आपापल्या मतदारसंघात जाण्याची भाजपा खासदारांना ताकीद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 02:57 AM2018-08-03T02:57:07+5:302018-08-03T02:57:35+5:30

परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज या आपल्या वक्तव्याविषयी जागरूक असतात. लोकांशी बोलताना त्या अत्यंत सावध असतात. त्यामुळे कधी कधी त्या त्याच घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या सुषमा स्वराज आहेत का, असा लोकांना प्रश्न पडतो.

 Warning to the BJP MPs to go to their respective constituencies | आपापल्या मतदारसंघात जाण्याची भाजपा खासदारांना ताकीद

आपापल्या मतदारसंघात जाण्याची भाजपा खासदारांना ताकीद

googlenewsNext

- हरीश गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर)

परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज या आपल्या वक्तव्याविषयी जागरूक असतात. लोकांशी बोलताना त्या अत्यंत सावध असतात. त्यामुळे कधी कधी त्या त्याच घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या सुषमा स्वराज आहेत का, असा लोकांना प्रश्न पडतो. मोदी सरकारमध्ये मंत्री झाल्यापासून त्यांच्यात खूपच बदल झाला आहे. पण आता त्यांच्यात आणखी बदल झाला असून नुकत्याच झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत त्यांनी सर्वांना चकित केले. त्यांनी उपस्थित शेकडो खासदारांना बजावून सांगितले की येत्या १० आॅगस्टनंतर ते दिल्लीत दिसता कामा नये. त्यांनी खेडोपाडी जाऊन मोदींच्या योजनांची माहिती लोकांना द्यावी. तसेच मोदी सरकारने काय काय साध्य केले हे लोकांना समजावून सांगावे. १० आॅगस्टनंतर प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघातच रहावे. संसदीय मंडळाच्या बैठकीत वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचेनंतर सुषमा स्वराज यांचेच भाषण झाले. खासदारांनी आता आपापल्या मतदारसंघांकडे लक्ष पुरवायला हवे यावर त्यांनी भर दिला. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन हे या संसदेचे शेवटचे अधिवेशन असेल असेही त्यांनी स्पष्ट केले. यावरून लोकसभा निवडणुका या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि मिझोराम या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच घेण्यात येतील असाच त्यांनी जणू संकेत दिला. सर्वात आश्चर्य म्हणजे सुषमा स्वराज यांच्या भाषणानंतर भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे झाली. त्यांनी सुषमा स्वराज यांच्या म्हणण्याविषयी बोलण्याचे टाळले. त्यांच्या मौनामुळे सगळे खासदार मात्र चिंतीत झालेले दिसले. त्यामुळे सर्वांनी राजधानी दिल्लीचा त्याग करून १० आॅगस्टनंतर आपापल्या मतदारसंघात जायचे ठरवले असेल तर त्यात आश्चर्य वाटायला नको. बहेनजींचे ऐकायलाच हवे ना!

काँग्रेस कमी जागांवर लढणार?
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, आता आघाडीशिवाय पर्याय नाही पण ही आघाडी महाराष्टÑ, उत्तर प्रदेश, बिहार आणि तामिळनाडू या चार राज्यांपुरतीच मर्यादित राहील. अन्य राज्यात काही जागांबाबत पक्षाकडून तडजोड केली जाऊ शकते. पण या चार राज्यात लोकसभेच्या ५४३ जागांपैकी २०८ जागा येतात. या चारही राज्यात मिळून काँग्रेस ५० ते ५४ जागा लढवू शकेल. सूत्रांकडून समजते की पक्षाकडून महाराष्टÑात २२, उत्तर प्रदेशात १०, बिहारमध्ये १२ आणि तामिळनाडूत १० जागा लढवल्या जाऊ शकतात. पी. चिदंबरम यांनी काँग्रेसने संपूर्ण देशात आघाडी करून निवडणुका लढवाव्यात असे सुचविले होते. पण राहुल गांधींनी स्पष्ट केले की आघाडी ही केवळ चार राज्यापुरती मर्यादित राहील. अन्य राज्यात काही जागांबाबत तडजोड होऊ शकेल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सोबत जागांची तडजोड करण्यात येईल. तेथील ४२ जागांपैकी केवळ ८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार राहतील. म्हणजेच वरील चार राज्ये आणि पश्चिम बंगाल मिळून होणाºया पाच राज्यातील २५० जागांपैकी ६० जागांवर काँग्रेस पक्ष लढणार आहे. ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सोनिया गांधींची भेट घेऊन जागांच्या तडजोडीबाबत प्रदीर्घ चर्चा केली. त्यातूृन हे स्पष्ट झाले की २०१९ च्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने आपल्या जागात मोठी कपात करण्याची तयारी केली आहे! सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने ४६१ लोकसभा जागा लढविल्या होत्या. पण आता स्थिती बदलली आहे आणि राहुल गांधींनी वास्तववादी भूमिका स्वीकारली आहे. योजनेप्रमाणे घडले तर काँग्रेसने २६५ ते २८० इतक्या जागा लढविण्याचे ठरविलेले दिसते. केरळात पक्षाने अगोदरच आघाडी केली आहे. मायावतींना उत्तर प्रदेशच्या बाहेर काँग्रेसकडून जागा हव्या आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या संख्येत आणखी घट होऊ शकते.

उपसभापतींच्या कक्षाची विल्हेवाट
राज्यसभेत सत्तारूढ पक्षापाशी पुरेसे संख्याबळ नसल्याने उपसभापतींच्या जागेसाठी निवडणूक घेण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्या जागेसाठी सर्वसंमती व्हावी असा प्रयत्न उपराष्टÑपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केला. पण निदान पावसाळी अधिवेशनात ते होणार नाही असे सरकारकडून त्यांना सांगण्यात आले. आता असे समजते की उपराष्टÑपतींनी उपसभापतींच्या कक्षाचा ताबा घेतला आहे. कक्षात डायनिंग टेबलसह डझनभर खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय कक्षात तात्पुरते पार्टीशन टाकून पलीकडे विश्रांती घेण्यासाठी शयनकक्ष निर्माण करण्यात येत आहे. उपराष्टÑपतींना सभागृहात बराच वेळ बसावे लागते. त्यामुळे दुपारी वामकुक्षी घेण्याची व्यवस्था कक्षातच करण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना ६ मौलाना आझाद मार्गावरील स्वत:च्या निवासस्थानी विश्रांती घेण्यासाठी जायची गरज पडणार नाही. उपराष्टÑपती हे उपसभापतिपदाची जबाबदारी सांभाळत असल्याने उपसभापतिपदी कुणाची नियुक्ती करण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.

५१ टक्के मते मिळविण्याचे
अमित शहांचे स्वप्न
परस्पर विरोधी वक्तव्ये होत असली तरी लोकसभा निवडणुका या लवकर घेण्यात येणार नाहीत असे भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. लोकसभा आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यात याव्यात असे जरी भाजपाला वाटत असले तरी याबाबत सहमती होण्याची गरज आहे, असे अमित शहांना वाटते. ‘‘जनतेने आम्हाला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. तेव्हा आम्ही त्यापेक्षा एक तास देखील कमी काळ राज्य करणार नाही’ असे त्यांनी आपल्या कोअर ग्रुप टीमला सांगितले आहे. लोकसभेसाठी भाजपाला ५१ टक्के मते मिळावीत असा आमचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले. उत्तर प्रदेशातील कैरानाची जागा कठीण समजली जाते. तेथे पक्षाला ४७ टक्के मते मिळाली होती. त्या ठिकाणी विरोधकांनी संयुक्तपणे लढत देत ती जागा जिंकली असली तरी भाजपाच्या मतसंख्येत वाढ होऊन ती ४७ टक्के इतकी झाली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत ४१ टक्के मते मिळून ती जागा भाजपाने जिंकली होती. पक्षाला विरोधकांच्या ऐक्याची चिंता वाटत नाही. ‘‘राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून समोर केले जात आहे हे चांगलेच आहे. कारण त्यांची मोदींशी तुलनाच होऊ शकत नाही’’ असे अमित शहांना वाटते. त्यामुळे भाजपाच्या मतात ५ टक्के वाढच होईल, असे सांगून अमित शहा यांनी पत्रकारांसमोर आकड्यांची आतषबाजीच केली. ते म्हणाले की ९ लाख बूथपैकी ७ लाख बूथवर भाजपाचे कार्यकर्ते प्रभावीपणे काम करीत आहेत. एकूण १४.३ कोटी लोकांची त्यांच्या मोबाईल नंबरसह माहिती आमच्याकडे आहे. त्यांच्याशी भाजपाचा एस.एम.एस.च्या मार्फत संपर्क असतो असे त्यांनी स्पष्ट केले. पण ५१ टक्के लोकांपर्यंत कसे पोचणार या प्रश्नाचे उत्तर मात्र त्यांच्यापाशी नव्हते. २०१४ च्या निवडणुकीत विरोधकांची एकजूट नव्हती आणि काँग्रेस पक्षसुद्धा विस्कळीत होता, हेही त्यांनी लक्षात घ्यायला हवे.

Web Title:  Warning to the BJP MPs to go to their respective constituencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.