वट वट सावित्रीची कथा
By संदीप प्रधान | Published: July 6, 2018 02:35 AM2018-07-06T02:35:16+5:302018-07-06T02:35:32+5:30
काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का?
काँग्रेसचे सत्यवचनी युधिष्ठिर पृथ्वीराजबाबा यांनी पुण्याचे ऋषितुल्य उल्हासदादांना प्रश्न पुसला की, हाताला लकवा मारल्यानं असलेली सत्ता गमावून वनवास नशिबी आलेल्या काँग्रेससारखी कुणी पतिव्रता आहे का? त्यावर ऋषीवर उल्हासदादा आपल्या लालेलाल दाढीवरून हात फिरवत व दोन्ही हात हवेत झाडत टाळी देत हास्यचित्कार करीत बोलले की, शिवसेना नावाच्या वट वट सावित्रीने आपल्या पातिव्रत्याची अशीच घोर परीक्षा दिली आहे. तुंबई नामे नगरीवर उद्धवोठाकरी नामे राजा राज्य करीत होता. त्याची कन्या शिवसेना ही लहानपणी अत्यंत व्रात्य, उत्पाती, राडेबाज होती. अशा कन्येशी कुणी विवाह करणार नाही या विवंचनेतून उद्धवोठाकरी राजाने महत्प्रयासाने आपल्या कन्येची शांती केली. या धार्मिक विधीत त्याला अनिलकुमार देसाई, डॉ. नीलम गोºहेताई आदी दरबारी सहकाऱ्यांनी साथ दिली. शिवसेना विवाहयोग्य झाली तेव्हा उद्धवोठाकरी राजाने तिला तिचा वर निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. शिवसेना कधी बारामती नगरीचे राजे शरदबाबू भानामतीकर यांना डोळा घालायची तर कधी नागपूरकर देवेंद्रभाऊ फडणवीस यांचा गालगुच्चा घ्यायची. धर्मशास्त्रानुसार जो पिता विवाहयोग्य कन्येचे कन्यादान करीत नाही त्याला निंदनीय मानले गेले आहे. मात्र आपली कन्या वट वट सावित्री काय गुण उधळेल, या चिंतेनी धर्मशास्त्र धाब्यावर बसवून उद्धवोठाकरी राजाने तिला स्वातंत्र्य बहाल केले. मध्यंतरीच्या पंधरा वर्षांत शिवसेना वणवण फिरली. पण तिला वर काही मिळाला नाही. शिवसेनेची ही वणवण न पाहून खाद्यमहर्षी नितीनभाऊ गडबडकरी यांनी उद्धवोठाकरी राजाला ‘मातोश्री’ महाली फोन केले. मात्र खाद्यमहर्षींचे फोन उद्धवोठाकरी राजाचे अमात्य मिलिंद नार्वेकर राँगनंबरवाले यांनी घेतले व हॅलो हॅलो करून ठेवून दिले. अखेरीस बरीच डोळे मारामार केल्यावर या वट वट सावित्रीला वर लाभला. त्याला घेऊन ती तुंबई नगरीत आली तेव्हा उद्धवोठाकरी हे देवर्षी संजय राऊतमुनींसोबत बसले होते. मिशीला पिळ देत मुनीवर म्हणाले की, हा विवाह फार काळ टिकणार नाही. या वराच्या गळ्याला अल्पावधीत नख लागेल व कुणी लावले नाही तर मीच लावेन. शिवसेना विवाहाकरिता आता घायकुतीला आली होती. तिने आपल्या पित्याला कन्यादान करण्याची गळ घातली. विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. देशोदेशीचे राजे-महाराजे हजर राहिले. पंचपक्वान्नाच्या पंक्ती उठल्या. अत्तराचे कारंजे थुईथुई नाचले. शिवसेना आपल्या पतीला अल्पायुषी ठरवण्याकरिता रोजच त्याचा छळ करू लागली. रोजच घर सोडून पळून जाण्याचे इशारे देऊ लागली. वट वट सावित्रीचा हा व्याप असह्य होऊन एक दिवस तिचा पती जंगलात लाकडं फोडायला गेला. पतीच्या मागं हात धुवून लागलेली ही सावित्री मागं मागं गेली. पतीला ढगात पोहोचवण्याकरिता तिनं ‘नाणार व्रत’ केलं होतं. त्यामुळं जो भेटेल त्याला ती जाणार...जाणार... सांगत सुटली होती. ईव्हीएमवर स्वार यमराज समोर उभे राहताच सावित्रीचा पारा चढला. अरे, यमा तू याचे प्राण सोबत न्यायला आलायस की, याच्या कुडीत प्राण फुंकायला आलायस, अशी दमदाटी तिनं केली. भयभीत यमानं सावित्रीला वर मागण्यास सांगितले. तेव्हा ती बोलली की, पुढील सात निवडणुकीत पतीविना १५१ आमदारांनी माझी कूस उजू दे...
(तिरकस)