पाण्याऐवजी वाहतो पैसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 02:51 AM2018-05-14T02:51:51+5:302018-05-14T02:51:53+5:30

वर्षभर उठलेला जलयुक्तचा कोलाहल आणि पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करणारी सामान्य माणसं याच मराठवाड्यात आणि यावर्षी सर्वाधिक उसाचे क्षेत्र असणारा हाच मराठवाडा

Water moves instead of money | पाण्याऐवजी वाहतो पैसा

पाण्याऐवजी वाहतो पैसा

googlenewsNext

वर्षभर उठलेला जलयुक्तचा कोलाहल आणि पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करणारी सामान्य माणसं याच मराठवाड्यात आणि यावर्षी सर्वाधिक उसाचे क्षेत्र असणारा हाच मराठवाडा. असे परस्पर विरोधाभासाचे चित्र फक्त येथेच दिसू शकते. मराठवाड्यात जलयुक्त शिवाराची कामे झाली तर पाणी गेले कुठे? या शिवाराच्या नावाखाली निधी जिरला का? असे प्रश्न पडतात. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना अगोदरच बकाल असलेली खेडी आणखीच उदासवाणी वाटतात. टँकरची वाट पाहणारे नागरिक आणि भांड्याच्या रांगा हे गावोगावचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे वर्षानुवर्षे पाहायला मिळते. पूर्वी जलयुक्त शिवार नव्हते तरी हेच चित्र होते.
अर्धा मराठवाडा आज पाणीटंचाईला तोंड देतो आणि ही परिस्थिती आता सवयीची बनली आहे. उन्हाळ्यात पाणी नाही अशी खूणगाठ सर्वांनीच बांधलेली असते. आठ जिल्ह्यांतील ७६ पैकी ३२ तालुक्यांना या टंचाईचा फटका बसलेला दिसतो. विशेष म्हणजे रेल्वे मार्गावरील औरंगाबाद, जालना, परभणी आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये ही गंभीर स्थिती आहे.
औरंगाबादची परिस्थिती तुलनेने वाईट म्हणावी लागेल. पावसाचा हमखास भाग सोयगाव तालुका समजला जातो. यावर्षी सर्वात भीषण अवस्था तेथेच आहे. अजिंठा लेणी असलेल्या फर्दापूरमध्ये पाणी हाच मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे येथे ना पाणीपुरवठा योजना, ना टँकर. या गावाची जनता वाऱ्यावर. हे वाणगीदाखल उदाहरण. सिल्लोड, कन्नड, वैजापूर, गंगापूर, पैठण हे तालुके पाणीटंचाईने गांजले आहेत. मराठवाड्यातील ८५०० गावांपैकी ५११ गावे पाण्यासाठी केवळ टँकरवर अवलंबून आहेत. दहा लाख लोकांना टँकरशिवाय पर्याय नाही.
उन्हाची तीव्रता पाहता एका आठवड्यात ७० गावे वाढली आणि अजून मे संपायचा आहे. जूनमध्ये पावसाचे भाकीत असले तरी तो आला तेव्हा खरे मानायचे. ६५० टँकरद्वारे यांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा हा खर्च ६८ कोटी रुपयांचा आहे. गेल्या पाच वर्षांतील टंचाई परिस्थितीचा आढावा घेतला तर मराठवाड्यात ५५० कोटी रुपये खर्च झाले. ९०३७ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. या साडेपाचशे कोटी रुपयांत एखादी शाश्वत योजना उभी राहू शकली असती; परंतु एका अर्थाने मराठवाड्यातील टँकर लॉबी पोसण्यावर ती खर्च झाली. एवढे टँकर लावूनसुद्धा लोक तहानलेले आहेत. तर पाणी गेले कुठे हा प्रश्न पडतो. अनेक टँकर कागदावरच धावण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे या टँकर लॉबीत सगळ्याच पक्षांची मंडळी असल्याने ‘सर्व पक्षभाव’ येथे कसोशीने पाळला जातो. येथे पक्षीय मतभेद, संघर्ष बाजूला ठेवलेले दिसतात. औरंगाबाद शहर तर पाणी असून तहानलेले. महानगरपालिकेची दिवाळखोरी एवढी, की पाणी असूनही ती ते देऊ शकत नाही. आता तर नागरिक पाण्यासाठी आंदोलन करीत आहेत; पण प्रशासन हतबल झालेले दिसते.
एकीकडे हे चित्र असताना दुसरीकडे उसाचे क्षेत्र वाढले आहे. आश्चर्य म्हणजे कायम दुष्काळी असणाºया उस्मानाबाद जिल्ह्यात ते सर्वात जास्त. लातूर, बीड, उस्मानाबादेत परतीचा मान्सून बरसल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. पुढच्या वर्षी उसाच्या गाळपाचा प्रश्न मराठवाड्यात असेल. त्यात ते निवडणुकीचे वर्ष असल्याने साखर कारखानदार नेत्यांची काळजी वाढली आहे.
उन्हाळा म्हटला की, पुन्हा जलसंधारण आलेच. गावोगावी त्याचा गाजावाजा चालू असला तरी यामुळे किती गावे टँकरमुक्त झाली हा आकडा गुलदस्त्यातच आहे, तो कोणीही सांगत नाही. आंधळ्याच्या दळणासारखी ही गोष्ट आहे. पाण्याचा पैसा पाण्यासारखा वाहताना दिसतो; पण मुरतो कोठे हे रहस्य उलगडत नाही. कारण अर्धा मराठवाडा तहानलेला आहे.
-सुधीर महाजन

Web Title: Water moves instead of money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.