पोशाख

By admin | Published: June 5, 2017 12:19 AM2017-06-05T00:19:42+5:302017-06-05T00:19:42+5:30

तुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात.

Wear | पोशाख

पोशाख

Next

किशोर पाठक
तुम्ही कपडे काय घालता यावर तुमची पर्सनॅलिटी ठरत असते. कंपनीत जीन्स चालत नाही म्हणतात. तिथे प्लेन फॉर्मल चालतात. म्हणजे कॉलेजात ठिगळा ठिगळाच्या जीन्स घालणारी मुलं नोकरीला लागले की पहिल्या दिवशीच शर्ट इन करून टाय लावून स्मार्ट होतो. माणूस म्हटला की त्याची एक ओळख असते. एखाद्याला कायम शर्ट पायजमात पाहिल्यावर सूटमध्ये पाहणे चमत्कारिक वाटते. अगदी पूर्वीपासून आपण पोशाखाचे नाते माणसाच्या स्वभावाशी जोडलेले आहे. गांधींचे बॅरिस्टर ड्रेसमधले फोटो आता स्मरणात नाहीत. उलट चित्रकारांच्या भाषेत गांधी काढणे सोपे. टक्कल, चष्मा, पंचा बास. याउलट रवि वर्माच्या चित्रातली स्त्री प्रत्यक्ष पाहायची म्हणजे कसरतच. इतके दागिने, कपड्यांचा थाट वेगळाच आहे. शिवाजी महाराज एकतर सिंहासनावर नाहीतर घोड्यावरच दिसतात. त्यांचा जिरेटोप, अंगरखा, दागिने पाहणे गर्वाचे असतेच, पण महानुभव असतो. शिवाजी महाराज, विवेकानंद, गांधी, नेहरू, पूर्वीचे राजे यांना साध्या आपल्या वेशात पाहणे अशक्य. आपल्याला व्यक्तिमत्त्व नसते म्हणून आपण कोणत्याही पोशाखात बेंगरूळ दिसणार हे नक्की. नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले लगेच जाकीटची फॅशन आली. पंतप्रधान, मुख्यमंत्री ते आमदार, नगरसेवक जाकिटात दिसू लागले. वास्तविक पूर्वीचे कवी, शायर हे झब्बा जाकिटात कायम असायचे. पण तेव्हा ती फॅशन झाली नाही. आता ती झाली. म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीचे आपण काय घेऊ शकतो ते पाहावं. शिवाजी महाराज, विवेकानंद यांच्या पोशाखाची नक्कल स्पेशल दिवशीच असते. विवेकानंदांचा ड्रेस रोज कुणी वापरू शकत नाहीत. कारण ते नुस्ते कापड नसते. ती वृत्ती असते, त्या व्यक्तीचा स्वभाव असतो. एकवेळ तुम्ही कपड्यांचे अनुकरण कराल, पण विचारांचे शक्य नाही. तो भागच वेगळा. अलीकडे कपड्यांची लांबी रुंदी कमी होत चाललीय. बेंबी वा गळा मोकळा ठेवणे ही फॅशन झालीय. व्यक्तिस्वातंत्र्य हा विषय कसा आणि कुठपर्यंत ताणायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्याचा संबंध सहकाराशी लावायचा असेल तर लावावा, पण तरुणांना ही ओल्ड स्टाइल पसंत नाही. ध्येय, विचार आखूड होत गेले की त्याचा परिणाम पोशाखावरही होतो. एक मित्र सिग्रेट प्यायचा. एक दिवशी म्हणाला सिग्रेटचा ब्रँड बदलला. मी म्हटलं का? व्हरायटी म्हणून? तर म्हणाला, तात्यासाहेब ही सिग्रेट पितात म्हणून मीही आजपासून स्वीकारली. मी अचंब्याने म्हणालो, फक्त सिग्रेट? तो मंद हसला. बरोबर होते, तो तात्यांच्या सिग्रेटचेच अनुकरण करूशकत होता. म्हणून म्हटलं प्रत्येक जण कुवतीपुरता महामानव वापरतो, झेपेल, पचेल तेवढे विचार स्वीकारतो. एरवी पंधरा वेळा विपश्यना केलेला मित्र येताच कचाकचा भांडतो. परत त्याचे समर्थन करतो. एक श्लोक आहे, किं वाससा तत्र विचारणीयं। वास: प्रधानं खलु योग्यताया:। पीतांबरं वीक्ष्य ददौ सुकन्या चर्मांवर वीक्ष्य विषं समुद्रा। विष्णूचा पीतांबर बघून मुलगी दिली आणि चर्मांवर बघून विष दिले - तर असे हे पोशाख माहात्म्य।

Web Title: Wear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.