रईसी यांचा मृत्यू फक्त अपघातीच होता, की घातपाती? धुक्याचे गूढ कायम!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:20 AM2024-05-21T11:20:09+5:302024-05-21T11:22:09+5:30

रईसी यांच्या अपघाती मृत्यूवरून आठवण होते, ती भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची. हवामान खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला. मात्र, मृत्यू घातपाती असावा, अशा चर्चा त्या वेळी झाल्या. रईसी यांचाही मृत्यू फक्त अपघातीच होता, की घातपाती होता, हे येत्या काळात समोर येईल. धुक्याचे गूढ वलय सध्या तरी कायम आहे!

Was Raisi's death just an accident or fatal The mystery of fog remains | रईसी यांचा मृत्यू फक्त अपघातीच होता, की घातपाती? धुक्याचे गूढ कायम!

रईसी यांचा मृत्यू फक्त अपघातीच होता, की घातपाती? धुक्याचे गूढ कायम!

इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांच्यासह परराष्ट्रमंत्री हुसेन आमिराब्दुल्लिहान यांचा रविवारी मध्यरात्री हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता, की त्यात हेलिकॉप्टरमधील नऊजणांपैकी कुणीही वाचल्याची शक्यता नाही. इराणच्या वायव्येकडील जोल्फा भागात हा अपघात झाला. रईसी आणि इतर वरिष्ठ अधिकारी, मंत्री अझरबैजान सीमेवरील एके ठिकाणी भेट देऊन परतत होते. त्यावेळी धुके आणि खराब हवामानामध्ये त्यांचे हेलिकॉप्टर कोसळले. पश्चिम आशियामधील आणि विशेषत: इराणसंदर्भातील आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहिल्या, की रईसी यांच्या अपघाती मृत्यूमागे गूढतेचे वलय निर्माण होते.

 इराणमधील स्थानिक घटनाक्रमाकडेही अर्थातच दुर्लक्ष करता येणार नाही. इराणने पाश्चिमात्य देशांविरोधात ठोस भूमिका वेळोवेळी घेतली आहे. रईसी यांचा अशा भूमिका घेण्यात मोठा वाटा होता. सध्या सुरू असलेल्या हमास-इस्रायल संघर्षात इराणची भूमिका हमासच्या बाजूने होती. शीतयुद्ध १९९० साली संपले असले, तरी आंतरराष्ट्रीय भूराजकीय संबंधांमध्ये अद्यापही दोन फळ्या ठळकपणे दिसतात. पश्चिम आशियातील राजकारणाला ती एक किनार आहे. अण्वस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी इराणचे प्रयत्न आणि त्याला इस्रायल, अमेरिकेसह इतर पाश्चिमात्यांच्या असलेल्या विरोधातून इराणबरोबरील अणुकराराचा जन्म झाला. ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेने या करारातून आपले अंग काढून घेतले. त्यानंतर तातडीने अण्वस्त्रांच्या बाबतीतील निर्देशांचे उल्लंघन इराणने सुरू केले. या सर्व काळात चीनचाही येथील राजकारणातील प्रवेश वाढत गेला. इतका की, सौदी अरेबिया आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीनने पुढाकार घेतला. ही घटना रईसी यांच्या काळातील. 

रशियाशीही इराणचे जवळचे संबंध. सीरियामध्ये इराणच्या वकिलातीवर इस्रायलने या वर्षी एप्रिल महिन्यात हल्ला केला. त्यात इराणच्या महत्त्वाच्या लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. या अधिकाऱ्यांनी इस्रायलविरोधातील छुप्या गटांना पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो. यानंतर इस्रायल-इराण दोन्ही देशांतील संबंध कमालीचे बिघडले. इराणने अक्षरश: शेकडो क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर हल्ला चढवला. यात शेकडो ड्रोनसह क्रूज, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचाही समावेश होता. इस्रायलच्या अभेद्य अशा क्षेपणास्त्रभेदी सुरक्षा यंत्रणेने त्यावेळी इस्रायलचे रक्षण केले. इस्रायल-हमास संघर्ष सुरू असतानाच या सर्व गोष्टी घडल्या. यातून इराण-इस्रायलमध्ये कडवटपणा आणखी वाढला. त्यामुळे रईसी यांच्या अपघाती निधनानंतर संशयाची सुई इस्रायलकडे वळली आहे. मात्र, खुद्द इराणने अद्याप अपघातामागे अशा प्रकारच्या कुठल्याही घातपाताची शक्यता वर्तवलेली नाही आणि इस्रायलने कुणी आरोप करण्यापूर्वीच आम्ही त्यामागे नाही, असे स्पष्टपणे सांगितले. रईसी यांच्या मृत्यूनंतर इराणची पुढील धोरणे आता कशी राहतील हे पाहणे महत्त्वाचे आहे. इराणचे सर्वोच्च नेते खामेनी आणि इराणची एकूण राजकीय व्यवस्था पाहिली, तर परराष्ट्र धोरणांत मूलगामी बदल दिसेल, असे अजिबात नाही.

 स्थानिक पातळीवरील धोरणात रईसी यांच्याइतकाच प्रबळ दावेदार या पदासाठी मिळेल का, हे मात्र पुढील काळ ठरवेल. रईसी यांच्याविरोधात स्थानिक पातळीवर असंतोष होता. कायद्याची कठोर अंमलबजावणी करणारे नेते म्हणून ते ओळखले जात. एका कुर्दिश इराणी तरुणीला हिजाबसंदर्भातील कायदा मोडल्याबद्दल अटक झाली आणि तिचा कोठडीतच मृत्यू झाला. संपूर्ण देशभर याविरोधात निदर्शने झाली. या आंदोलनाची व्याप्ती मोठी असली, तरी इराण सरकारने ती कठोरपणे चिरडून टाकली. इतक्या निदर्शनांमध्येही रईसी यांनी महिलांसाठी असलेल्या विशिष्ट ड्रेसकोडचा पुरस्कार केला.

विरोधातील आंदोलन मोडून काढण्यात अनेकांचा बळी गेला. १९८८ मध्ये इराकबरोबरील युद्धानंतर ज्या राजकीय कैद्यांना मृत्युदंडाच्या शिक्षा झाल्या, त्या शिक्षा देण्यातही रईसी यांचा सहभाग असल्याचे मानले जाते. रईसी यांच्या मृत्यूनंतर इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी परंपरेप्रमाणे उपाध्यक्ष महंमद मोखबर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पुढील पन्नास दिवसांत नवीन अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. रईसी यांच्या अपघाती मृत्यूवरून आठवण होते, ती भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची. हवामान खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला. मात्र, मृत्यू घातपाती असावा, अशा चर्चा त्या वेळी झाल्या. रईसी यांचाही मृत्यू फक्त अपघातीच होता, की घातपाती होता, हे येत्या काळात समोर येईल. धुक्याचे गूढ वलय सध्या तरी कायम आहे!
 

Web Title: Was Raisi's death just an accident or fatal The mystery of fog remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.