वी आर सॉरी, सशीन लीटलफेदर! तुझे बरोबर होते!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 07:36 AM2022-08-20T07:36:49+5:302022-08-20T07:38:59+5:30

‘ऑस्कर’ने तब्बल पन्नास वर्षांनंतर तिची जाहीर माफी मागितली आहे. तत्त्वासाठी तिने आयुष्यभराची किंमत मोजली खरी; पण अखेर सत्याचाच विजय झाला!

we are sorry sasheen littlefeather you were right oscar apologies openly | वी आर सॉरी, सशीन लीटलफेदर! तुझे बरोबर होते!!

वी आर सॉरी, सशीन लीटलफेदर! तुझे बरोबर होते!!

Next

- संजय आवटे, संपादक, लोकमत, पुणे

तिनं जगासमोर भूमिका मांडली, तेव्हा ती अवघ्या पंचवीस वर्षांची होती. भूमिका करणं सोपं असतं. भूमिका घेणं कठीण. घेतलेल्या भूमिकेची किंमत चुकवावी लागते. व्यवस्थेला जाब विचारण्याची किंमत मोठी असते. तिनं मांडलेल्या या भूमिकेमुळे तिला अवमानित केलं गेलं. त्यानंतर तिच्यावर बहिष्कार घातला गेला. नंतरची पाच दशकं तिनं एकाकी झुंज दिली. प्रकाशाच्या झगमगाटात असलेली ही अभिनेत्री अंधाराच्या गर्तेत फेकली गेली. मात्र, ती हरली नाही. काम करत राहिली. पन्नास वर्षांनंतर तिला ‘न्याय’ मिळाला. ज्यांनी तिला अवमानित केलं, त्यांनीच तिची लेखी माफी मागितली. येत्या १७ सप्टेंबरला तिच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी ही माफी जाहीरपणे मागितली जाणार आहे! -हे समजल्यावर ती फक्त निरागस हसली. कर्करोगाने ग्रासलेली ७५ वर्षांची ही योद्धा म्हणाली, ‘फक्त ५० वर्षे! आम्ही आहोतच सहिष्णू. आम्हाला ठाऊक आहे, लढा मोठा आहे आणि पल्ला लांबचा आहे!’

सशीन लीटलफेदर ही अमेरिकेतली अभिनेत्री. रेड इंडियन वडील आणि युरोपियन-अमेरिकन आई यांची ही मुलगी. अभिनेत्री आणि त्याचवेळी मानवी हक्कांसाठी लढणारी झुंजार कार्यकर्ती. अमेरिकेत कृष्णवर्णीयांना, स्थानिक अमेरिकी नागरिकांना जी दुय्यम वागणूक मिळते, त्याच्याविरोधात सशीनने सत्याग्रह सुरू केला.

ही गोष्ट १९७३ मधील. ‘द गॉडफादर’ या जागतिक ख्यातीच्या चित्रपटासाठी मार्लन ब्रॅंडो या अभिनेत्याला सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. मार्लन ब्रॅंडो या सोहळ्याला आला नाही. त्याने आपल्यावतीने पाठविले समविचारी सशीनला. जेम्स बाॅण्डचा ब्रॅण्ड ज्याने आणखी लोकप्रिय केला, तो राॅजर मूर आणि जगाची लाडकी लिव्ह उलमन यांनी या पुरस्काराची बाहुली घेण्यासाठी सशीनचे गोड हसून स्वागत केले. याच सोहळ्यात सशीनने पुरस्काराची बाहुली घेण्याचे नाकारले आणि अवघं एक मिनिट ती बोलली. त्यात तिने सामाजिक न्यायाची भूमिका मांडली. नेटिव्ह अमेरिकी नागरिकांवर होणाऱ्या अत्याचारांवर ती बोललीच. पण, मुख्य म्हणजे, हॉलिवूड आणि माध्यमातून या संदर्भात जे विपर्यस्त चित्रण होते, त्यावरही तिने कोरडे ओढले. 

ती हे बोलत असताना, भले-भले सेलिब्रिटी तिची अवहेलना करत होते. तिच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला. सोहळा संपला, पण सशीनवरचा बहिष्कार कायम राहिला. तिच्या चारित्र्यहननाचे प्रयत्न झाले. तिला कोणी महत्त्वाच्या भूमिका दिल्या नाहीत. काम दिले नाही. पण ती बोलत राहिली. लढत राहिली. सशीन आज ७५ वर्षांची आहे. तिला अवमानित करणाऱ्या ‘अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स ॲण्ड सायन्सेस’ने अर्थात ‘ऑस्कर’ने आता तिची लेखी माफी मागितली आहे. तिचा अमृतमहोत्सवी वाढदिवसही जल्लोषात साजरा करत, जाहीर माफी मागण्याचं ‘ऑस्कर’नं ठरवलं आहे. सामाजिक न्यायासाठीचा लढा सोपा नसतो. काही पिढ्यांना झुंज द्यावी लागते. पण, अखेर विजय होतो तो सत्याचाच. अलीकडच्या कमालीच्या व्यावहारिक जगात भाबडे वाटावे, असं हे आहे. पण, काळ कोणताही असो. अखेर न्यायाचा विजय होतो. 

हेच बघा. १९०१मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रुझवेल्ट यांनी आपले अधिकृत सल्लागार बुकर टी वॉशिंग्टन यांना ‘व्हाईट हाऊस’वर डिनरला बोलावले. वॉशिंग्टन हे प्रख्यात विचारवंत आणि अभ्यासक. पण, ते कृष्णवर्णीय. मग काय! ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘ब्लॅक’ माणूस गेलाच कसा, असा प्रश्न विचारत अमेरिकेतले कडवे गोरे आक्रमक झाले आणि त्यांनी ‘व्हाईट हाऊस’ धुवून काढले. त्यानंतर पुढची तीस वर्षे ‘व्हाईट हाऊस’कडे कोणी ‘ब्लॅक’ फिरकू शकला नाही. पुढे २००८मध्ये त्याच देशात बराक हुसेन ओबामा अध्यक्ष झाले आणि ब्लॅक प्रेसिडेंट ‘व्हाईट हाऊस’मध्ये गेल्याचा जगभर जल्लोष झाला. ऑस्करच्या झगमगाटी जगाने आज पुन्हा तेच आश्वासन अधोरेखित केले आहे : हे असे आहे तरी पण  हे असे असणार नाही दिवस आमुचा येत आहे  तो घरी बसणार नाही!
sanjay.awate@lokmat.com

Web Title: we are sorry sasheen littlefeather you were right oscar apologies openly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.