'राज्य भाजपातील गटबाजीचे काय?' ‘फायरब्रँड’ नेत्या पंकजा मुंडे खरं बोलल्या पण...
By नंदकिशोर पाटील | Published: March 9, 2023 12:26 PM2023-03-09T12:26:32+5:302023-03-09T12:31:52+5:30
भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजीवर आजवर कोणी उघडपणे बोलत नसले तरी इतर पक्षांप्रमाणे हा पक्षही आतून गटा-तटांत विभागला गेला आहे.
- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव, माजीमंत्री पंकजा मुंडे या ‘फायरब्रँड’ नेत्या म्हणून ओळखल्या जातात. जे पोटात तेच ओठात, असा त्यांचा बाणा. पण त्यांचा हा स्पष्ट वक्तेपणा अनेकदा त्यांनाच अडचणीचा ठरतो. २०१४ च्या निवडणूक निकालानंतर त्यांनी केलेलं ‘मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री !’ हे विधान खूप गाजलं. पण या विधानाचे अनेक अर्थ-गैरअर्थ काढण्यात आले. पंकजा यांचे हेच विधान भाजपमधील सुप्त सत्ता संघर्षाची नांदी ठरले, असेही काहींना वाटते. आताही त्यांनी भाजपमधील गटबाजीवर केलेले वक्तव्य खळबळ माजविणारे आहे. माजलगाव तालुक्यातील गटबाजीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ‘तालुक्यातील गटबाजी मी कधीही संपवू शकते. पण राज्यातील गटबाजीचे काय ?’ पंकजा यांनी केलेला हा प्रतिप्रश्न भाजपमधील अनेकांना झोंबणारा आहे. भाजपमध्ये सर्वकाही अलबेल आहे. कसलीही गटबाजी नाही, शिस्तभंग करणारे कोणी नाहीत, असे चित्र भलेही उभे केले जात असले तरी ‘आतली’ खदखद लपून राहात नाही. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार ठरविण्यावरून पक्षांतर्गत बरंच ‘महाभारत’ झाल्याची चर्चा आहे. मुक्ता टिळकांच्या निधनानंतर त्यांच्याच घरात उमेदवारी देण्यास कोणाचा विरोध होता? भाजपचे पराभूत उमेदवार हेमंत रासने कोणाची पसंती होती? देशाच्या गृहमंत्र्यांना एका पोटनिवडणुकीच्या प्रचारात का उतरावं लागलं, असे असंख्य प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पंकजा यांनी कदाचित त्याकडेच अंगुलीनिर्देश केला असावा.
अलीकडच्या काळात पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक उक्तीची आणि कृतीची बातमी होते. गेल्या दोन महिन्यांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनदा बीड जिल्ह्यात येऊन गेले. पण दोन्ही वेळेस त्यांच्या कार्यक्रमांना मुंडे भगिनी गैरहजर होत्या. त्यावरूनही बरीच चर्चा झाली. त्यानंतर गेल्या महिन्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा झाला. या दौऱ्यात मात्र, त्या सहभागी झाल्या. पण गेवराई येथील कार्यक्रमात आधी कोणी बोलायचे, यावरून घडलेला प्रसंग बराच चर्चिला गेला. प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर स्वत : बावनकुळे यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. ते देत असताना, त्यांनी पंकजा यांच्याबाबत केलेले विधान खूप सूचक आहे. ते म्हणाले, पंकजाताई आमच्या नेत्या आहेत. पक्षात त्या ज्येष्ठ आहेत. पण त्यांना बदनाम करणारा एक गट भाजपमध्येच आहे!’ पंकजा यांच्या कालच्या विधानामागे हाही संदर्भ असावा.
भाजपमधील पक्षांतर्गत गटबाजीवर आजवर कोणी उघडपणे बोलत नसले तरी इतर पक्षांप्रमाणे हा पक्षही आतून गटा-तटांत विभागला गेला आहे. आतले आणि बाहेरचे, असाही सूप्त संघर्ष आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत भाजपमध्ये इतर पक्षांतील जी घाऊक भरती झाली, या भरतीने निष्ठावंतांचा कोटा कमी केला. शिवाय, ते सगळे सत्ता वर्तुळाभोवती असल्याने पक्षातील निष्ठावंत बाजूला पडले आहेत. ज्यांनी आजवर सतरंज्या उचलल्या, शाखांची झाडलोट केली, त्या मंडळींची या ‘बाहेरच्यां’ मुळे अक्षरश : दमकोंडी झाली आहे. निष्ठावंतांच्या या नाराजीचा फटका कसब्यात बसला. गेली चार दशकं निगुतीनं राखलेला ‘कसबा’ हातून गेल्याने अनेक जण उघडे पडले. शिस्तीच्या या चिरेबंदी वाड्यातील खदखद हळूहळू बाहेर येत आहे. पक्षांतर्गत गटबाजीवर पंकजा यांनी केलेले विधान त्याचीच तर सुरुवात नाही?
पंकजा आणि वाद
पंकजा मुंडे यांच्या प्रत्येक कृतीची हल्ली चर्चा होते. शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण शिंदे गटाकडे गेल्यानंतर पंकजा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. उभयतांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. पण त्यातून अनेक अर्थ काढले गेले. विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागली नाही. सध्या त्या आमदार नसल्याने मंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही. बीड जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेले माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या माध्यमातून त्यांना शह देण्याचा प्रयत्न होत असल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. बीडच्या खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी नगर-परळी रेल्वे मार्गासाठी खूप प्रयत्न केले. पण तरीही त्यांच्या उमेदवारीबद्दल का प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे ? ते करणारे पक्षातील आहेत की, बाहेरचे?