आपुले मरण पाहिले...
By संदीप प्रधान | Published: March 9, 2018 12:11 AM2018-03-09T00:11:19+5:302018-03-09T00:11:19+5:30
मुंबईतील एका बड्या कॉफी शॉपचा मॅनेजर मुख्य प्रवेशद्वार बंद करून बाहेर पडल्यावर काही लोकोत्तर पुरुषांचे पुतळे त्या कॉफी शॉपमध्ये प्रकट झाले...
मुंबईतील एका बड्या कॉफी शॉपचा मॅनेजर मुख्य प्रवेशद्वार बंद करून बाहेर पडल्यावर काही लोकोत्तर पुरुषांचे पुतळे त्या कॉफी शॉपमध्ये प्रकट झाले...
लोकमान्य : मिस्टर लेनीन, आपल्याला फार वेदना होतायत का? गो-या रँडने पुण्यात प्लेगची लागण झाल्यावर केले नसतील तेवढे अत्याचार झाल्येत तुमच्यावर (हातातील गीतारहस्य ग्रंथ टेबलवर ठेवतात)
लेनीन : लोकशाहीत निवडणुकीत माझ्या विचारधारेचा पक्ष पराभूत केल्यानंतर मला वेगळी शिक्षा देण्याची गरज नव्हती. असो.
नेहरू : माझं दु:ख कुणाला सांगू? देशातील सेक्युलर विचारधारेकरिता मी कायम संघर्ष केला. मात्र, गेल्या काही दिवसांत मलाच भारताच्या फाळणीकरिता जबाबदार धरले गेले. मी मुस्लिमधार्जिणा असल्याची, सरदार पटेल यांच्या पंतप्रधानपदामधील अडसर ठरल्याची विनाकारण झोड उठवली गेली. आपण थोडीथोडी कॉफी घेऊ या का? बापू तुम्ही घ्याल का कॉफी?
गांधी : (चरख्यावर सूतकताई करीत असताना) माझे उपोषण सुरू आहे. देशातील बँकांमधील पैसा हडप करून विदेशात पळालेल्या नीरव मोदी, विजय मल्ल्या वगैरेंना पश्चात्ताप होऊन ते पुन्हा तो पैसा परत करीत नाहीत, तोपर्यंत माझा सत्याग्रह सुरू राहणार.
डॉ. आंबेडकर : या देशाला स्थिर सरकार प्राप्त व्हावे, या हेतूने एक सक्षम संविधान तयार करण्याकरिता मी आणि संविधान समितीने अपार कष्ट घेतले. मात्र, काही मूठभर मंडळींनी सध्या मला आरक्षणावरून आरोपीच्या पिंजºयात उभं केलंय. आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा आग्रह धरून समाजातील मागासवर्गीयांसमोरील ताट खेचून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय.
लोकमान्य : मी तेल्यातांबोळ्यांचा नेता होतो. मात्र, माझी पगडी, शेंडी यामुळं आता मी केवळ साडेतीन टक्क्यांचा ‘लोकमान्य’ असल्याचे ठसवण्याची धडपड सुरू आहे.
गांधी : लोकमान्य तुम्ही निदान कुणाचे तरी आहात. माझं दु:ख काय सांगू? मी या देशातील साºयांचा बापू होतो. मात्र, अलीकडे मी केवळ गुजरातचा ब्रॅण्ड अॅम्बॅसेडर झालोय. विदेशातून येणारा प्रत्येकजण गुजरातला येतो आणि मला भेटतो. गेली दोन वर्षे हा चरखासुद्घा माझ्याकडं राहिलेला नाही. कुुणी भलताच इसम त्यावर बसून सूतकताई करत असल्याचे फोटो मी पाहिले आणि मला धक्काच बसलाय.
छत्रपती शिवाजी : आपणा साºयांची कैफियत आम्ही कान देऊन ऐकली. आम्ही तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामध्ये बारा बलुतेदारांची साथ आम्हाला लाभली. कुणी रणांगणावर आमच्या खाद्याला खांदा लावून लढला, तर कुणी युद्धनीती रचली, तर कुणी दफ्तर सांभाळले. ते कोण कुठल्या जातीपातीचे होते ते आम्ही पाहिले नाही. मात्र, सध्या आम्हालाही विशिष्ट जातीचा बिल्ला लावला जात आहे. अफसोस त्याचाच वाटतो.
लोकमान्य : आपल्या साºयांची चूक इतकीच आहे की, आपण या देशाकरिता, राज्याकरिता, लोकांकरिता झगडलो. त्या त्या वेळी योग्य वाटल्या, त्या त्या भूमिका घेतल्या. त्यामुळे लोकांनी आपल्याला या पुतळ्यांत चिणून टाकले आहे, आपल्या विचारांची खुलेआम कत्तल पाहण्याकरिता... तेवढ्यात, कॉफी शॉपच्या दरवाजाचे कुलूप उघडले आणि पुतळे अंतर्धान पावले...