पाणीपुरी पार्सल?

By Admin | Published: April 6, 2017 11:55 PM2017-04-06T23:55:20+5:302017-04-06T23:55:20+5:30

मी आणि माझी पत्नी पाणीपुरी खाण्यासाठी एका गाडीसमोर उभे होतो.

Water puri parcel? | पाणीपुरी पार्सल?

पाणीपुरी पार्सल?

googlenewsNext

मी आणि माझी पत्नी पाणीपुरी खाण्यासाठी एका गाडीसमोर उभे होतो. झकपक कपड्यातले एक नवश्रीमंत जोडपे तिथे आले आणि त्यातील पतीने, दो पानीपुरी पार्सल, अशी आॅर्डर दिली. मी उगाचच चक्रावून गेलो. पाणीपुरी रस्त्यावर उभे राहून खायची की घरी नेऊन खायची, हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न होता. तितकाच तो त्यांचा खासगी मामलाही होता. हा प्रश्न तात्त्विक चर्चेचा करून त्यावर विचारमंथन घडवून आणण्यात शहाणपणा नाही हे ओळखून मी आमच्या पाणीपुरीची वाट बघू लागलो. रस्त्यावर उभे राहून पाणीपुरीचा आस्वाद घेणे हे तिचा सन्मान करण्यासारखे आहे. तो सन्मान पाणीपुरीचाच नाही, तर जगभर उदयाला आलेल्या मार्गाधिष्ठित खाद्यसंस्कृतीचा आहे. पानीपुरी, मीडियम तिखा, रगडा कम, पानी ज्यादा... अशी रसदार आॅर्डर देऊन तिथल्यातिथे तिचा फडशा पाडत शेवटची सुकी पुरी खाऊन वर त्या कागदी द्रोणातून आणखी पाणी मागून घेऊन एका घोटात संपवणे, हा नव्या खाद्यसंस्कृतीतील महत्त्वाचा धडा आहे. आपल्या रसनेची मागणी सन्मानाने पूर्ण करणे आणि त्याबरोबरच भय्याच्या त्या तत्पर सेवावृत्तीला सलाम करणे हा तेथील संस्कारांचा भाग आहे. बाजारात फिरताना अनेक गोष्टी आपल्या नजरेस पडतात. खाद्यपदार्थ, भाजीपाला, कपडेलत्ते अशी प्रचंड रेंज असते. आपली पावले एखाद्या ठिकाणी थबकतात, रसना चळते. पण लोक काय म्हणतील, या विचाराचा दबाव मनावर इतका असतो की तो आपल्याला पुढे पुढे ढकलू लागतो. पुढे गेल्यावर किंवा घरी पोहोचल्यावर, अरेरे ती वस्तू घ्यायला हवी होती, असा विचार जर मनात येत असेल तर आपले काहीतरी चुकत आहे हे लक्षात घ्या. नंतर बघू, असे म्हणत तुम्ही जर आनंदाला नेहमी पुढचा दरवाजा दाखवत असाल तर ते तुमच्या आजारपणाचे लक्षण असू शकते. ती सोनचाफ्याची पिवळी धम्मक, सुगंधी फुले घ्यायला हवी होती, पळसाच्या पानावर कापून दिली जाणारी चौकोनी आकारातील हिरवीगार मलईकुल्फी आस्वादायला हवी होती, पाच रुपयांची ती करवंदे त्या म्हातारीकडून घेतली असती तर तिलाही चार पैसे मिळाले असते आणि पाच रुपयांत बालपणीच्या आठवणींचा अमूल्य ठेवा अनुभवता आला असता. छे, चुकलेच आपले... असे म्हणण्याची वेळ वारंवार स्वत:वर येऊ देऊ नका. आनंदाचे छोटे छोटे क्षण पुढे ढकलू नका. तिथेच निर्णय घेऊन त्या क्षणाचा, त्या भावनेचा सन्मान करा. पाणीपुरी घरी नेऊन खाण्यात काय अर्थ आहे? पुढच्या क्षणी आपण असू किंवा नसू हे कुणी पाहिले आहे?
-प्रल्हाद जाधव

Web Title: Water puri parcel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.