पाण्याचे दुर्भिक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:44 AM2018-04-05T00:44:31+5:302018-04-05T00:44:31+5:30
बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये.
बादलीभर पाण्यासाठी चातकाप्रमाणे वाट पाहण्याची दुर्दैवी वेळ विदर्भात ग्रामीण भागातील नागरिकांवर आली आहे. दरवर्षीप्रमाणे प्रशासनाचे नियोजन चुकल्याने यंदाही विदर्भातील शेकडो गावांमध्ये भीषण जलसंकट आ वासून आहे. यवतमाळ शहरात तर एकेका कुटुंबाला ड्रमभर पाण्यात आठ दिवस गुजराण करावी लागत आहे. मागास वस्त्यांची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पुढील काही दिवसात ही स्थिती स्फोटक झाल्यास आश्चर्य वाटू नये. पाण्यासाठी मोताद झालेल्या यवतमाळकरांना आठवडाभराचे पाणी साठवून ठेवण्याकरिता सुटी घ्यावी लागत आहे. १९७३ च्या दुष्काळाची आठवण करून देणारी ही पाणीटंचाई असल्याची प्रचिती येत आहे. उन्हाळा जेमतेम सुरू झाला आहे. पुढे स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अनेक भागांची भिस्त टँकरवर असली तरी टँकरही येत नाही. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात तर चक्क खड्ड्यातील अशुद्ध पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर येऊन ठेपली आहे. गावातील हातपंपच निकामी झाल्याने पाणी मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. नळयोजनेच्या विहिरींची पातळी अतिशय खोल गेली आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा एकदिवसा आड केला जात आहे. परिणामी नागरिकांना आठ दिवसानंतरच पाणी मिळत आहे. ग्रामसेवकाकडे तक्रार केली तरी तो दुर्लक्ष करतो. चंद्रपूर जिल्ह्यात जिवती तालुक्यातील ग्रामीण दरवर्षी पाण्याच्या समस्येला सामोरे जातात. गोंदिया, भंडारातही स्थिती वेगळी नाही. उन्हाची दाहकता तशी फेब्रुवारीपासूनच जाणवायला लागली होती. मार्च संपताना ती तीव्र झाली आहे. मात्र प्रशासनदरबारी नियोजनाचा अभाव असल्याने पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही, असे वाटायला लागले आहे. गुंडभर पाण्यासाठी दोन- दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र अनेक भागात पाहायला मिळते. जंगलातही वन्यजीवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पहिल्यांदा मार्चमध्येच जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागले आहेत. ही बाब वनखात्यासाठी अधिक चिंताजनक आहे. ‘टायगर कॅपिटल’ म्हणून ओळख असलेल्या विदर्भात वाघांची संख्या मोठी आहे. वाघांची तृष्णा भागविण्यासाठी वन विभाग दरवर्षी नियोजन करीत असतो. कृत्रिम पाणवठे तयार केले जातात. मात्र यंदा हे काम आतापासूनच हाती घेण्यात आले आहे. नैसर्गिक पाणवठे आटत चालल्याने वनविभागाची डोकेदुखी वाढत असताना कृत्रिम पाणवठ्यात शिकाऱ्यांकडून विषप्रयोग करून प्राण्यांची शिकार करण्याची भीती आहेच. एकंदरीत यंदाचा उन्हाळा डोळ्यातून पाणी आणणारा ठरू शकतो.