आम्ही कृतघ्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2016 03:52 AM2016-01-12T03:52:51+5:302016-01-12T03:52:51+5:30

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड ए.बी. बर्धन यांना श्रद्घांजली अर्पण करण्यासाठी परवा नागपुरात सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते. बर्धन यांचे नागपुरात

We are ungrateful | आम्ही कृतघ्न

आम्ही कृतघ्न

Next


- गजानन जानभोर

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड ए.बी. बर्धन यांना श्रद्घांजली अर्पण करण्यासाठी परवा नागपुरात सर्व राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले होते. बर्धन यांचे नागपुरात स्मारक व्हावे, अशी भावना साऱ्यांनीच या सभेत व्यक्त केली. समाजासाठी सर्वस्वाचा होम करणाऱ्या आणि आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी लढणाऱ्या या निष्कांचन नेत्याचे स्मारक व्हावे, ही नागपूरकरांचीही इच्छा. तरुण पिढीला ते दीपस्तंभासारखे राहणार आहे. या सभेतील वक्त्यांची भाषणे ऐकताना एक गोष्ट सारखी अस्वस्थ करीत होती. बर्धन हयात असताना त्यांच्या प्रत्येक जाहीर कार्यक्रमात यातील काही नेते उपस्थित असायचे. ते एक गोष्ट आवर्जून सांगायचे, ‘भाई बर्धन नागपुरातून लोकसभेत जायला हवेत, आपण सारे मिळून बर्धन साहेबांना लोकसभेत पाठवू.’ परंतु निवडणूक आली की, हेच नेते आपल्या पक्षाचे, जातीचे, धर्माचे झेंडे घेऊन बर्धन यांच्या विरोधात उभे ठाकायचे. यातील काहींनी तर त्यांच्या विरोधात अत्यंत विखारी प्रचारही केला. बर्धन यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती स्वीकारल्यानंतरच्या काळात मात्र तेच नेते ‘आपण बर्धन यांना लोकसभेत पाठवू शकलो नाही’, अशी खंत व्यक्त करायचे. त्यांचा हा दुतोंडीपणा या निरलस नेत्याला कळत नव्हता, असे नाही. पण त्याचा राग त्यांनी मनात ठेवला नाही. आज तीच मंडळी बर्धन यांचे स्मारक व्हावे, असे म्हणतात, तेव्हा त्यांच्याबद्दल कणव वाटू लागते.
आपल्या समाजाची ही शोकांतिका आहे. भली माणसे जिवंत असताना त्यांची उपेक्षा करायची, त्यांना विरोध करायचा आणि ती गेल्यानंतर त्यांचे स्मारक उभारायचे. हा राजकारण आणि समाजकारणातला व्यवहारवाद आहे. बर्धन नागपुरातून चार वेळा आणि रामटेक येथून एकदा लोकसभा निवडणूक लढले. पण कधीही निवडून येऊ शकले नाही. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषालाही भंडाऱ्यातून पराभूत व्हावे लागले. वंचितांसाठी लढणाऱ्यांच्या वाट्याला अशा वेदना येत असतात. ज्यांच्यासाठी ते लढतात, त्या कष्टकऱ्यांची त्यांच्यावर श्रद्धा असते. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायलाही ते तयार असतात. पण त्याच वेळी पांढरपेशा समाज या निरलस कार्यकर्त्यांशी अंतर ठेवून वागतो. त्यातील काहींना त्याबद्दलचे अपराधीपण बोचत असते. पण कसोटीच्या क्षणी ते अशा माणसाना मदत करीत नाहीत. बर्धन यांच्याबाबतीत नेमके हेच घडले. त्यांना मत देताना कधी जात आडवी आली तर कधी पक्ष. १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत बर्धन निवडून येतील, असेच वातावरण होते. पण विरोधकांनी खोटा प्रचार सुरू केला. ‘स्वातंत्र्य लढ्यात कम्युनिस्टांनी काय दिले?’ असा जहरी प्रश्न हे विरोधक मतदारांना विचारायचे. स्वातंत्र्य लढ्यातील बर्धन यांच्या तुरुंगवासाचा त्यांना सोयीस्कर विसर पडला होता. मुस्लीम आणि विणकर समाजाचीही दिशाभूल करण्यात आली. शेवटी बर्धन पराभूत झाले. पण त्यांना याबद्दल कधी विशाद वाटला नाही. त्यांचे लढे, आंदोलने अखेरपर्यंत सुरू होती.
एरवी निवडणुकीत पराभूत झाले की, नेते सार्वजनिक जीवनातून अंग काढून घेतात. स्वत:च्या शिक्षण संस्था, धंद्यांमध्ये लक्ष घालतात. विरंगुळा म्हणून परदेशात जातात. कार्यकर्ते काम घेऊन आले की त्यांच्यावर खेकसतात. यातील कुठल्याही व्याधी-विकृतीचा संसर्ग बर्धन यांनी होऊ दिला नाही. आपले राहते घर विकून आलेला पैसा पक्षाला देणारा हा नि:संग कार्यकर्ता होता. ज्यांच्या पायावर डोके ठेवावे अशी माणसे आज समाजात फारशी राहिली नाहीत. आहेत ती तुसडी, माणूसघाणी. कपाळावर सदैव आठ्या घेऊन जगणारी, कुणी नमस्कार केला तर त्रासिकपणे विस्फारणारी, प्रेतासारखी ताठर... ताठर... ती राजकारणात आहेत, साहित्यात आहेत आणि सामाजिक क्षेत्रातही आहेत. सेवेच्या अहंकाराने व्याधीजर्जर झालेल्या समाजसेवकांचीही संख्या यात लक्षणीय आहे. बर्धन या सर्वच क्षेत्रात होते पण अंतर्बाह्य स्वच्छ आणि निर्मळ होते. त्यांच्या नागपुरातील घराला कुलूप नव्हते. घराची आणि मनाची दारे गरीबांसाठी सदैव उघडी ठेवणाऱ्या कॉम्रेडवर आम्ही अन्याय केला, ही बोच त्यांचे स्मारक उभारतानाही नेहमी सलत राहणार आहे.

 

Web Title: We are ungrateful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.