देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

By यदू जोशी | Published: May 16, 2022 01:03 PM2022-05-16T13:03:54+5:302022-05-16T13:12:54+5:30

फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. ६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईला पत्र पाठवलं होतं.

Was Devendra Fadnavis in Ayodhya During Babri Masjid Demolition or CM Uddhav Thackeray claim is True? | देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

देवेंद्र फडणवीस खरंच अयोध्येला गेले होते का?, कधी? आणि कशासाठी?... वाचा, रिअल स्टोरी

googlenewsNext

>> यदु जोशी

देवेंद्र फडणवीस खरेच राममंदिर आंदोलनाच्या वेळी अयोध्येला गेले होते की नाही यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत संशय व्यक्त केला आहे. तेव्हा तुमचं वय किती होतं?, ती काय शाळेची सहल होती का?, या शब्दात ठाकरेंनी फडणवीसांना डिवचले. फडणवीस राम मंदिर आंदोलनाच्या वेळी शाळकरी होते, असा तर्क एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी दिला. त्या आधी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांची खिल्ली उडविली होती. १९९२ मध्ये बाबरी पडली तेव्हा फडणवीस केवळ तेरा वर्षांचे होते. त्यावेळी फडणवीस खरेच अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. त्यामुळे लालकृष्ण आडवाणी यांच्यावर तेरा वर्षांच्या बालकाला अयोध्येस नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी केली होती. 

आता प्रश्न निर्माण झाला आहे तो हा की, फडणवीस खरेच अयोध्येला आंदोलनासाठी गेले होते का? उत्तर आहे होय! फडणवीस एकदा नाही तर दोन वेळा अयोध्येला गेले होते. पहिल्यांदा गेले तेव्हा ते  २० वर्षांचे होते आणि दुसऱ्यांदा गेले तेव्हा २२ वर्षांचे होते. सर्वात आधी ते ऑक्टोबर १९९० रोजी गेले होते पण प्रत्यक्ष अयोध्येपर्यंत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून ते गेले होते. कार्यकर्ते, मित्रांसोबत ते रेल्वेगाडीने अलाहाबादला (आजचे प्रयागराज) गेले. तेथील सीताराम मंदिरात ते पाच दिवस राहिले. नंतर शंकराचार्यांच्या नेतृत्वात अयोध्येकडे निघालेल्या शेकडो कारसेवकांसोबत ते अयोध्येच्या दिशेने निघाले आणि काही किलोमीटर पायी चालल्यानंतर पोलिसांनी त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना बदायूच्या जेलमध्ये बंदिस्त केले. तेथे ते १७ दिवस राहिले. फडणवीस यांच्यासोबत त्यावेळी असलेले संजय बंगाले, उदय डबली, शशि शुक्ला या मित्रांनी त्यावेळच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी तिथे मुलायमसिंह यांचे समाजवादी पार्टीचे सरकार होते. मात्र, बदायूचे जेलर रामभक्त होते. त्यांची पत्नी आणि दोन मुले राममंदिर आंदोलनात अटक करून प्रतापगडच्या तुरुंगात ठेवलेले होते अशी आठवण अ‍ॅड.उदय डबले यांनी सांगितली. 

६ डिसेंबरला अयोध्येतील वास्तू जमीनदोस्त करण्यात आली तेव्हा फडणवीस हे घटनास्थळी हजर होते. ते बाबरी मशिदीचा ढाचा पाडला जात असताना ढाच्याजवळ आंदोलक म्हणून होते. त्यांच्यासोबतचा थापा नावाचा नागपूरहून आलेला कार्यकर्ता घुमटावर चढला होता. मी देखील ढाचाजवळ घोषणा देत पुढेपुढे सरकत होतो, असे फडणवीस यांचे मित्र आणि आता नागपुरात नगरसेवक असलेले संजय बंगाले यांनी सांगितले. '२ डिसेंबरलाच आम्ही अयोध्येला पोहोचलो होतो आणि आमचा नागपूरचा मित्र  महेश रामडोवकर याचे नातेवाईक पुजारी असलेल्या काळा राम मंदिरात मुक्कामी होतो. ६ डिसेंबरला सकाळपासूनच अयोध्येतील वास्तूसमोर जाहीर सभा सुरू झाली होती. त्या ठिकाणी आम्ही होतो', असे फडणवीस यांचे बालमित्र हर्षल आर्विकर यांनी सांगितले. 

आधी फडणवीस पोहोचले अन् नंतर पोहोचले पत्र

तेव्हा मोबाईल वगैरे नव्हते. बदायूच्या जेलमधून फडणवीसांनी नागपूरला आईस पत्र पाठविले आणि जेलमध्ये आहे, पण जिवाला काही धोका नाही असे कळविले. आश्चर्याची बाब म्हणजे बदायूच्या जेलमधून सुटका होऊन फडणवीस ज्या दिवशी नागपूरला घरी परतले. त्याच्या दुसऱ्या दिवशी हे पत्र त्यांच्या घरी आले.

Web Title: Was Devendra Fadnavis in Ayodhya During Babri Masjid Demolition or CM Uddhav Thackeray claim is True?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.