भाष्य - बरे झाले, तुम्ही बोललात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:20 AM2017-09-12T00:20:11+5:302017-09-12T00:20:58+5:30
डॉक्टर हा नोबेल पेशा मानला जातो, कारण त्यांच्याकडे मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत खेचून आणण्याची ताकद असते म्हणून. दवाखान्यात जाणारे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक देवाला ज्या श्रद्धेने हात जोडतात, त्याच्यापेक्षा कैकपटीने जास्त श्रद्धा ठेवत डॉक्टरला हात जोडतात. हा आदर, हा सन्मान ही सद्भावना डॉक्टरांनी आपल्या अथक मेहनतीतून, श्रमातून आणि कायम तत्पर राहत रुग्णांसाठी केलेल्या सेवेतून कमावलेली असते.
डॉक्टर हा नोबेल पेशा मानला जातो, कारण त्यांच्याकडे मृत्यूच्या दारातून रुग्णाला परत खेचून आणण्याची ताकद असते म्हणून. दवाखान्यात जाणारे रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक देवाला ज्या श्रद्धेने हात जोडतात, त्याच्यापेक्षा कैकपटीने जास्त श्रद्धा ठेवत डॉक्टरला हात जोडतात. हा आदर, हा सन्मान ही सद्भावना डॉक्टरांनी आपल्या अथक मेहनतीतून, श्रमातून आणि कायम तत्पर राहत रुग्णांसाठी केलेल्या सेवेतून कमावलेली असते. बरा होऊन घरी जाणारा रुग्ण ज्या भावनेने हात जोडून दुवा देतो, ती भावना करोडो रुपये दिले तरी कमावता येत नाही. मात्र अलीकडे या पेशाला काही डॉक्टरांच्या वागण्याने बेताल रूप आले आहे. रुग्णाला कोंबडी, बकरीसारखे वागवून वेगवेगळ्या दवाखान्यात तपासण्यासाठी पाठवले जाणे, त्यातून कट प्रॅक्टीस करणे या गोष्टींनी या नोबेल व्यवसायाला काजळी लागली आहे. काही दिवसांपूर्वी डॉ. रमाकांत पांडा आणि तीन-चार डॉक्टरांनी मिळून याच्या विरोधात आवाज बुलंद केला होता. रविवारी इंडोनेशियातील बाली येथे डॉ. तात्याराव लहाने यांनी ७ व्या मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने याच कट प्रॅक्टीसवर हल्ला चढवला. हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग आहे, असेही ते म्हणाले. पण हा रोग दुरुस्त करण्याची क्षमता फक्त डॉक्टरांमध्येच आहे. दुसºया कोणी हा रोग कसा दुरुस्त करावा? डॉ. लहाने यांच्याविषयी कितीही वाद, प्रवाद असोत, त्यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असले तरी, देशाच्या राष्ट्रपतींपासून ते गावातील गोरगरीब रुग्णाला आपले डोळे त्यांनीच तपासावेत, असे का वाटते? नेत्र विभागाची ओपीडी सतत ओसंडून कशी वाहत असते? एवढी ओपीडी शासकीय रुग्णालयातील अन्य विभागांची का होत नाही? आयएएस अधिकारी, मंत्री, नेते यांना डोळे तपासण्यासाठी जेजेमध्ये जावे वाटते; पण हार्टचे आॅपरेशन जेजेमध्ये किंवा शासकीय रुग्णालयात करावे, असे का वाटत नाही? लहाने यांनीही स्वत:चा डोळ्यांचा खासगी दवाखाना काढला असता आणि त्यांनीही रुग्णांना आॅपरेशनसाठी तिकडे बोलावले असते तर आतापर्यंत त्यांनी मलबार हिलवर बंगला घेतला असता. पण त्यांनी गोरगरीब रुग्णांमध्ये आपल्या मनातील बंगला बांधला. कट प्रॅक्टीस करणे त्यांना अवघड नव्हते, पण त्याचा मोह त्यांना झाला नाही. म्हणून ते यावर बोलू शकले. आजही सरकारी दवाखान्यातील अनेक अधिकारी खासगीत प्रॅक्टीस करतात, रुग्णांना तिकडे बोलावून घेतात. माणसांचेच नाही तर अगदी कुत्री, मांजरांचे सरकारी डॉक्टरही खासगीत प्रॅक्टीस करतात. ती कधी कोणाला थांबवावी वाटत नाही. कट प्रॅक्टीस तर फार पुढचा मुद्दा आहे. रुग्णांना नीट करण्याच्या पुण्यकामात चिरीमिरी करून बँक बॅलन्स वाढेलही; पण नाडल्या गेलेल्या रुग्णांचे तळतळाट कधीही अशा डॉक्टरांना सुखी होऊ देणार नाहीत.