आपण सगळेच करंटे; पंढरपूरला विसरलो! 75 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी घडलेली महत्वाची घटना...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 08:16 AM2022-05-10T08:16:13+5:302022-05-10T08:17:31+5:30
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले झाले, त्या घटनेला आज (१० मे) रोजी ७५ वर्षे पूर्ण होताहेत; पण ‘भोंग्याच्या गोंगाटात’ पंढरपूरची आठवण कशी येणार?
- सुधीर लंके, आवृत्तीप्रमुख, लोकमत अहमदनगर
sudhir.lanke@lokmat.com
सध्या मंदिर-मशिदींवरील भोंग्यांची चर्चा आहे. या चर्चेचा गोंगाट इतका आहे की, त्यातूनच कानठळ्या बसाव्यात. पण या सर्व गदारोळात महाराष्ट्र एक मोठी सामाजिक क्रांतीची घटनाच विसरला आहे, असे दिसते. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले झाले, त्या घटनेला आज (१० मे) रोजी पंचाहत्तर वर्षे पूर्ण होताहेत, पण या समतेच्या लढाईची आज ना शासन दखल घेतेय ना जनता.
पंढरपूरच्या वाळवंटात भेदभाव व शिवाशीव का? विठ्ठलाचे दरवाजे हरिजनांसाठी खुले का नाहीत? असा प्रश्न करत साने गुरुजींनी पंढपुरात १ ते १० मे १९४७ दरम्यान उपोषण केले होते. तोवर हरिजनांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. हरिजनांसाठी गांधीजींनी १९३२ साली उपवास केला होता. परंतु, त्यातून सर्वच मंदिरे व विहिरी खुल्या झाल्या नव्हत्या.
विठ्ठल मंदिर खुले व्हावे, यासाठीचे लोकमत तयार करण्यासाठी गुरुजींनी राज्यभर दौरा केला. ७ जानेवारी १९४७ रोजी मुंबईतून त्याची सुरूवात झाली. सेनापती बापट, प्रा. वसंत बापटांच्या नेतृत्वाखाली कलापथकही सोबत होते. साने गुरुजींचे ‘घ्या रे हरिजन घरात घ्या रे’, पु. ल. देशपांडे यांचे ‘हरिचे प्यारे हरिजन आम्ही’ तर बा. भ. बोरकरांच्या ‘पंढरीस वाजे घंटा, पांडुरंग झाला जागा’ या गीतांनी त्यावेळी राज्य ढवळून निघाले. मंदिर खुले व्हावे म्हणून पाच लाख स्वाक्षऱ्या जमल्या. सोबतच या प्रबोधनातून गावोगावची अनेक मंदिरे, विहिरी दलितांसाठी खुल्या झाल्या. एस. एम. जोशी, क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य अत्रे, तुकडोजी महाराज, राजा मंगळवेढेकर अशी अनेक माणसे या मंदिर लढाईत सामील होती. नाना पाटलांनी तर त्यावेळी सर्व समाजाला जाहीर प्रश्न केला, ‘अरे, तुमच्या उपेगाला येत्यात, कामाला धावत्यात, त्यांनाच तुम्ही लांब ठेवता. इटाळ, चंडाळ मान्ता. काय म्हणावं तुम्हाला?’
दौरा होऊनही बडवे मंदिर प्रवेशास संमती देत नसल्याने १ मे रोजी पंढपुरात उपोषण सुरू झाले. ‘जावो साने सीनापार, नही खुलेगा विठ्ठलद्वार’ असा पलटवार त्यावेळी पंढपुरातून झाला. उपोषणाला जागा उपलब्ध होत नव्हती. राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे यांनी आपल्या मठात ती दिली. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेले तनपुरे हे गाडगेबाबांचे शिष्य. त्यामुळे ते निडरपणे गुरुजींसोबत आले. त्यावेळी हे धाडसच होते. आजगावकर व सातारकर मठ, ‘गोफण’कार तात्या डिंगरे, गोविंदकर ही स्थानिक मंडळी गुरुजींसोबत होती. तत्कालीन मध्यवर्ती कायदे मंडळाचे स्पीकर दादासाहेब मावळंकर यांनी बडवे मंडळींना राजी केले व १० मे रोजी मंदिर खुले करण्याचा निर्णय झाल्यानंतर हे उपोषण थांबले. पुढे राज्यात तसा कायदाही झाला.
या उपोषणाबाबत महात्मा गांधींजींचाही गैरसमज तयार केला होता. त्यामुळे ते उपोषणाच्या विरोधात होते. त्यावेळी मुंबई असेंब्लीत हरिजन मंदिर प्रवेशाचे बिल आले होते. कायदा होणारच आहे तर उपोषणाची घाई कशाला, अशी गांधींची भूमिका होती. मंदिर प्रवेशाचे श्रेय साने गुरुजींना जाईल म्हणून काॅंग्रेसही सोबत नव्हती.
विठ्ठल मंदिरातील भेदभाव संपणे ही एक सामाजिक क्रांती होती. पण, या लढ्याची राज्याने उपेक्षा केली. साने गुरुजींना पंढरपुराने आजही स्वीकारलेले दिसत नाही. त्यांचा साधा पुतळादेखील तेथे नाही. या लढ्याची कुठलीच खूणही नाही. तनपुरे महाराज मठाचे सध्याचे प्रमुख बद्रीनाथ महाराज यांनी याच मठात गुरुजींच्या स्मारकासाठी जागा दिली आहे. साने गुरुजी मंदिर सत्याग्रह स्मारक समितीकडून तेथे आता छोटेखानी स्मारक उभे राहतेय. पुन्हा एकदा हा मठच गुरुजींसाठी धावला. अर्थात तनपुरे महाराजांनाही राज्याने उपेक्षितच ठेवले. राष्ट्र सेवा दलाचा सामाजिक सद्भाव सप्ताह वगळता सर्व महाराष्ट्र सध्या ‘मनसे’च्या भोंगा आंदोलनात गुंग आहे. या गोंगाटात पंढरपूरची आठवण कशी येणार?