सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना पोटनिवडणुकांचा निकाल संदेश देणारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 08:31 AM2022-11-07T08:31:23+5:302022-11-07T08:31:45+5:30

महाराष्ट्रासह सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला.

Warning of by elections results to political parties | सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना पोटनिवडणुकांचा निकाल संदेश देणारा!

सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना पोटनिवडणुकांचा निकाल संदेश देणारा!

Next

महाराष्ट्रासह सहा राज्यांतील सात विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. प्रत्येक राज्यातील सत्तारूढ आणि विरोधी पक्षांना ‘केला इशारा जाता जाता,’ अशा प्रकारचा संदेश देणारा हा निकाल आहे. सात विधानसभा मतदारसंघांपैकी महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व मतदारसंघाची निवडणूक होण्यापूर्वीच गाजत राहिली. प्रमुख  विरोधी पक्ष भाजपने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी नाट्यमयरीत्या घेतला आणि त्या निवडणुकीच्या रंगाचा बेरंग झाला.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली होती. त्यांचे निधन हृदयविकाराच्या धक्क्याने अचानकपणे एप्रिलमध्ये झाले. पोटनिवडणूक जाहीर होईपर्यंत शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड होऊन शिवसेनेत उभी फूट पडली. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गट भाजपशी युती करून सत्तेत आला. अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके ठाकरेप्रेमी असल्याने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांनी ही पोटनिवडणूक शिवसेनेकडून लढविण्याचे ठरविले.

महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. ही निवडणूक भाजपने लढविण्याचे निश्चित झाले. मात्र मराठी माणसांच्या अस्मितेची लढत म्हणून शिवसेना मैदानात उतरली असती आणि ठाकरेंची शिवसेनाच ही निवडणूक जिंकण्याचीही शक्यता अधिक होती. त्या  निकालाचा परिणाम आगामी मुंबई महापालिकेवर होऊ नये, म्हणून भाजपने राज ठाकरे यांचा वापर करीत ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव मांडला. भाजपने माघार घेतली; पण काही अपक्षांचे अर्ज राहिल्याने मतदान आणि मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागली. चुरस नसल्याने केवळ बत्तीस टक्के मतदान झाले.

अपक्षांना किरकोळ मात्र ‘नोटा’ला १२ हजार मते पडली. ऋतुजा लटके यांनी ‘नोटा’ या नजीकच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करीत निवडणूक जिंकली.  शिवसेनेच्या रूपात असलेल्या मुंबईतील मराठी माणसांच्या अस्मितेला भाजप प्रचंड घाबरून आहे. शिवसेनेत फूट पडली, तेव्हा आठ-दहा दिवस भाजपचे नेते माध्यमांशी एक शब्द बोलले नाहीत. दररोज सकाळ-दुपार-संध्याकाळ माध्यमांच्या घोळक्यात असणारे भाजपचे नेते मूग गिळून गप्प होते. शिवसेनेत फूट पाडण्यासाठी भाजपची रसद होती, हे काही लपून राहिले नाही. या पोटनिवडणुकीतून माघार घेण्याने ते अधिकच अधोरेखित झाले. महाराष्ट्राशिवाय हरयाणातील अदमपूर, उत्तरप्रदेशातील गोला गोकरनाथ, ओडिशामध्ये धामनगर, तेलंगणाच्या मुनुगोडे आणि बिहारच्या गोपालगंज तसेच मोक्कामा विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका झाल्या. यांपैकी भाजपने हरयाणाना, उत्तरप्रदेश आणि बिहारमधील गोपालगंज या तीन जागा  राखल्या. बिहारमधील दुसरी मोक्कामाची जागा राष्ट्रीय जनता दलाने जिंकली. ती त्याच  पक्षाकडे होती.

थोडा बदल आणि इशारा देणारी निवडणूक ओडिशा आणि तेलंगणामध्ये झाली. या राज्यात अनुक्रमे बिजू जनता दल आणि तेलंगणा राष्ट्र समितीचे वर्चस्व आहे. त्यांचे सरकारही आहे. तेथील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस होता. या निवडणुकीत ती जागा भाजपने घेतली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव भाजपविरोधी राष्ट्रीय पातळीवर आघाडी करीत असताना त्यांच्या राज्यात मुनुगोडे विधानसभा पोटनिवडणूक जिंकून भाजपने घाम फोडला. अखेरच्या काही फेऱ्यांमध्ये मताधिक्य मिळाल्याने तेलंगणा राष्ट्र समितीचे के. प्रभाकर रेड्डी यांचा विजय झाला. काँग्रेस पक्ष तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. ओडिशामध्येही भाजपने ही पोटनिवडणूक जिंकून सलग पाच वेळा बहुमत मिळवणाऱ्या बिजू जनता दलास सूचक इशारा दिला आहे.

उत्तर प्रदेश हा भाजपचाच गड आहे. गोला गोकरनाथमध्ये त्यांनी विजय मिळविला. हरयाणाच्या हिस्सारमधील अदमपूर हा मतदारसंघ गेली पाच दशके माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबीयांकडे आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या पुढच्या पिढीने भाजपला जवळ करीत त्यांचे नातू भव्य बिष्णोई यांनी ही जागा जिंकली. काँग्रेसने चांगली लढत दिली. ‘आप’ तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. सर्वच राजकीय पक्षांना इशारा देत भाजपचा प्रभाव अद्याप कमी झालेला नाही, हे दाखवून दिले आहे. विरोधकांचा मार्ग सरळसोपा, स्पष्ट दिसत नाही. पोटनिवडणुकांचा प्रभाव मर्यादित असतो. तरीही तो एक इशारा समजायला हरकत नाही.

Web Title: Warning of by elections results to political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.