‘पाणी म्हणजे भाऊ’

By Admin | Published: March 22, 2016 02:58 AM2016-03-22T02:58:51+5:302016-03-22T02:58:51+5:30

धरण, बंधारे, तलाव यात साठविलेले पाणी लोकांना वाटण्याबाबत अनेकांनी मार्गदर्शन केले, संघर्ष पुकारले, लढे दिले. पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे अशी निघतील

'Water is brother' | ‘पाणी म्हणजे भाऊ’

‘पाणी म्हणजे भाऊ’

googlenewsNext

धरण, बंधारे, तलाव यात साठविलेले पाणी लोकांना वाटण्याबाबत अनेकांनी मार्गदर्शन केले, संघर्ष पुकारले, लढे दिले. पण हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच माणसे अशी निघतील की ज्यांनी अगोदर निसर्गाने दिलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब न् थेंब अडवून व जिरवून, त्याचा रिसायकलिंगद्वारे वापर करून व ते शुद्ध करून उत्पादक कामासाठी त्याचा वापर केला. इतकेच नव्हे तर त्यातून लाखो लोकांना रोजगार देऊन त्यांचे प्रपंच उभे करतानाच देशाच्या तिजोरीतही कोट्यवधींची भर घालून शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात स्थिरता आणली आहे. हे काम करणारे भवरलालजी हे देशातील मोजक्या नामवंत व्यक्तींत व उद्योगपतींमध्ये गणले जातील. अलीकडेच २७ फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले आणि युनोने २२ मार्च हा जलदिन ‘पाणी आणि रोजगार’ या विषयासाठी अर्पण केला. त्यांच्या निधनानंतर हाच विषय चर्चेला यावा हा दुर्मिळ योग आहे.
पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम आपण प्रभावीपणे ‘माथा ते पायथा’ या शास्त्रीय तत्त्वानुसार राबविला पाहिजे, असा नुसता आग्रह धरून मोठेभाऊ थांबले नाहीत. त्यांनी जळगावातील जैन हिल्सवरील हजारो एकरात, कोईमतूर, उदमलपेठ येथील तीन हजार एकरावर पाणलोट क्षेत्र विकासाचे सर्व उपचार शास्त्रीय पद्धतीने पूर्ण करून स्वत:चे कोट्यवधी लिटर पाणी निर्माण केले. डोंगरावरील मातीची धूप होता कामा नये यावर भाऊंचा जेवढा कटाक्ष असे तितकीच बारीक नजर नदी, नाले, ओढ्यात वाहून येणाऱ्या पाण्यावरतीही असे कारण शक्यतो सगळे पाणी भूगर्भातच मुरले पाहिजे. त्यांनी केलेले सर्व हिरवेगार डोंगर व खालचे पाण्याचे भरलेले तुडुंब नाले पाहिले की पाणलोट क्षेत्र विकासाचे एक अतिशय उत्तम, दर्जेदार व शास्त्रशुद्ध मॉडेल म्हणून जैन हिल्सचा उल्लेख करावा लागेल व या क्षेत्रातले नि:पक्षपाती जाणकार तो करतातही.
एवढे करून भाऊ थांबले नाहीत. पाण्याच्या प्रत्येक थेंबागणिक उत्पादन व उत्पादकता वाढली पाहिजे हे सूत्र समोर ठेवून ते काम करीत गेले. त्यातून डोंगरावर आंबा, व्ही-बारा जातीच्या कांद्याच्या बियाण्यांची निर्मिती, पेरू, डाळिंब, मोसंबी, संत्रा यांच्या नवीन वाणांची लागण केली. उत्पादित होणाऱ्या शेतीमालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी जिथे कच्च्या मालाचे उत्पादन होते, तिथेच उभी करणे आणि स्थानिक मनुष्य रोजगारात सामावून घेणे हे पाणलोट क्षेत्र विकासाच्या कार्यक्रमाचे जे अंतिम ध्येय होते ते भवरलालजींनी देशात आणि परदेशात जवळपास २७ कारखाने (प्रकल्प) उभे करून प्रत्यक्ष कृतीत उतरवून दाखविले.
ठिबकचे तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान १९८७ मध्ये पहिल्यांदा भवरलालजींनीच भारतात आणले. एका अर्थाने भारतातल्या ठिबक सिंचनतंत्राचे ते प्रणेते व प्रवर्तक आहेत. पण केवळ तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी तंत्रज्ञान व साहित्यात देशाच्या गरजेनुसार सुधारणा करून जगातले पहिल्या क्रमांकाचे ठिबक-तुषार संचाचे उत्पादक, पाईपचे निर्माते असा नावलौकिक प्राप्त केला. शेती, फळबागांची उभारणी, जनावरांचे संगोपन, त्यांच्यासाठी चारानिर्मिती, टिश्यूकल्चर रोपांची निर्मिती, ग्रीनहाऊस उभारणी, सोलरपंप, फळ प्रक्रिया कारखानदारी उभी करून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करतानाच शेतकऱ्यांकडून रास्त दराने शेतीत उत्पादित झालेल्या कच्च्या मालाची खरेदीही केली. त्यामुळे शेतकऱ्यांची दलाल-अडत्यांकडून होणारी फसवणूक व पिळवणूक थांबली.
मोठ्या धरणांना त्यांनी कधीही प्राधान्य दिले नाही. ते पाणलोटाच्या कार्यक्रमासाठी सतत आग्रही असायचे. दुसऱ्यांना सांगणे सोपे असते, पण भाऊंनी दुसऱ्यांना सांगण्यापूर्वी स्वत: हे सगळे केले. म्हणून त्यांच्या शब्दांना अनुभवांची झालर आणि धार होती. त्यामुळे ‘पाणी म्हटले की भाऊ’ हेच समीकरण डोळ्यांसमोर येते.
- डॉ. सुधीर भोंगळे

Web Title: 'Water is brother'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.