लोकशाही बळकट करण्याचा संकल्प हवा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:13 AM2019-11-09T06:13:50+5:302019-11-09T06:14:22+5:30

तेव्हा या पावन पर्वावर प्रदूषण रोखून पर्यावरणाच्या सुरक्षिततेकडे लक्ष पुरवून आपण गुरु नानकदेवजींना खरी श्रद्धांजली

We need the resolve to strengthen democracy | लोकशाही बळकट करण्याचा संकल्प हवा

लोकशाही बळकट करण्याचा संकल्प हवा

googlenewsNext

डॉ. अश्वनीकुमार

देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरास प्रदूषण आणि विषारी वायूच्या होणाऱ्या त्रासामुळे शहरातील लाखो ज्येष्ठांच्या तसेच बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे, पण या गंभीर परिस्थितीचे खापर एकमेकांवर फोडण्यात दिल्ली, पंजाब आणि हरियाणा राज्यांची सरकारे व्यस्त आहेत. पर्यावरण विषयक या गंभीर आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्याऐवजी ही सरकारे त्या स्थितीचे राजकारण करण्यातच गर्क आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंह यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून प्रदूषण व पर्यावरणविषयक समस्यांचा सामना करण्यासाठी रचनात्मक व सर्वसमावेशक धोरण असायला हवे, अशी मागणी केली आहे. असे धोरण असल्यास सरकारांना स्वत:ची जबाबदारी अन्य कुणावर ढकलता येणार नाही. देशाच्या विद्यमान स्थितीच्या संदर्भात या विचारांकडे बघितले असता निवडणुकीच्या भूमिकेतून एकपक्षीय राजकारणातून या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. आमची राजकीय व्यवस्था मूलभूत प्रश्नांचा आणि राष्ट्रीय आव्हानांचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचेच दिसून येते. प्रत्येक विषयाकडे राजकीय दृष्टिकोनातून बघण्याच्या प्रवृत्तीमुळे त्या संदर्भात राजकीय मतैक्य होऊच शकत नाही. त्यामुळे वादग्रस्त नसलेल्या पर्यावरणासारख्या विषयावर वाद होतात. यंदा आपले राष्ट्र श्री. गुरू नानकदेव यांचे ५५० वे प्रकाशपर्व साजरा करीत आहे. गुरुंनी पर्यावरणासंबंधी जो उपदेश दिला आहे, त्याचे पालनही आपण करू शकलेलो नाही असे दिसून येते, श्री गुरु म्हणतात,

पवणु गुरु, पाणी पिता, माता धरति महतु।।
दिवसु राति दुइ दाई दाइआ खेलै सगल जगतु।।

तेव्हा या पावन पर्वावर प्रदूषण रोखून पर्यावरणाच्या सुरक्षिततेकडे लक्ष पुरवून आपण गुरु नानकदेवजींना खरी श्रद्धांजली अर्पण करु शकतो. आज अनेक कारणांमुळे सामाजिक तणाव वाढतो आहे. देशाचे राजकारण व्यक्तिद्वेषावर आधारलेले आहे. देशाच्या उदारतावृत्तीवर प्रहार होत आहेत आमच्या लोकशाही संस्था दुबळ्या होत आहेत. महिला बाल आणि ज्येष्ठ हे शोषणाचे बळी ठरत आहेत. असहाय व्यक्तींना सरकारकडून त्रास दिला जात आहे. कैदेत असणाऱ्यांवरील आरोप सिद्ध न होताही त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. याशिवाय राजकीय विरोधकांकडे शत्रुत्वाच्या भावनेने पाहणे, वाढता भ्रष्टाचार, राजकीय संवादातील असभ्यपणा, संपत्ती आणि सामर्थ्य यावर टिकून असलेली निवडणूक यंत्रणा, संसदीय पद्धतीसमोरची वाढती आव्हाने, न्यायव्यवस्थेची ढासळती प्रतिमा आणि बेरोजगार तरुणांची चिंताजनक स्थिती, ही देशासमोर असलेली आव्हाने आहेत. परिपक्व नेतृत्व आणि हुकूमशाही प्रवृत्तीचे नेतृत्व यांच्यातील सीमारेषा धूसर होत आहेत. आपल्या परंपरा आणि विचार नाते समजून न घेता धर्माच्या नावाखाली विद्यमान राजनीतीकडून संविधानांच्या मूल्यांना पायदळी तुडवले जात आहे आणि ज्यांच्याकडे संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी आहे तेच यास प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

अशा विपरीत परिस्थितीत आपसातील बंधुभावना वृद्धिंगत होणे शक्य आहे का? केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनच नव्हे तर अनेक मार्गांनी नागरिकांच्या आत्मसन्मानाच्या चिंधड्या उडविल्या जात आहेत. न्यायव्यवस्था आणि प्रशासन हे व्यक्तिगत प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानाशी संबंधित असलेल्या तसेच संविधानात समाविष्ट केलेल्या मूल्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरताना दिसत आहेत.
अशा स्थितीत एक यशस्वी संवैधानिक लोकशाही असल्याचा दावा भारत करू शकेल का? आमची प्रशासनिक व्यवस्था, नागरिकांच्या जीवनाचे मालमत्तेचे आणि मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यास समर्थ आहे, असे आपण छातीठोकपणे म्हणू शकतो का? अशा स्थितीत पूजनीय बापूंची संपूर्ण स्वराज्याची संकल्पना केवळ स्वप्नवत नाही का? जी.डी.पी.च्या आधारावर आर्थिक विकासाची पारख करताना गरिबांची गरिबी, मागासलेल्या लोकांंचे होणारे शोषण आणि असहाय व्यक्तींच्या दु:खाचे निवारण जर होणार नसेल तर त्या विकासाला काय अर्थ आहे? ही केवळ एका राजकीय पक्षावर केलेली टीका नाही तर संपूर्ण राजकीय व सामाजिक व्यवस्थेवर निर्माण झालेले हे प्रश्नचिन्ह आहे. कठीण प्रश्नांना सामोरे न जाता वस्तुस्थिती नाकारता येत नाही. प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता गरेने अनेक वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे की, ‘‘आपण वेळोवेळी आपली आस्था असलेल्या विचारांचा पुनरुच्चार केला पाहिजे आणि जे आपल्याला अमान्य आहेत त्याचे खंडन केले पाहिजे.

 या स्थितीत राष्ट्रपिता आणि आमचे राष्ट्रनिर्माते यांचे स्वप्न आपल्याला साकार करता येईल असा मार्ग आपण शोधायला हवा. तसेच केवळ भारतालाच नव्हे तर जगाला मार्ग दाखवू शकेल असे नेतृत्वही आपण शोधायला हवे. यंदा आपण गुरु नानकदेवजींचे ५५० वे प्रकाशपर्व आणि पूज्य बापूंची १५०वी जयंती साजरी करीत असताना करुणा आणि सौहार्द यावर आधारित सामाजिक न्यायव्यवस्था आणि संविधानावर आधारित लोकशाही बळकट करण्याचा संकल्प करायला हवा. आपले नागरिक हीच भावना अंतर्यामी बाळगत असतील याचा मला विश्वास वाटतो तसेच हा समाज कोणत्याही अन्यायाचा सामना करण्यास सक्षम आहे, याची मला खात्री आहे. असे करणे हीच बापूंना खरी श्रद्धांजली ठरेल.

(लेखक माजी केंद्रीय विधीमंत्री, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आहेत)

Web Title: We need the resolve to strengthen democracy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.