ठरणारी आहे. आताची स्थिती स्फोटाच्या नजीकची आहे आणि ती आपापल्या देशात बसून व तेथूनच आरमारी आणि हवाई कारवाया करून बदलणारी नाही. त्यासाठी या क्षेत्रातील सर्व कर्त्या शक्तींनी एकत्र बसून या स्थितीवर मात करणेच गरजेचे आहे.