आपण झालोय ‘हायब्रीड ह्यूमन्स’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 06:08 AM2021-12-02T06:08:51+5:302021-12-02T06:08:57+5:30
Hybrid Humans: माणसांचा वर्तमान आणि भविष्यकाळ हळूहळू हायब्रीड जगण्याकडे जातो आहे. याची सुरुवात डिजिटल प्लॅटफॉर्म्स आल्यावरच झाली होती; पण महामारीनंतर खऱ्या अर्थाने आपले आयुष्य हायब्रीड व्हायला सुरुवात झाली आहे. आपण एकाच वेळी दोन आयुष्य जगत असतो असं आपल्याला वाटतं.
- मुक्ता चैतन्य
(समाज माध्यमाच्या अभ्यासक)
muktaachaitanya@gmail.com
माणसांचा वर्तमान आणि भविष्यकाळ हळूहळू हायब्रीड जगण्याकडे जातो आहे. याची सुरुवात डिजिटल प्लॅटफॉर्म्स आल्यावरच झाली होती; पण महामारीनंतर खऱ्या अर्थाने आपले आयुष्य हायब्रीड व्हायला सुरुवात झाली आहे. आपण एकाच वेळी दोन आयुष्य जगत असतो असं आपल्याला वाटतं. एक प्रत्यक्ष आणि एक व्हर्च्युअल; पण प्रत्यक्षात आपण एकच आयुष्य दोन स्तरांवर जगत असतो. प्रत्यक्ष जग आणि आभासी जग मिळून आपलं एक जग निर्माण झालेलं आहे, ज्याला हायब्रीड जगणं म्हणता येईल. आपलं भवितव्य हायब्रीड म्हणजे प्रत्यक्ष आणि आभासी यांच्या मिलाफातूनच तयार होत जाणार आहे.
आताही आपण शॉपिंगपासून शाळेपर्यंत जवळपास सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष आणि आभासी अशा कॉम्बिनेशनमध्येच करतोय. जरी शाळा सुरू झाल्या तरीही काही प्रमाणात आभासी शिक्षणाचा भाग मुलांच्या आयुष्यात असणारच आहे. तो पूर्णपणे कधीही डिलिट होणार नाही. तेच शॉपिंग, बँकिंग किंवा इतर कुठल्याही क्षेत्रासंदर्भात आहे. नवी रेसिपी करायची तर आता आपण चटकन पुस्तकं न शोधता यूट्यूबवर शोधाशोध करतो, एखादी नवी फॅशन फॉलो करायची तर मॅगझिन्सपेक्षा आपण इन्स्टाचा वापर करतो.
आपण गोष्टी पूर्णपणे ऑनलाइनही करणार नाही आणि ऑफलाइनही करणार नाही. आपण भाजी, किराणा आणायला प्रत्यक्ष जातो आणि पैसे ऑनलाइन देतो. हॉटेलचं बुकिंग ऑनलाइन करतो आणि मग प्रत्यक्ष तिथे जातो. हे असं हायब्रीड जगणं यापुढे वाढत जाणार आहे. महामारीने त्याचा वेग वाढविला आहे.
प्रत्यक्ष उठून कामाच्या ठिकाणी गेले नाही तरीही कामे होऊ शकतात हे आपल्याला वर्कफॉर्म होमने सिद्ध करून दाखविलं आहे. हा सुद्धा हायब्रीड जगण्याचाच एक प्रकार आहे. अशा अगणित गोष्टी आपण करतो आहोत, भविष्यात करणार आहोत. ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटीसारखं तंत्रज्ञान ज्या गतीने विकसित होतंय, ते बघता थोड्याच दिवसांत आपले आपल्याच सारखे दिसणारे व्हर्च्युअल अवतार किंवा होलोग्राम घेऊन आपण जगायला लागू, यात शंकाच नाही. म्हणजे आभासी जगासाठी आपल्यासारखाच दिसणारा आपला अवतार किंवा त्रिमिती होलोग्राम आणि प्रत्यक्ष जगासाठी आपण... स्वतः हे भविष्य फार दूर नाही.