आम्ही डांबर खातो... तुम्ही ?

By सचिन जवळकोटे | Published: July 12, 2018 12:49 AM2018-07-12T00:49:48+5:302018-07-12T00:49:51+5:30

पुणेकर जेवढे ‘हेल्थ’च्या बाबतीत अलर्ट, तेवढेच ‘फूड’च्या बाबतीतही क्रेझी. दिवसभर अरबट-चरबट खाऊन संध्याकाळी ‘बालगंधर्व’च्या कट्ट्यावर ‘लिंबू-आलं-पादलोण’ची रसभरीत चर्चा करणारे लेले काका जेवढे ग्रेट; तेवढेच सणाला नाजूक पुरणपोळीवर साजूक तूप ओतून घेऊन रात्री ‘अर्धोपवास’ करणारे नेने पंतही महान.

 We eat tar ... You? | आम्ही डांबर खातो... तुम्ही ?

आम्ही डांबर खातो... तुम्ही ?

Next

पुणेकर जेवढे ‘हेल्थ’च्या बाबतीत अलर्ट, तेवढेच ‘फूड’च्या बाबतीतही क्रेझी. दिवसभर अरबट-चरबट खाऊन संध्याकाळी ‘बालगंधर्व’च्या कट्ट्यावर ‘लिंबू-आलं-पादलोण’ची रसभरीत चर्चा करणारे लेले काका जेवढे ग्रेट; तेवढेच सणाला नाजूक पुरणपोळीवर साजूक तूप ओतून घेऊन रात्री ‘अर्धोपवास’ करणारे नेने पंतही महान.
त्यामुळेच नेहमी पंत, नाना अन् काकांच्या टोळक्यात खाण्या-पिण्याचा ऊहापोह होत आलेला. आजही ही सारी हौशी खवय्ये मंडळी पेठेतल्या एका राजकीय नेत्याच्या घरातील विवाह सोहळ्याला जमलेली. या ठिकाणी सर्व पक्षांचे नेतेही आवर्जून आलेले. यावेळी नेत्यांच्या ‘खाण्या-पिण्या’ची चर्चा सुरू झाली, तेव्हा उडालेली गम्माडी गंमत जश्शीच्या तश्शीऽऽ.
बासुंदीत बुडविलेली गरमागरम जिलेबी रायगडच्या तटकरेभाऊंसमोर धरत लेले काका म्हणाले, ‘घ्याऽऽ खास तुमच्यासाठी आणलीय. सिंचनाच्या पाण्यात भिजवलेल्या पिठाची जिलेबी आहे हीऽऽ’ सुनीलभाऊंना ठसका लागताच नेने पंत मदतीला धावले, ‘राहू द्या होऽऽ एवढं काय मनाला लावून घेताय तुम्ही. सिमेंट खाणाऱ्यांच्या टापूत राहणाºयांना सारंच पचवता आलं पाहिजे.’
हे ऐकून बीडच्या पंकजाताई तोंडावर हात ठेवून हळूच म्हणाल्या, ‘काय म्हणताऽऽ काय.. माझ्या चिक्कीपेक्षाही गोड आहे की काय ही जिलेबी?’ हे ऐकताच दानवेंनी थेट अमितभार्इंना मोबाईल कॉल लावला, तेव्हा जानकरांच्या म्हादूभाऊंनी तत्काळ त्यांच्या पदस्पर्शांची अनुभूती घेत त्यांना गोड बोलून हळूच बाजूला नेलं. आयुष्यभर माईकसमोर घसा बसेपर्यंत ओरडूनही जेवढं काही मिळत नसतं, तेवढं केवळ एकदा पाया पडण्यानं झटकन गवसतं, याचा साक्षात्कार झाल्यापासून म्हणे ‘चळवळीतला कार्यकर्ता’ आता ‘अस्सल राजकारणी’ बनला होता.
असो... जेवता-जेवता घोळक्यात प्रत्येकाच्याच आवडी-निवडी चर्चेत आल्या. ‘मुंबईतली आदर्श डीश’ कितीही चांगली असली तरी पचायला अत्यंत जड असते, हे अशोकरावांनी कळवळून सांगितलं. ‘भूखंडाचे लाडू’ पूर्वी मनोहरपंतांना चविष्ट लागले तरी आपल्यासाठी किती कडवट ठरले, हे कथन करताना जळगावच्या नाथाभाऊंचंही तोंड भलतंच वेडवाकडं झालं. एवढ्यात चंद्रकांतदादांच्या प्लेटमधल्या काळ्याकुट्ट पदार्थाकडं कुणाचंतरी लक्ष गेलं. ‘अरे बापरेऽऽ पार डांबरासारखा काळा पडलाय की तुमचा पकोडा. खाऊ नका तो. आणा इकडं.’ गोडबोले नानांच्या या सल्ल्यावर दादा गडबडले, ‘अहोऽऽ ही प्लेट मी आत्ताच घेतलीय. पूर्वी विजयदादा अन् छगनरावांच्या हातात होती ही डांबराची प्लेट,’ असं त्यांनी सांगताच अजितदादांना आतल्या आत आनंदाच्या उकळ्या फुटल्या.
दादांनी उगाचंच सर्वांचं लक्ष वेधून घेत ‘उद्धों’ना एका स्वीटडीशची आॅर्डर केली, ‘घ्याऽऽ घ्याऽ दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातला खास गुलाबजामून घ्या. नाशिकच्या अस्सल तुपात घोळलाय. इन्कम टॅक्सवाल्यांनाही दोन-तीन वर्षे खूप आवडला होता.’ मात्र, याचवेळी थोरले काका बारामतीकरांनी उत्साही अजितदादांना कोपºयात हळूच ढोसलं, ‘उगाच इतरांच्या खाण्याचा जादा कालवा करू नका. तुमच्या कालव्याचा विषय निघाला तर छगनरावांशेजारील त्यावेळच्या जुन्या खोल्या झटक्यात बुक होऊन जातील.’
 

Web Title:  We eat tar ... You?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.